शेतकरी मित्रांनो यंदा फेब्रवारी महिन्यातच तीव्र उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. पाण्याची कमतरतादेखील भासणार आहे. मात्र काळजीपूर्वक नियोजन केल्यास आपण सर्व अडचणींवर मात करून भरघोस शेती उत्पन्न सहज घेऊ शकतो.
सिंचनाची सोय असल्यास उन्हाळी बाजरीची पेरणी १५ तारखेनंतर करावी. स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे उत्पादन दीडपट होते. पूर्व हंगामी उसास नत्राची तिसरी मात्रा दिली नसल्यास या महिन्यात १२ किलो नत्र द्यावे. म्हणजे ३२ किलो युरिया पाणी कमी असल्यास २ ते २.५ टन पाचट आच्छादन करावे.
खोडवा ठेवताना १५ फेब्रुवारीनंतर तुटलेला खोडकिडीचा प्रादुर्भाव येऊ शकतो. त्यासाठी पाण्याचा ताण पडणार नाही. याची काळजी घ्यावी. ऊस तोडणीनंतर लगेच धारदार कोयत्याने बुडके छाटून घेऊन पहारीच्या साहाय्याने ३० सेंमी लांब व १० सेंमी खोल खड्डा घेऊन ७० कि युरिया, २९० कि सुपर फॉस्पेट आणि ७५ कि मुरेट ऑफ पोटॅश प्रतिएकर सोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये घ्यावी. ही सर्व कामे ऊस तुटल्यानंतर १५ दिवसांच्या आत करावी.
आंबा मोहोराचे कीड व रोगापासून संरक्षण करा. त्यासाठी डायथोएट किंवा क्विनॉफॉक्स फवारणी करा. फळगळ थांबविण्यासाठी मोहोरावर एनएए १० पीपीएम फवारावे.
• भुईमुग
१५ फेब्रुवारी पूर्वी पेरणी करून घ्यावी. उपट्या प्रकारची पेरणी ३० बाय १० सेंमी व बियाणे ४० ते ५० किलो एकरी वापरावे. निमपसऱ्या पेरणी अंतर ३० बाय १५ सेंमी बियाणे, ३५ ते ४० किलो प्रतिएकर, पसऱ्या प्रकार ४५ बाय १० सेंमी. व बियाणे ३५ किलो एकर वापरावे.
• गहू
तांबेराचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅक्नोझेब ७५ टक्के ६०० ग्रॅम प्रतिलिटर २०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
• हरभरा
उशिरा पेरणी केलेल्या हरभऱ्यासाठी घाटे अळीचे नियंत्रण करण्यासाठी क्चीनॉलफॉस २ मिली. १ लिटर पाण्यात फवारणी करावी. अळी लहान अवस्थेतील असल्यास एचएनपीव्ही (२५० एलइ) हे वापरावे.
• करडई
मावा नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० इसी २०० मिली प्रति २०० लिटर पाण्यातून प्रतिएकरी फवारावे.
• सूर्यफूल
उन्हाळी सूर्यफूल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करा. पेरणी अंतर ६० बाय ३० सेंमी जमिनीत राखावे. एकरी ४ किलो बियाणे आवश्यक, बियाणे पेरणीपूर्वी जीवाणूंची प्रक्रिया करावी. पेरणी करताना एकरी २० मिली नत्र, २४ कि स्फुरद, २४ कि पालाश हे खत घ्यावे.
संतोष करंजे
विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र बारामती