सप्टेंबर महिना अर्ध्यावर आलेला असताना आपल्या राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस पडलेला नाही. देव करो आणि उर्वरित काळात भरपूर पाऊस पडो व बळीराजाची चिंता मिटो. खरिपात पडलेल्या पावसाच्या ओलीवर रब्बी हंगामातलं आक्टोबरच्या सुरवातीला पेरावयाचं पहिलं पीक म्हणजे रब्बी ज्वारी. खानदेशात रब्बी ज्वारीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. धान्य आणि चारा उत्पादनामुळे हे पीक अर्थिकदृष्टया निश्चितचं फायदयाचं ठरतं. रब्बी हंगामात जास्तीत जास्त काळ ओलावा टिकून राहावा (किमान दाणे भरण्याच्या आवस्थेपर्यंत) म्हणून सुरवातीचा एक महिना ज्वारी पिकाचे क्षेत्र तणविरहित ठेवावे. त्यासाठी आवश्यकतेनुसार दोन ते तीन कोळपणीच्या पाळया दयाव्यात जेणेकरुन तणांच्या बन्दोबस्ताबरोबरचं ओलावा टिकवून ठेवण्यासही मदत होते. असं म्हणतात की, रब्बी हंगामात पिकात एक कोळपणी करणे म्हणजे पिकास अर्धी पाण्याची पाळी देण्यासारखे असते.
कोरडवाहू पीक म्हणून करडई हे तेलबियांचे पिकही चांगला आर्थिक फायदा करुन देते. खानदेश-मराठवाड्यात पूर्वी खरिप हंगामात कापूस-तूर व रब्बी हंगामात ज्वारी-करडई अशा आंतरपिक पद्धतींचा आवर्जून अवलंब केला जात होता. मात्र अलिकडे करडईच्या काढणी तसेच मळणीसाठी काट्यांमुळे मजूर तयार होत नसल्याने व काढणी-मळणीसाठी पुरेशा प्रमाणात यंत्र उपलब्ध होत नसल्याने करडईची लागवड खूप कमी झाली आहे. जिथे अशा प्रकारची यंत्रे उपलब्ध होवू शकतात अशा भागातील शेतकरी बांधवांनी ज्वारीत आंतरपिक म्हणून किंवा सलग करडईचे पीक जरुर घ्यावे कारण करडईस अत्यंत कमी प्रमाणात ओलावा लागतो, करडई पिकाची मुळे जमिनीत जवळपास एक मिटरपर्यंत खोल जावून जमिनीच्या खालच्या थरातील ओलावाही सहज शोषून घेवू शकते आणि करडईस बाजारभावही चांगला मिळतो. करडई लागवड केल्यानंतर रब्बी हंगामात एखादे-दुसरे पाणी उपलब्ध असल्यास ते शेतकरी बांधवांनी पीक लागवडीनंतर ४५-५० दिवसांनी करडई पिकास प्राधान्याने द्यावे.
डॉ. कल्याण देवळाणकर