अवळाळी पावसात कांद्याच्या रोपवाटिकेमध्ये साठलेले अतिरिक्त पाणी शेताच्या बाहेर काढून द्यावे. मागील तीन-चार आठवड्याच्या सतत ढगाळ वातावरणामुळे व पावसामुळे हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे. रोपांची उभट वाढ झाल्याचे निर्दशनास येत आहे. रोपाच्या बुंध्याची जाडी कमी राहिलेली आहे. रोपांचे मुळे सडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. रोपांच्या पातींना पीळ पडत असल्याचे दिसून येत आहे.
रोपे मजबूत व सशक्त होण्याकरिता
- ००:५२:३४ हे विद्राव्य खत २ ग्रॅम + सिलीकॉन १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून एकदा किंवा दोनदा फवारणी करावी. तसेच विद्राव्य गंधक ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात द्रावण करून या द्रावणाची प्रती चौरस मीटर २ लीटर द्रावणाची आळवणी करावी.
- रोपांवर करपा रोगाचा व फुलकिड्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून डायथेन एम-४५ २ ग्रॅम + फेप्रोनिल १ मिली + स्टिकर १ मिली प्रति ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- रोपवाटिकेमध्ये ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ५ मिली प्रति लिटर पाण्यामध्ये द्रावण करून त्याची आळवणी करावी.
पुनर्लागवड झालेल्या कांदा पिकांची निगा व काळजी
अवकाळी पावसात नुकत्याच पुनर्लागवड झालेल्या शेतातील रोपांची मुळे सडण्याचे प्रमाण व पातींना पीळ पडण्याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. तसेच मध्यम ते भारी जमिनीतील वाफ्यामध्ये पाणी साचून राहिल्याने रोपांची मर होत आहे.
- अवकाळी पावसामुळे जमिनीमध्ये दिलेल्या खतांमधील अन्नद्रव्यांचा पाण्याबरोबर निचरा होत आहे.
- पिकाला नव्याने सुक्ष्म अन्नद्रव्ये व मुख्य अन्नद्रव्ये युक्त रासायनिक खतांचा अवलंब करणे गरजेचे आहे.
- लागवडीपूर्वी टाकलेले नसेल तर प्रति एकर १५ किलो युरिया + २० किलो १०:२६:२६ + ५ किलो सुक्ष्म अन्नद्रव्ये + ५ किलो गंधक या खतांचा वापर करावा.
- सिलिकॉन मुलद्रव्य फवारणीतून पिकाला द्यावे.
- लागवडीनंतर १० दिवसापर्यंत अॉटोबॅक्टर, पी. एस. बी प्रत्येकी २ लीटर प्रती एकर द्यावे.
- मुळकुज, कंदकुज टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा व सुडोमोनास हे जैविक बुरशीनाशक प्रत्येकी २ लीटर प्रती एकर १० दिवसाच्या अंतराने २ ते ३ वेळेस द्यावे.
- करपा व फुलकिड्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डायथेन एम-४५ २ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल (०.१% ) किंवा हेक्झाकोनॅझोल १ ग्रॅम + फेप्रोनिल १ मिली किंवा प्रोफेनिफॉस १ मिली. किंवा लॅम्बडा सायहॅलेथ्रीन ३०% इ.सी. ०.५ मिली + स्टिकर १ मिली प्रति लीटर पाण्यात मिसळून आलटून पालटून १० ते १५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री. भरत टेमकर, डॉ. दत्तात्रय गावडे व श्री. योगेश यादव
कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, पुणे
९४२२५१९१४३