Join us

रब्बीतील गहू आणि हरभरा पिकाचे पाणी व्यवस्थापन कसे कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 12:55 PM

कुठल्याही बागायती पिकाला पाण्याच्या प्रत्येक पाळीत मध्यम ते भारी जमिनीत सुमारे ७ ते ८ सें.मी. म्हणजे टिचभर उंचीचे पाणी देणे गरजेचे असते. हलक्या जमिनीत पीक घेतलेले असल्यास पाण्याच्या प्रत्येक पाळीत केवळ ४ ते ५ सें .मी. उंचीचे पाणी द्यावे लागते.

रब्बी हंगामात पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतकरी बांधव गहू किंवा हरभरा या हंगामी पिकांची लागवडीसाठी निवड करतात. याचप्रमाणे जमिनीचा प्रकारही पीक निवडीच्या बाबतीत लक्षात घेतल्यास पिकाचे भरघोस उत्पादन मिळवणे शक्य होत असले तरी आपल्याजवळ असलेल्या जमिनीतच (मग ती हलकी, मध्यम असो की भारी) पीक लागवड करावी लागत असल्याने त्यांच्यापुढे त्याबाबतीत पर्याय नसतोच.

अतिशय हलकी-मुरमाड तसेच खूप भारी जमिनी हरभरा तसेच गहू पिकास योग्य नसतात. कारण हलक्या जमिनीचा कस चांगला नसल्याने तसेच या जमिनीची जलधारणाशक्ती खूपच कमी असल्यामुळे पिकांची वाढ चांगली होत नाही. त्याचप्रमाणे खूप भारी जमिनीचा कस चांगला असला तरी योग्य प्रमाणात पाणी वापरले नाही तर याही जमिनीत पाण्याच्या निचऱ्याअभावी पीक चांगल्या प्रकारे वाढू शकत नाही. पर्यायाने अपेक्षित पीक उत्पादन मिळत नाही.

कुठल्याही बागायती पिकाला पाण्याच्या प्रत्येक पाळीत मध्यम ते भारी जमिनीत सुमारे ७ ते ८ सें.मी. म्हणजे टिचभर उंचीचे पाणी देणे गरजेचे असते. हलक्या जमिनीत पीक घेतलेले असल्यास पाण्याच्या प्रत्येक पाळीत केवळ ४ ते ५ सें .मी. उंचीचे पाणी द्यावे लागते. एकूणच मध्यम ते भारी जमिनीत हलक्या जमिनीच्या तुलनेत जास्त प्रमाणात, जास्त दिवसाच्या अंतराने तर हलक्या जमिनीत कमी प्रमाणात, कमी दिवसाच्या अंतराने पिकास पाणी द्यावे लागते.

पिकाच्या पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्थाहंगामी पिकास पाणी देताना त्या पिकाच्या पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्थाही लक्षात घ्याव्या लागतात. पिकाच्या ह्या संवेदनक्षम अवस्थेत पिकास पाणी दिले नाही किंवा त्या अवस्थेत जमिनीत पुरेसा ओलावा नसेल तर पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

हरभरा पिकाच्या पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्थामध्यम ते भारी जमिनीत घेतलेल्या हरभरा पिकास पेरणीच्या वेळी दिलेल्या पहिल्या पाण्यानंतर दुसरे पाणी पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी, फुलोऱ्याच्या काळात आणि तिसरे पाणी पेरणीनंतर ६५ ते ७० दिवसांनी, घाटे भरताना द्यावे.

गहू पिकाच्या पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्थागहू पिकास मध्यम ते भारी जमिनीत सरसकट २१ दिवसाच्या अंतराने एकूण ५ पाण्याच्या पाळ्या अनुक्रमे पेरणीच्या वेळी, मुकुटमुळे फुटणे, कांडी धरणे, फुलोरा व चिक भरणे आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत द्यावे. एकच पाणी देणे शक्य असल्यास पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी आणि दोन पाणी देणे शक्य असल्यास पेरणीनंतर ४० ते ४२ व ६० ते ६५ दिवसांनी गहू पिकास द्यावे. हलक्या जमिनीत घेतलेल्या हरभरा व गहू पिकास सरसकट १५ ते २० दिवसाच्या अंतराने कमी प्रमाणात (४ ते ५ सें.मी.) पाणी द्यावे.

डॉ. कल्याण देवळाणकर

टॅग्स :रब्बीगहूहरभरापाणीशेतकरीशेतीपीक