Lokmat Agro >शेतशिवार > कीड नियंत्रणासाठी जैविक नियंत्रकांचा वापर करताय, कशी घ्याल काळजी ?

कीड नियंत्रणासाठी जैविक नियंत्रकांचा वापर करताय, कशी घ्याल काळजी ?

How to take care while using biological control agents for pest control? | कीड नियंत्रणासाठी जैविक नियंत्रकांचा वापर करताय, कशी घ्याल काळजी ?

कीड नियंत्रणासाठी जैविक नियंत्रकांचा वापर करताय, कशी घ्याल काळजी ?

जैविक नियंत्रकांच्या योग्य परिणामांसाठी कोणते जैविक नियंत्रक कधी, कशा पद्धतीने, किती प्रमाणात व कोणत्या परिस्थीतीत वापरावे हे खुप महत्वाचे आहे.

जैविक नियंत्रकांच्या योग्य परिणामांसाठी कोणते जैविक नियंत्रक कधी, कशा पद्धतीने, किती प्रमाणात व कोणत्या परिस्थीतीत वापरावे हे खुप महत्वाचे आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पिकांवरिल नुकसानकारक किडींच्या नियंत्रणासाठी जैविक नियंत्रकांचा वापर ब-याच काळापासुन होत आहे. परंतु बहुतेक शेतकरी बांधवांना त्याचे योग्य परिणाम मिळत नाहीत, हि एक सत्यता आहे. त्यासाठी फक्त जैविक नियंत्रकांना दोष देणे योग्य नाही. अशा जैविक नियंत्रकांच्या योग्य परिणामांसाठी कोणते जैविक नियंत्रक कधी, कशा पद्धतीने, किती प्रमाणात व कोणत्या परिस्थीतीत वापरावे हे खुप महत्वाचे आहे.

सामान्यत: प्रत्येक जैविक नियंत्रक एका विशिष्ट किड किंवा रोगापुरताच प्रभावी असतो. उदा. ट्रायकोग्रामा हा परजीवी कीटक त्याच्या यजमान किडीच्या फक्त अंडी अवस्थेतच परजीवीकरण करतो व किडीच्या अन्य अवस्थांवर तो परिणाम करत नाही. ज्या किडीची अंडी उघडी असतात त्यांवर ट्रायकोग्रामा अगदी सहजतेने परजीवीकरण करतो. तर कित्येक किडींमध्ये अंडी पुंजक्यामध्ये झाकलेली असतात. अशा वेळी विशेष परजीवीकरण आढळुन येत नाही. त्याचप्रमाणे किडींमध्ये रोग उत्पन्न करणारे विषाणू एन.पी.वी. (न्युक्लिअर पोलीहायड्रोसीस वायरस) ज्या त्या किडीच्या अळीसाठीच खास प्रभावी असतो. उदा. हेलीकोवर्पा (बोंडअळी/घाटेअळी) एन.पी.वी. फक्त हेलीकोवर्पाच्याच अळीमध्ये रोग उत्पन्न करतो व लष्करी अळी किंवा इतर अळ्यांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरत नाही. जैविक कीटकनाशकांमध्ये वापरण्यात येणारे जीवाणू आधारीत बीटी (बॅसिलस थुरिनजेन्सीस)चा उपयोग पतंग व पूर्ण विकसीत अळ्यांच्या नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात होतो. ह्या बीटी जीवाणूच्या कित्येक प्रजाती आढळून आल्या आहेत. ज्या त्या किडीच्या वर्गाप्रमाणे खास प्रजातींचा वापर केल्यास जास्त योग्य परिणाम मिळतात.

