Lokmat Agro >शेतशिवार > पावसाचा खंड ऊसाचे पिक कसे वाचवाल?

पावसाचा खंड ऊसाचे पिक कसे वाचवाल?

How to save the sugarcane crop during lack of rain? | पावसाचा खंड ऊसाचे पिक कसे वाचवाल?

पावसाचा खंड ऊसाचे पिक कसे वाचवाल?

आपत्कालीन परिस्थितीत ऊसावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना

आपत्कालीन परिस्थितीत ऊसावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना

शेअर :

Join us
Join usNext

पाऊसातील अनियमितता कुठे कमी कुठे जास्त आणि कुठे काहीच नाही अशी परिस्थिती राज्यात दिसते आहे. यात ऊसाचे पिक पाण्याच्या ताणामुळे तसेच हवामानाशी निगडीत इतर घटकांमुळे अडचणीत आहे. पाण्याचा ताण आणि इतर घटकांचा ऊस पिकावर काय परिणाम होतो आणि त्याचे आपत्कालीन व्यवस्थापन कसे करावे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत.

ऊस पिकावर अवर्षणाचे दुष्परीणाम :

  • अवर्षण काळात तापमान वाढीमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो.
  • जमिनीतील उपलब्ध पाण्याचे प्रमाण कमी होते.
    मुळाच्या कार्यक्षेत्रातील तापमान वाढून मुळांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे मुळाद्वारे पाण्याचे व अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते.
  • हरितद्रव्यांचे प्रमाण घटल्यामुळे उसाची पाने पिवळी पडू लागतात.
  • ऊसाच्या पूर्ववाढ व जोमदार वाढीवर प्रतिकुल परिणाम होतो. त्यामुळे कांड्यांची लांबी व ऊसाची जाडी कमी होऊन वजनात घट येते.
  • ऊसामध्ये तंतुमय पदार्थांच्या प्रमाणात वाढ होवून दशीचे प्रमाण वाढते.
  • साखर चयापचय/क्रियांवर परिणाम होवून निर्मिती व उतारा घटतो.
  • पाण्याचा तीव्र ताण बसल्यास उसाची वाढ खुंटते व कधी कधी सरळ उंच वाढण्याऐवजी डोळे फुटून पांगशा फुटतात. ऊसवाढीच्या काळात कमी पाण्यामुळे किंवा अचानक अवर्षण परिस्थिती झाल्यास होणारे दुष्परीणाम कमीत कमी होणेसाठी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव तर्फे शिफारस झालेल्या उपाययोजनांची अमलबजावणी केल्यास ऊस उत्पादनात येणारी घट बऱ्याच प्रमाणात कमी करता येईल.


आपत्कालीन परिस्थितीत ऊसावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना :

१) ऊस पिकासाठी जास्तीत जास्त क्षेत्रावर शेतकऱ्यांनी ठिबक अथवा तुषार सिंचन पाणी व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे.
२) को ८६०३२, कोएम ०२६५ व को ७४० या जाती इतर जातीपेक्षा पाण्याचा ताण सहन करतात. त्यामुळे नवीन लागवडीसाठी अशा जातीचा प्राधान्याने वापर करावा.
३) ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे अशा ठिकाणी यापुढे पाणी देताना एक आड सरीतून पाणी द्यावे.
४) पाण्याचा ताण पडत असल्यास उभ्या ऊस पिकातील खालची पक्व झालेली तसेच वाळलेली पाने काढून आच्छादन म्हणून सरीत पसरावी, जेणेकरून पाण्याचे बाष्पीभवन कमी होवून जमिनीत ओलावा टिकुन राहण्यास मदत होईल.
५) पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास दर तीन आठवडयांनी २ % म्युरेट ऑफ पोटॅश व २ % युरीया यांचे मिश्रण करून पिकावर फवारणी करावी.
६) पाण्याची कमतरता असल्यास बाष्पीभवन कमी करण्यासाठी ६ ते ८ % केवोलीन या बाष्परोधकाची फवारणी करावी.
७) पाण्याची कमतरता असेल अशा ठिकाणी नेहमीच्या पाटाने पाणी देण्याच्या पध्दती ऐवजी सुरवातीस खर्चिक असली तरी ठिबक जलसिंचन पध्दतीचा वापर करावा.
८) ऊस पिक हे तन विरहीत ठेवावे. त्यामुळे उपलब्ध पाण्यासाठी होणारी स्पर्धा कमी होऊन ऊस वाढीसाठी उपयुक्त ठरेल.
९) शेताच्या सभोवती उंच व जलद वाढणारी शेवरीसारखी पिके लावावीत.
१०) लागवडीच्या ऊस पिकात तसेच खोडव्याच्या पिकास हेक्टरी ५ ते ६ टन पाचटाचे आच्छादन करून प्रती टन पाचटासाठी ८ किलो युरीया, १० किलो सुपर फॉस्फेट व १ किलो पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंचा वापर करावा.

