Join us

विषाणूजन्य रोगापासून टोमॅटोचे संरक्षण कसे कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 4:53 PM

विषाणूजन्य रोगापासून भाजीपाला पिक टोमॅटोचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने उपाययोजना टोमॅटोमध्ये विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी काय केले पाहिजे?

विषाणूजन्य रोगापासून भाजीपाला पिक टोमॅटोचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने उपाययोजना टोमॅटोमध्ये विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी चांगल्या कृषी पद्धती (Good Agriculture Practices) चा अवलंब अपेक्षित आहे. शेतकरी बांधवांनी टोमॅटो पिकाची शेती करताना खालील बाबींकडे लक्ष द्यावे.

१) नामांकित स्त्रोतांकडून दर्जेदार बियाणे उपलब्ध असल्यास रोगास प्रतिरोधक/सहनशील वाणांचा वापर करणे गरजेचे आहे.२) केवळ प्रतिष्ठित विक्रेत्यांकडूनच किटक-प्रूफ नेट नर्सरीमध्ये पिकविलेल्या चांगल्या प्रतीची रोपे घ्या.३) विषाणूजन्य रोगांना प्रतिकारक अशा टोमॅटोच्या जातीची निवड करावी. बंगळूर येथील राष्ट्रीय बागवानी संशोधन संस्थेने अर्का रक्षक, अर्का सम्राट, अर्का अभेद्या या जाती शिफारीत केल्या आहेत.४) बिजप्रक्रिया: टोमॅटो बियाणे टी. एस. पी. (ट्रायसोडियम फॉस्फेट) @ १०% च्या द्रावणात भिजवून बिजप्रक्रिया करावी.५) रोपवाटिकेमध्ये रसशोषक किडी ( मावा, फुलकिडे, पांढरी माशी इ.) याचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेणे. जर प्रादुर्भाव होत असेल तर निंबोळी अर्काची ५ टक्के फवारणी करावी. तसेच ४०-६० मेश नायलॉनच्या जाळीच्या मंडपामध्ये रोपे तयार केल्यास रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी करता येईल.६) शेतकऱ्यांनी परवानाधारक रोपवाटिकेतूनच रोपांची खरेदी करावी. अशा रोपवाटिकेमध्ये इन्सेक्ट नेट-हाऊस, पॉलिहाऊस, शेडनेट हाऊस अशा सुविधा असाव्यात.७) विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव असणाऱ्या परिसरातून रोपांची खरेदी करू नये. प्रत्येक शेतकऱ्याने शक्यतो आपापल्या तालुक्यातील रोपवाटिकेतूनच टोमॅटो रोपांची खरेदी करावी.८) वीस दिवसापेक्षा कमी वयाचे किंवा २८ दिवसापेक्षा जास्त वयाचे रोप लागवडीसाठी वापरू नये. रोपे लावण्यापूर्वी त्यांचे पुरेसे हार्डनिंग झालेले असावे.९) रोपे लागवडीपूर्वी इमिडॅक्लोप्रिड १७.८ एस. एल. ५ मिली अधिक मॅन्कोझेब २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात रोपांची मुळे १०-१५ मिनिटे बुडवावीत.१०) रोपे लागवडीनंतर ९८% हयुमिक अॅसिड १ किलो/२०० ली पाणी/एकर, कॉपर ऑक्सीक्लोराईड २.५ ग्रॅम/ली. पाणी यांची आळवणी करावी. रोपे जोमदारपणे वाढतील याची काळजी घ्यावी.११) टोमॅटोच्या लागवडीपासून दर २५ दिवसांनी सुक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. (सूक्ष्म अन्न द्रव्य फवारणीतून २ मिली/लिटर व ड्रीपमधून २ लिटर प्रती एकर पाण्यातून सोडणे.)१२) रोपे लागवडीनंतर ८ ते १० दिवसांच्या अंतराने कीड व रोगांच्या निरीक्षणानुसार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आंतरप्रवाही किटकनाशके व बुरशीनाशकांची वेळोवेळी फवारणी करावी.१३) शेताच्या चारही बाजूंनी मका पिकाच्या दोन-तीन ओळी लावून सजिव कुंपण तयार करावे. अन्यथा सहा फूट उंचीची शेडनेट चारही बाजूंनी लावावी.१४) रोपे लागवडीनंतर ३० दिवसांपयर्यंत जर प्रोटेक्शन फिल्मने टोमॅटोची पूर्ण ओळ झाकली तर कडक उन्हापासून व रस शोषक किडींपासून रोपांचे संरक्षण होण्यास मदत होऊ शकते.१५) रस शोषक किंडीच्या नियंत्रणासाठी प्रती एकर ४० निळे व पिवळे चिकट सापळे शेतामध्ये लावावेत.१६) पिकांची फेरपालट: टोमॅटो लागवडीसाठी ज्या शेतामध्ये अगोदरच्या हंगामात टोमॅटो, मिरची, वांगी बटाटा, गहू या पिकांची लागवड केलेली नव्हती अशा शेताची निवड करावी.१७) बाधित टोमॅटोची फळे योग्य प्रकारे विल्हेवाट लावा, त्यांना आजूबाजूला पसरवू नका. शक्यतो बाधित फळे गाडून टाका.१८) उभे पीक कापणीच्या नंतर लवकर नष्ट करा, कारण त्यातमध्ये विषाणू वाहून नेणारे इनोकुलम असू शकतात. मागील पिकात पांढरी माशी, फुलकिडी, मावा इ. चे कीटक व्हेक्टर टिकून राहिल्यास नवीन पिकांना किंवा शेजारच्या पिकांवर अथवा जवळच्या भागात त्याचा प्रसार रोखण्यासाठी योग्य कीटकनाशकाची फवारणी घेणे अपेक्षित आहे.१९) टोमॅटो काढणीच्या टप्प्यात योग्य काळजी घ्या, मजुरांचे अयोग्य हातालानीदेखील रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर यासाठी हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. तसेच इतर उपकरणे काळजीपूर्वक धुवावेत, खुरपणी किंवा अंतर मशागतीची कामे करताना मजुरांनी झाडांना स्पर्श आणि बागेमध्ये योग्य स्वच्छ ठेवावी.२०) कीटकनाशके वापरताना सावधगिरी बाळगावी, ते कीटक वेक्टर नियंत्रणासाठी किंवा बुरशीजन्य रोगांच्या समस्यांसाठी काटेकोरपणे लेबल क्लेमनुसार फवारणी घ्यावी.

डॉ. दत्तात्रय भा. गावडेपिक संरक्षण तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, पुणे९४२१२७०५१०

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणभाज्यापीकशेतकरीशेतीपुणेकृषी विज्ञान केंद्र