जैविक नियंत्रणाची सफलता फक्त योग्य जैविक नियंत्रकांच्या निवडीवर अवलंबुन नसते. त्यासाठी निवड केलेल्या जैविक नियंत्रकाचा उपयोग केव्हा करावा हेसुद्धा तितकेच महत्वाचे आहे. उदा. ट्रायकोग्रामा परजीवी कीटकांचा उपयोग पिकांमध्ये यजमान किडीची अंडी अवस्था आढळुन आल्यावरच करणे हितावह ठरते. त्यासाठी शेतात फिरुन सर्वेक्षण करत राहणे गरजेचे असते. अंशत: शक्य झाल्यास किडींचे लिंगाकर्षण सापळे वापरुन त्यामध्ये किडींची उपस्थिती व हालचालींना अनुसरुन ट्रायकोग्रामा परजीवी कीटक शेतात सोडण्याचे आयोजन करावे. अशा पद्धतीने व्यवस्थापन केल्यास कीटकांची असरकारकता वाढते. परजीवी कीटकांचे स्थलांतर खुप कमी अंतरापर्यंतच होते. हे परजीवी कीटकांची एक मर्यादा आहे. त्यामुळे शेताच्या फक्त एका भागात हे परजीवी कीटक सोडुन त्यांचा पूर्ण शेतात प्रसार होत नाही. तर पूर्ण शेतात फिरुन वेगवेगळ्या ठिकाणी हे कीटक सोडणे फायद्याचे ठरते. याचप्रमाणे क्रायसोपा (हिरवा जाळीदार पतंग) हा परभक्षी कीटक (मावा, तुडतुडे, फुलकिडे, पिठ्या ढेकुण, इ.) ची उपलब्धता जरुरी असते. परभक्षी कीटकांच्या यजमान किडी (खाद्य/भक्ष्य) योग्य प्रमाणात उपलब्ध असेल तर ते शेतात व्यवस्थित स्थिरावतात व त्यांची संख्या जोमाने वाढते. ट्रायकोग्रामा व क्रायसोपासारखी जैविक नियंत्रके शेतात एकदा सोडल्यानंतर अनुकुल वातावरण व योग्य प्रमाणात खुराक (यजमान किड) उपलब्ध असल्यास नैसर्गिकरित्या त्यांच्या संख्येत वाढ होते. सामान्यत: असे आढळुन येत नाही. त्यामुळे काही काळानंतर हि जैविक नियंत्रके पुन्ह सोडण्याची गरज पडते.

जास्त तापमानात जैविक नियंत्रके सक्रिय होत नाहीत. जैविक नियंत्रकांना जवळजवळ २५ ते ३० अंश से. पर्यंतचे तापमान खुप अनुकूल असते. यापेक्षा कमी किंवा अधिक तापमानात त्यांची वस्ती कमी होते. ट्रायकोग्रामाला सायंकाळच्या वेळेस शेतात सोडण्याची शिफारस करण्यात येते, जेणेकरुन ते रात्रीच्या वेळेस यजमान किडीची अंडी शोधुन त्यावर परजीवीकरण करु शकतात. जास्त तापमान, हवा किंवा पावसाच्या वातावरणात परजीवी किंवा परभक्षी कीटक शेतात सोडु नये. सुर्यप्रकाशातील अतीनील किरणांमुळे विषाणुयुक्त (एन.पी.वी.) जैविक कीटकनाशकांमधील विषाणुंवर उलट परिणाम होत असल्याने एन.पी.वी. ची फवारणी सायंकाळच्या थंड वातावरणात करण्याची शिफारस करण्यात येते. तसेच कीटकनाशकांच्या मिश्रणासाठी वापरण्यात येणा-या पाण्याची गुणवत्तासुद्धा खुप महत्वाची असते. सामान्यत: जास्त क्षार असलेल्या पाण्यामध्ये विषाणुंची असरकारकता कमी होते.

सध्या बाजारात नुकसानकारक किडीन्मध्ये रोग उत्पन्न करणारी कित्येक बुरशीजन्य कीटकनाशके उपलब्ध आहेत,  जे मुख्यत्वे पतंगवर्गीय व रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येतात. ज्या त्या बुरशीचे सुप्त बीजाणू (स्पोर) असतात. अशा बीजाणूंना जेव्हा शिफारशीप्रमाणे पाण्यात मिश्रण करुन पीकांवर फवारण्यात येते, तेव्हा हे बीजाणू झाडाच्या विविध भागांवर स्थिरावतात. हे बीजाणू किडीच्या संपर्कात येउन किडीवर त्यांची वाढ होणे खुप महत्वाचे असते. ह्या बीजाणूंच्या व्यवस्थित स्थिरीकरण व वाढीसाठी वातावरणात योग्य प्रमाणात आर्द्रता (७०% पेक्षा जास्त) असणे जरुरी असते. असे आर्द्रतायुक्त वातावरण किमान एक आठवड्यासाठी असणे आवश्यक असते. तसेच तापमानसुद्धा २५ ते ३० अंश से. असणे गरजेचे असते. जर अशा प्रमाणात अनुकुल वातावरण नसेल तर बुरशीजन्य कीटकनाशकांचा प्रभाव दिसुन येत नाही. किडीच्या प्रथमावस्थेत यांचा उपयोग केल्यास योग्य व त्वरित परिणाम मिळतात.

बुरशीजन्य जैविक कीटकनाशकांच्या फवारणीच्या अगोदर व फवारणीनंतर किमान एक आठवड्यापर्यंत अन्य रासायनिक कीटकनाशके फवारणे टाळावे. तसेच परजीवी किंवा परभक्षी कीटक शेतात सोडल्यानंतर अन्य कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी टाळावी. जरुर पडल्यास वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा उपयोग करावा.

जीवाणू (बीटी) व विषाणू (एन.पी.वी.) आधारीत कीटकनाशके एक प्रकारचे जठरविष असते. त्यामुळे त्यांचा प्रवेश किडीच्या आतड्यामध्ये होणे जरुरी असते. अशा जैविक कीटकनाशकांची फवारणी ज्या त्या यजमान किडीच्या खाद्य वनस्पतींवर होणे हिताचे असते. तसेच बुरशीजन्य व कृमीआधारीत जैविक कीटकनाशके हे स्पर्श विष आहेत. त्यामुळे त्यांचा स्पर्श/ संपर्क ज्या त्या यजमान किडीसोबत होणॆ महत्वाचे आहे.

शेतीपिकांमध्ये मुळकुज व इतर जमिनीतुन होणाऱ्या रोगांच्या जैविक नियंत्रणासाठी ‘ट्रायकोडर्मा’ हे जैविक बुरशीनाशक वापरले जाते. हे वापरताना जमिनीत योग्य प्रमाणात पोषण तत्व व आर्द्रता असणे खुप महत्वाचे असते. जमिनीचे तापमानही जास्त असणे योग्य नाही. जास्त सामू (pH) असलेल्या क्षारयुक्त जमिनीमध्ये ट्रायकोडर्माची कार्यक्षमता कमी होते.

जैविक नियंत्रणामध्ये ज्या जैविक नियंत्रकाचा उपयोग होतो, त्याची स्थानिक प्रजाती (Local Strain) असणे योग्य असते. आयात केलेल्या प्रजातींना नव्या विस्तारात स्थापन होण्यासाठी थोडा कालावधी लागतो, तर स्थानिक प्रजाती लवकर प्रस्थापित होतात.

जैविक नियंत्रके स्वत: बनवल्यानंतर अथवा बाजारातुन विकत घेतल्यानंतर ते कसे साठवावेत हे सुद्धा खुप महत्वाचे असते. ट्रायकोकार्ड मधुन अंड्याचे परजीवी कीटक बाहेर निघुन येतात. त्यासाठी ट्रायकोकार्डची खरेदी केल्यानंतर ते कमी तापमानात फ्रिजमध्ये साठवल्यास जवळजवळ एक आठवडा त्यातुन निघणाऱ्या परजीवी कीटकांना अंड्यामधुन निघण्यापासुन रोखता येते. जीवाणू, बुरशी, विषाणू किंवा कृमी आधारीत जैविक कीटकनाशके कायम थंड व कोरड्या जागेवर साठवल्यास त्यांची गुणवत्ता टिकुन राहते.

ज्या त्या जैविक कीटकनाशक/बुरशीनाशकांवर त्यांच्या उत्पादनाची तारिख (Date of Manufacturing) व वापरण्याची तारिख (Date of Expiry) दर्शवलेली असते. ह्या कालावधीनंतर त्यांचा उपयोग करण्यात आल्यास त्यांची असरकारकता कमी होते. चांगल्या परिणामांसाठी ते मुदत पुर्ण होण्याआधीच वापरणे हिताचे असते. जैविक नियंत्रकांचे फक्त ताजे मिश्रणच वापरावे.

कृषि विज्ञान केंद्र,
शारदानगर, बारामती, पुणे

 

Web Title: How to take care while using biological control agents for pest control?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.