हंगाम निहाय आपत्कालीन ऊस पिकाचे व्यवस्थापन

आडसाली : आडसाली ऊस पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे अहमदनगर, सोलापूर या जिल्हयात प्रमुख्याने घेतला जातो. सध्या आडसाली लागणीचा ऊस जोमदार वाढीच्या (१० ते ११ महिने) अवस्थेमध्ये आहे. अशा ऊसास पाण्याचा ताण कमी करण्यासाठी एक आड सरीस पाणी द्यावे. वाळलेली ऊसाची पाने काढून सरीमध्ये आच्छादन करावे.

पूर्वहंगामी : पूर्वहंगामी ऊसाची लागवड प्रमुख्याने पश्चिम महाराष्ट्र व काही प्रमाणात मराठवाड्यात केली जाते. सध्यस्थितीत पूर्वहंगामी ऊस हा जोमदार वाढीच्या (७ ते ८ महिने) अवस्थेत मध्ये आहे. या हंगामातील ऊसासाठी एक आड सरीतून पाणी दयावे. ऊसाची खालील पाने काढून त्याचे सरीमध्ये आच्छादन करावे. पट्टा पध्दतीने लागवड केली असल्यास ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. पिकास तणविरहीत ठेवावे.

सुरू हंगाम : सुरु उसाची लागवड महाराष्ट्रात सर्वत्र केली जाते. सध्या सुरू ऊस पिक पूर्ववाढ व जोमदार वाढीच्या (५ ते ६ महिने) अवस्थेत आहे. या उसाला एक आड सरीतून पाणी द्यावे. ऊसाचे पीक तणविरहीत ठेवावे, ऊसाच्या सरीमध्ये बाष्पीभवन कमी करण्यासाठी ऊसाचे पाचट उपलब्धतेनुसार आच्छादन म्हणून वापर करावा. ज्या क्षेत्रात ऊसाची बांधणी झालेली नसल्यास अशा ऊसाच्या बांधणीच्या वेळेस पालाश खताची मात्रा शिफारशी पेक्षा २५% जास्त दयावी. पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास दर २१ दिवसांनी २० म्युरेट ऑफ पोटॅश व २% युरीया यांचे मिश्रण करून फवारणी करावी. पिकास तण विरहीत ठेवावे, ज्या ठिकाणी पट्टा पध्दतीने लागण केलेली आहे अशा ठिकाणी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा.

खोडवा : महाराष्ट्रामध्ये खोडव्याखाली ३५-४० % क्षेत्र आहे. सध्या खोडवा पिक हे पूर्व वाढ व जोमदार वाढीच्या अवस्थेत (३ ते ९ महिने) आहे. या ऊसाला एक आड सरीतून पाणी दयावे. खोडव्यामध्ये पाचट आच्छादन म्हणून वापरावे. खोडव्यास पहारीच्या सहाय्याने पालाशची मात्रा शिफारसी पेक्षा २५ % जास्त दयावी. दर २१ दिवसांनी २% म्युरेट ऑफ व २% युरीया यांचे मिश्रण करून फवारणी करावी. पिक तण विरहीत ठेवावे. पट्टापध्दतीने ऊसाची लागण केली असल्यास ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. वरील उपाययोजनांची अमलबजावणी केल्यास अवर्षणामुळे ऊस उत्पादनात येणारी घट कमी करता येईल.

आपत्कालीन पीक नियोजन खरीप - २०२३ अहवाल
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर

 

Web Title: How to save the sugarcane crop during lack of rain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.