काजू पिक सध्या पालवी ते मोहोर अवस्थेत असून पाऊस आणि ढगाळ वातावरण राहिल्याने परिणामी आर्द्रतेत वाढ आणि तापमानात घट झाल्याने करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. रोगामुळे पानांवर करड्या पिंगट रंगाचे अनियमित आकाराचे ठिपके दिसून येतात आणि रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पाने करपतात आणि गळून पडतात. रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
ढगाळ वातावरण राहिल्याने पालवी/मोहोर अवस्थेतील काजूवर ढेकण्या (टी मोस्कीटो बग) किडीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. हि कीड पालवी/मोहोरातील रस शोषून घेते तसेच पिल्ले आणि प्रौढ यांची लाळ ही फायटोटॉक्सिक असल्याने पालवी/मोहोर सुकून जातो, मोहोराच्या दांड्यावर काळे डाग दिसून येतात. किडीच्या नियंत्रणासाठी पालवी अवस्थेत असताना लॅम्बडासायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ६ मि.ली. प्रति १० लिटर पाणी आणि मोहोर अवस्थेत असताना प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही १० मि.ली. प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी पानांच्या खालून आणि वरून व्यवस्थित बसेल अशी करावी. आणि ढेकण्या उन्ह तापू लागताच सक्रीय होतात आणि त्यामुळे एका जागी स्थिर राहत नाहीत परिणामी फवारणीच्या औषधाचा संपर्क जास्त येत नाही त्यामुळे अपेक्षित नियंत्रण मिळत नाही सबब सकाळी १०.०० पूर्वी किंवा संध्याकाळी ४.०० नंतर फवारणी करावी.
पालवी अवस्थेत प्रोफेनोफॉसची फवारणी घेतली असल्यास मोहोराच्या वेळेस लॅम्बडासायहॅलोथ्रीनची फवारणी करावी. एकाच कीटकनाशकाची सलग फवारणी घेणे टाळावे. काजू बागेतील गवत काढून बागेची साफसफाई करावी आणि नंतर कीटकनाशकाची फवारणी करावी. काजू बागेतील कलमांसोबतच इतर स्थानिक झाडांवर देखील फवारणी करण्यात यावी जेणेकरून किडींच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यास मदत होईल.
काजुचे अधिक उत्पन्न मिळवण्याकरीता पाण्यात विरघळणाऱ्या १९:१९:१९ या अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणात मोहोर आल्यावर फवारणी घ्यावी. काजूची फलधारणा व उत्पन्न वाढविण्यासाठी स्वस्त अशा सुकलेल्या माश्यांचा अर्क ५०० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळुन पहिली फवारणी फुलोऱ्याच्या वेळी तर दसुरी फवारणी पहिल्या फवारणी नंतर १० दिवसांनी करावी.
काजु बियांचे उत्पादन व बियांचे आकारमान वाढविण्यासाठी प्रति झाड ताज्या किंवा ८ दिवसांपर्यंत साठवलेल्या २५% गोमुत्राची फवारणी करावी. १२५० मिली गोमुत्र ३७५० मिली पाण्यात घालुन ५ लिटर द्रावण तयार करुन एका झाडाकरीता वापरावे तसेच २५% गोमुत्राची झाडाच्या बुंध्यामध्ये जिरवणी १० लिटर द्रावण याप्रमाणात ऑक्टोबर महिन्यापासुन दर महिन्याला एक वेळ अशी चार महिने करावी. फवारणीच्यावेळी किटकनाशक/बुरशीनाशक द्रावणामध्ये स्टीकर/स्प्रेडर सारखा चिकट पदार्थ १ मिली/१ लि. पाणी या प्रमाणात मिसळावा.
ग्रामीण कृषि मौसम सेवाउद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग