पारंपरिक शेतीतून आर्थिक उन्नती न होता केवळ तुटपुंजे पैसे हाती येतात. त्यालाही मोठ्या प्रमाणावर काबाडकष्ट करावे लागतात; पण आधुनिक शेतीच्या माध्यमातून शेतीकडे पाहिले तर आता वाळवंटी प्रदेशातील ड्रॅगन फ्रूट याची लागवड करत अनेकांनी आर्थिक उन्नती हेक्टर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांना ड्रॅगनफ्रूटची लागवड केल्याने फायदा झाल्याचे चित्र आहे. ड्रॅगनफ्रूट या पिकाची लागवड कशी करायची? रोपे तयार करायची पद्धत काय? फवारणी कशी करावी? जाणून घेऊया...
रोपे तयार करण्याची पध्दत
ड्रॅगनफ्रूटची रोपे बियांद्वारे किवा छाट कलम पध्दतीने तयार केली जाऊ शकतात. छाट कलम पध्दतीद्वारे अतिशय जलद गतीने व सोप्या पद्धतीने रोपे तयार केली जातात. एक वर्ष वयाची गडद हिरव्या रंगाची २०-२५ सेमी लांबीची फांदी रोपे तयार करण्यासाठी निवडावी. हलक्या हिरव्या रंगाच्या फांद्यांना मुळे व फूटवे थोडेसे उशिरा येतात. यापेक्षा लहान फांद्या सुद्धा वापरल्या जाऊ शकतात परंतु नर्सरीमध्ये खोडकुज रोगाचा प्रादुर्भावास लवकर बळी पडतात त्यामुळे लहान फांद्या पुर्णपणे काढून फेकून द्याव्या लागतात. म्हणुन योग्य लांबीच्या व एक वर्ष वयाच्या फांद्या वापरल्याने अधिक फुटवा व मुळांची वाढ चांगली होऊन गुणवत्तेची रोपे तयार करता येतात. निवडलेल्या फांदीवर कोणत्याही प्रकारच्या रोगाची लक्षणे नसावीत जेणेकरून नवीन बागेमध्ये रोगाचे संक्रमण होणार नाही.
निवडलेल्या फांद्या शक्यतो 4-5 दिवसांकरिता सावलीमध्ये सुकण्यासाठी ठेवल्याने कॅलसिंग (Callusing) व्यवस्थित होऊन रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. फांदी लावण्यापूर्वी फांद्यांना बुरशीनाशकाच्या (उदा. कॉपर ऑक्सी क्लोराइड) द्रावणात बुडवून घ्यावे व पॉलिथीनच्या पिशवीमध्ये (10x25 सेंमी) तसेच गादी वाफा तयार करून रोपण करता येते. गादी वाफ्यावर रोपे बनवण्यासाठी अंदाजित 3 फुट रुंद आणि 0.5-1फुट उंच असा गादी वाफा शेणखत मिसळून बनवून घ्यावा. या गादी वाफ्यावर 15-20 सेंमी च्या अंतरावर ड्रॅगनफ्रूट ची कटिंग लावावीत व नियमित अंतराने पाणी देत रहावे. गादी वाफ्यावर रोपे तयार केल्याने पॉलिथीनचा खर्च कमी होऊन खूप सोप्या पद्धतीने ड्रॅगनफ्रूट ची नर्सरी तयार केली जाऊ शकते. 1.5 ते 2 महिन्यानंतर योग्य रोपांची मुख्य जागी पुनर्रोपण करता येऊ शकते.
लागवड
ड्रॅगनफ्रूटची सर्वसाधारणपणे मान्सूनपूर्व लागवड केली जाते. सिंचनाची सोय असल्यास ड्रॅगनफ्रूटची लागवड वर्षभर करता येऊ शकते. अतिउष्ण महीने शक्यतो टाळावेत. ड्रॅगनफ्रूट हे वेलवर्गीय फळपीक असून पिकाच्या वाढीसाठी लागवडीपूर्वी आधारप्रणाली उभारणे आवश्यक आहे. यामध्ये आरसीसी सीमेंट खांबांचा उपयोग केला जातो.
आरसीसी सीमेंट खांबांचे आकारमान खालीलप्रमाणे
• उंची - 6 ते 7 फुट
- रूंदी / जाडी - 4 इंच
- वजन 40-45 किलो
खांबाच्या मधोमध 1 इंच व्यासाची लोखंडी सळी (रॉड) बसवावी. सदरची लोखंडी सळी (रॉड) खांबाच्या वर 5 सेंमी असावी जेथे प्लेट ठेवता येईल.
प्लेटचे आकारमान चौकोनी अथवा गोलाकार -
• चौकोनी प्लेट- लांबी, रुंदी व जाडी - 60 x 60 x 5 सेंमीप्लेटचे वजन15-25 किलो
लागवडीचे अंतर -
ड्रॅगन फ्रुट रोपांच्या लागवडीकरीता 4.5 मी x 3 मी, 3.5 मी x 3 मी 3 मी x 3 मी अंतर अनुज्ञेय आहे. 60 x 60 सें.मी. लागवडीकरीता आकारमानाचे खड्डे खोदुन घ्यावेत. खड्डा खोदुन झाल्यावर खड्डयाच्या मधोमध 1 फुट खाली व 5/6 फुट जमिनीच्या वर अशा पध्दतीने सीमेंट काँक्रेटचे खांब उभे करावेत. प्रति खड्डा 10-15 किलो कुजलेले शेणखत मिसळून वाफे बनवून घ्यावेत.
पाऊस झाल्यानंतर रोपांची लागवड करावी. रोपांची लागवड करताना, रोपे खांबाच्या जेवढ्या जवळ लावता येतील तेवढी जवळ लावावीत जेणेकरून नवीन फुटवा खांबाला योग्य रीतीने बांधता येईल. खांबाच्या चारही बाजूंना एक एक रोप लावावे, म्हणजे एका खांबाजवळ 4 रोपे लावली जातील याप्रमाणे 4.5 x 3 मी. अंतराकरीता हेक्टरी 2960 रोपे लागतील.
ड्रॅगन फ्रुटमध्ये अनेक औषधी गुणधर्म
या फळात विविध औषधी गुण आहेत. या व्यतिरीक्त या फळामध्ये फॉस्फरस व कॅल्शीयम या सारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायमची टिकून राहतात. तसेच या पिकामध्ये रोग व किडींचा प्रादुर्भाव नगण्य असुन पिक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही. भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी वाढत आहे. या फळाचे क्षेत्र, मागणी, निर्यातक्षमता, औषधी व पोषक मुल्य इ. बाबी लक्षात घेवुन सन २०२१-२२ या वर्षापासुन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे.कृषी विभागाने यासंदर्भात एक मार्गदर्शिका जारी केली आहे.