हरभरा पिकाचे अपेक्षीत उत्पादन येण्यासाठी पाणी व्यवस्थापन हा अतिशय महत्वाचा घटक आहे. हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असल्याने पाण्याच्या उपलब्धेतनुसार व जमिनीच्या प्रकारानुसार पाणी द्यावे. जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खुपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. बागायत हरभरा शेताची रानबांधणी करताना दोन सऱ्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी सुध्दा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देणे सोयीचे होते.
मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, ४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीकरीता पाण्याच्या दोन पाळ्या पुरेशा होतात. त्याकरिता ३०-३५ दिवसांनी पहिले व ६०- ६५ दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. प्रत्येक पाणी प्रमाणशीर देणे महत्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पीक उभळण्याचा धोका असतो. स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यामध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडून देऊ नयेत. हरभरा पिकास एक पाणी दिल्यास ३० टक्के, दोन पाणी दिल्यास ६० टक्के आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होते. पीक फुलोऱ्यात असताना पिकास पाण्याचा ताण जाणवत असेल व पाणी देण्याची सोय नसेल त्यावेळेस २ टक्के युरीयाची पहिली फवारणी आणि त्यानंतर घाट्यात दाणे भरत असतानाच्या अवस्थेत २ टक्के पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी करावी, यामुळे पीक उत्पादनात वाढ होते.
अधिक वाचा: हरभरा पिकावरील मर व मुळकूज रोगाचे व्यवस्थापन
तुषार सिंचनाचा अवलंब
हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारीत वाणांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. या पिकास गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभाळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. यासाठी या पिकास तुषार सिंचन अतिशय उत्कृष्ट पध्दत आहे. तुषार सिंचन पदधतीमुळे पिकास पाहिजे तेवढे आणि आवश्यक त्यावेळेला पाणी देता येते. पिकात तणांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा तुषार सिंचन पद्धतीत कमी होतो आणि असलेले तण काढणे अतिशय सुलभ जाते. नेहमीच्या पद्धतीत पिकास अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे मुळकुज सारखे रोग पिकावर येतात आणि पिक उत्पादन घटते. परंतु तुषार सिंचनाने पाणी अतिशय प्रमाणात देता येत असल्याने मुळकुज रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते.
कडधान्य सुधार प्रकल्प
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी