Join us

आता उशिराच्या पावसाची काळजी नको, असे करा पेरणीचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 12:47 PM

शेतकऱ्यांनी ढेकळं फुटेल इतपत पाऊस झाल्याशिवाय पेरण्यांची घाई करू नये असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिला आहे.

यंदा मॉन्सूनला राज्यात उशिरा सुरूवात झाली आहे. अजूनही जमिनीत पुरेशी ओल येण्याइतपत पाऊस पडलेला नसून शेतकऱ्यांनी ढेकळं फुटेल इतपत पाऊस झाल्याशिवाय पेरण्यांची घाई करू नये असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू शेतीचे जवळपास ८५  टक्के क्षेत्र आहे. पावसाची उशिरा सुरुवात व अपुरी मात्रा पिक वाढीच्या कालावधीत ३ - ५ आठवड्यांचा खंड हे बदलत्या हवामानाची वैशिष्ट आहे. अशा परिस्थितीत कोरडवाहू शेतीचे उपयुक्त तंत्र वापरुन काही प्रमाणात निश्चित उत्पादन मिळविता येते.

 नैसर्गिक घटक जसे जमीन, पाणी, सुर्यप्रकाश व हवा इत्यादींचा कार्यक्षम उपयोग करुन घेण्यासाठी जमीन व्यवस्थापन आणि पिक पद्धतीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. कोरडवाहू शेतीच्या सुधारीत तंत्रज्ञानाची माहिती खालीलप्रमाणे आहे.

नैसर्गिक साधनसामुग्रीचे नियोजन असे करा :

  1.  पेरणी योग्य पाऊस होतच (७५ ते १०० मि.मी.) पेरणी करावी. पाऊस उशिरा सुरु झाल्यास आपत्कालीन पीक नियोजन अवलंबवावे.
  2. धुळ पेरणी करिता २५ टक्के क्षेत्रावर ज्वारी, मूग, उडीद सारख्या पिकांची निवड करावी.
  3. पेरणीपुर्व मशागत, आंतरमशागत, एकात्मीक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, एकात्मीक तण नियंत्रण व पिक संरक्षण बरोबर शेतपातळीवर जलसंधारणाकरीता परिस्थितीनुरुप योग्य मुलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब करावा.
  4. मृद व जलसंधारण करण्याकरीता बांध बंदिस्ती, ओघळ व नाल्याचे उपचाराची निगराणी व दुरुस्ती पावसाळ्यापुर्वीच करण्यात यावी.
  5. अतिवृष्टी दरम्यान शेतात साचलेले पाणी लवकरात लवकर शेताबाहेर काढण्यात यावे.

 

पीक व्यवस्थापनासाठी काही टीप्स

  1. जमीन व पाऊसमानानुसार पीक पद्धती निवडावी.
  2. मध्यम ते भारी जमिनीत कापूस, तूर, खरीप ज्वारी व सोयाबीन सारखी पिके घ्यावीत.
  3. हमखास पावसाच्या क्षेत्रात मध्यम ते भारी जमिनीकरीता दुबार पीक पद्धतीचा अवलंब करावा. यामध्ये मूग - रबी ज्वारी, संकरीत ज्वारी, सोयाबीन व करडई / हरभरा पिकांचा समावेश करावा.
  4. मध्यम जमिनीत सूर्यफुल, तूर, बाजरी, सोयाबीन, ज्वारी सारखी पिके घ्यावीत.
  5. हलक्या जमिनीत बाजरी, कुलथी, तीळ, कारळ, एरंडी सारखी पिके घ्यावीत.
  6. आंतरपिक पद्धतीमध्ये संकरित ज्वारी व तूर (४:२), बाजरी व तूर (३:३), सोयाबीन व तूर (४:२), कापूस व उडीद / सोयाबीन (१:१) पिक पद्धतीचा अवलंब करावा. आवश्यकतेनुसार आपत्कालीन पीक नियोजन करावे.
  7. लवकर येणाऱ्या वाणांची निवड करावी. बियाण्याचे योग्य प्रमाण ठेवावे व बीजप्रक्रिया करावी.
  8. झाडांची योग्य संख्या ठेवावी, त्याकरीता पिकांच्या दोन ओळी तसेच दोन झाडात योग्य अंतर ठेवावे.
  9. अन्नद्रव्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करावे व एकात्मिक किड व रोग नियंत्रण करावे.
  10. एकात्मिक तण नियंत्रणाचा अवलंब करुन योग्य वेळी रासायनिक तण नियंत्रण तसेच आंतरमशागत करण्यात यावी.
  11. रबी पिकांची शक्यतो लवकर पेरणी करावी. ओलाव्याच्या उपलब्धतेनुसार, योग्य मशागतीचा (शुन्य मशागत / कमीत कमी मशागत / सर्व साधारण मशागत) अवलंब करावा.

 

आपत्कालीन स्थितीत पीक नियोजन असे करा

मराठवाडा विभागात कृषि उत्पादन हे मुख्यत: कोरडवाहू शेतीवर आधारीत असून उत्पादन क्षमता पावसाच्या अनियमीतेवर अवलंबून असते. पावसाच्या आगमन, निर्गमनानुसार योग्य पीक पद्ध्तीचे नियोजन केल्यास उत्पादनामध्ये स्थिरता येऊ शकते. आपत्कालीन परिस्थिती खालील प्रकारच्या कारणांमुळे निर्माण होऊ शकते.

पर्जन्यमानाचे आगमन उशिरा होणे. पर्जन्यमानाचे निर्गमन लवकर होणे. पर्जन्यमानाचे आगमन / निर्गमन वेळेवर परंतू पीक कालावधीमध्ये पावसात दीर्घ अवधीचा खंड पडणे. संततधार व अतिवृष्टी होणे.    अशा परिस्थितीत पिकांच्या नियोजनात बदल करणे निश्चित उत्पादनाच्या दृष्टीने हिताचे व उपयुक्त ठरते. 

 

टॅग्स :खरीपमोसमी पाऊसशेतकरीखते