गोरख देवकरगारपीट, अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर काही दिवसांची उसंत मिळाल्यानंतर आता ढगाळ वातावरण, धुक्याने शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाले आहेत. यामुळे वेळीच खबरदारी न घेतल्यास कांदा, गहू, हरभरा आदी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. हवामानातील सततच्या बदलाने यंदा रब्बी हंगामच धोक्यात आला आहे.
यंदा जिल्ह्यात पाऊस अनियमित राहिल्याने शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेला. बहुतांश शेतकऱ्यांना खरिपाची पिके हाती आलीच नाहीत. पुरेसा पाऊस नसल्याने रब्बी हंगामाची सुरुवातही संथ झाली. तरी शेतकऱ्यांनी रब्बीतील ज्वारी, गहू, हरभऱ्याची पेरणी केली. मात्र नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट, वादळाने शेतकऱ्यांचे अक्षरशः कोट्यवधींचे नुकसान झाले. कांदा, कपाशी, तूर, ज्वारी, हरभरा आदी पिकांना सर्वाधिक फटका बसला.
पारनेर, श्रीगोंदा, अकोले, नेवासा, शेवगाव आदी तालुक्यांना मोठा तडाखा बसला. त्यातून शेतकरी काहीसे सावरत होते. तोच रविवारी (दि.१७) सकाळपासून पुन्हा हवामानात बदल झाला. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण होते. तसेच काही भागांत तर दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. वातावरणात दिवसर थंडावाही होता. तसेच गेल्या काही दिवसांपासून सकाळीच धुकेही राहते. कांद्यावर करपा, गव्हावर मावा, हरभऱ्यावर गाठीअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. कांद्यावर फूलकिडे आढळल्यास डायमेथोएट ३० टक्के ईसी १५ मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ईसी सहा मिली प्रति दहा लिटर पाण्यातून हातपंपाने या किटकनाशकांच्या फवारण्या कराव्यात. ५ टक्के निंबोळी अर्काचीही फवारणी करावी, अशी माहिती दहिगावने कृषी विज्ञान केंद्रातील कृषी विस्तारचे विषय विशेषज्ज्ञ सचिन बडदे यांनी दिली.
हरभरा पिकाची अशी घ्या काळजी- हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ५ टक्के निंबोळी अर्काची पहिली फवारणी करावी.- पहिल्या फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी हेलिओकिल या विषाणूजन्य किटकनाशकाची ५०० मिली ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.- आवश्यक असेल तर तिसरी फवारणी इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के एसजी ४ ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी किंवा क्लोरॅन्टॅनिलीप्रोल १८.५ टक्के एस.सी. २.५ मिली प्रति दहा लिटर पाणी यापैकी एका रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.
गव्हाची अशी घ्या काळजी ढगाळ वातावरणाने गहू पिकावर माव्याचा प्रादुर्भाव होतो. जैविक किटकनाशके वापरावे. यामध्ये मॅटारायझेम अॅनीसोप्ली तीस ग्रॅम दहा लिटर पाण्यासाठी किंवा बिवेरिया बॅसीयाना पन्नास ग्रॅम दहा लिटर पाण्यासाठी घ्यावे. या दोन्ही फवारणी केली तर मावा नियंत्रणात येतो.
कांदा पिकाची अशी घ्या काळजीकांदा रोपावर धुके (दुही) पडल्यास सकाळी स्प्रिंकलरचा पाच ते दहा मिनिटे वापर करावा. अथवा एखादा मोठा कपडा अवथा साडी त्यावरून फिरवावी. लागवडीपूर्वी कांद्याची रोपे प्रक्रिया करावी.