Join us

घोणस अळीचे व्यवस्थापन कसे कराल?

By बिभिषण बागल | Published: July 20, 2023 8:00 AM

ही एक बहुभक्षी कीड असुन बांधावरील गवतावर, एरंडी, आंब्याच्या झाडावर यासारखे पिके व इतर फळपिकावर तुरळ ठिकाणी एखादी अळी दिसून येत असते.

या अळीस इंग्रजीमध्ये स्लज कॅटरपिलर असे संबोधतात. ही एक बहुभक्षी कीड असुन बांधावरील गवतावर, एरंडी, आंब्याच्या झाडावर यासारखे पिके व इतर फळपिकावर तुरळ ठिकाणी एखादी अळी दिसून येत असते. असे असले तरी एखाद्या परिसरामध्ये ही कीड जास्त प्रमाणात आल्यास अधाशाप्रमाणे पानावरील हिरवा भाग खाऊन फक्त शिरा शिल्लक ठेवल्याचे देखील उदाहरणे आहेत. शक्यतो पावसाळ्यात, पावसाच्या परतीला, उष्ण व आद्र हवामानात ही अळी दिसून येते. 

या अळीच्या अंगावर बारीक बारीक केस असतात, त्याखाली काही विष ग्रंथी असतात व या केसातून ते विशिष्ट रसायन किंवा विष त्यांच्या स्वसंरक्षणासाठी बाहेर टाकतात. हे रसायन त्वचेच्या संपर्कात आल्यास त्वचेवर चट्टे पडून अग्नी दाह होतो. ही अळी माणसाच्या अंगावर किंवा माणसाच्या दिशेने येत नाही. ज्याप्रमाणे गांधींन माशीचा डंक लागल्यावर दाह होतो, केसाळ अळी किंवा घुले यांच्या संपर्कातून अलर्जी होते, त्याचप्रमाणे या आळीच्या संपर्कात आपली त्वचा आल्यासच अग्नीदाह होत असतो, तो शक्यतो सौम्य असतो पण ज्या व्यक्तींना अलर्जी आहे किंवा दम्याचा त्रास आहे त्या व्यक्तीमध्ये मात्र तीव्र स्वरूपाची लक्षणे आपणास पहावयाला मिळू शकतात. 

या किडीचे नैसर्गिक नियंत्रण मोठ्या प्रमाणात निसर्गातील विविध मित्र किडी करत असतात. त्यामुळे घाबरून न जाता बांधावरील गवत काढत असताना किंवा शेतातील इतर कामे करतांना या किडीचे निरीक्षण करून ही कीड आपल्या त्वचेच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे काही अपवादात्मक परिस्थितीत आपल्या त्वचेशी या किडीचा किंवा तिच्या केसाचा संपर्क आल्यास आपण घरी वापरतो तो चिकट टेप हा दंश झाल्याच्या ठिकाणी हलक्या हाताने लावून काढून घ्यावा, यामुळे या अळीचे केस सहजपणे निघून जाऊन दाह कमी होण्यास मदत होते. ज्या ठिकाणी दंश झाला आहे त्या ठिकाणी बर्फ लावणे व काही प्रमाणात बेकिंग सोडा व पाण्याची पेस्ट करून लावणे हे देखील फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. पण लक्षणे तीव्र असल्यास मात्र नजीकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्‍ला घेणे योग्य राहील.

या किडीच्या नियंत्रणासाठी विशिष्ट अशा रसायनाची किंवा कीटकनाशकाची शिफारस नसली तरी नेहमीच्या वापरातील कीटकनाशक जसे की क्लोरोपायरीफॉस (२५ मिली प्रती १० लि. पाणी), प्रोफेनोफोस (२० मिली प्रती १० लि. पाणी), क्वीनॉलफॉस (२५ मिली प्रती १० लि. पाणी), इमामेक्टिन बेंजोएट (४ ग्रॅम प्रती १० लि. पाणी), ५ टक्के निमार्क हे उपयुक्त ठरतात.

सौजन्‍य : डॉ. व्ही. पी. सूर्यवशी, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, आंबेजोगाई जिल्हा बीड

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणपीक