Join us

'ई-पीक नोंदणी' करायला चुकाल तर योजनांना मुकाल, अशी करा नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 4:04 PM

शेतकऱ्यांना खरीप, रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील पिकांची नोंदणी ॲपद्वारे करता येते. 

शेती, शेतजमीन पडीक आहे  की लागवडीखाली तसेच त्या जमिनीत कोणते पीक किती क्षेत्रात घेतले जात आहे. यासह विविध प्रकारची माहिती शासनाला व्हावी, यासाठी महसूल विभागातर्फे ई-पीक पाहणी अॅपची निर्मिती करण्यात आली. शेतकऱ्यांना खरीप, रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील पिकांची नोंदणी ॲपद्वारे करता येते. 

त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या नोंदीसाठी १ जुलैपासून ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे. महसूल विभागातर्फे ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून सुरू करण्यात आला. त्यानुसार शेतकरी जर पीक घेत असतील तर दरवर्षी खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांची नोंदणी मोबाइल अॅपच्या माध्यमातून करावी लागते. परंतु गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम भागात नेटवर्कच्या अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात आले आहे.

ई-पीक पाहणी न केल्यास नवीन हंगामातील सातबारा उपलब्ध होणार नाही. पीकविमा योजनेचा लाभ मिळणार नाही. रेकॉर्डवर शेती पडीक दिसेल. हमीभाव केंद्रांवर शेतमाल विक्री करता येणार नाही. पीक कर्ज, शासनाकडून मिळणारी मदत व प्रोत्साहन तसेच शेतजमि- नीवर कृषी व महसूल विषयक योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी येतील. या सर्व लाभांसाठी ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे.

पुन्हा आला नवीन व्हर्जनई-पीक पाहणी करण्यासाठी ई- पीक पाहणी अॅप शेतकऱ्यांना आपल्या मोबाइलवर डाऊनलोड करावे लागेल. परंतु यंदा २.०.११ हा नवीन व्हर्जन इन्स्टॉल करावा लागेल. अपडेटेट हे व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध केला आहे. जुन्या व्हर्जनचे अॅप क्रियाशील ठरणार नाही.

ई-पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर कसा करावा

  1. सर्व प्रथम ॲन्ड्रॉइड मोबाईल मधील प्ले स्टोर https://play.google.com/store/apps/details?id=org.mahait.epeek  मधून ई पीक पाहणी हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करुन घ्यावे.
  2. त्यानंतर शेतकऱ्याने स्वत:चा मोबाईल क्रमांक नोंदवावा. 
  3. पुढे स्वत:चा जिल्हा, तालुका, गाव निवडा आणि खातेदार निवडा किंवा गट क्रमांक टाका. 
  4. ही माहिती भरुन झाल्यानंतर आपला परिचय निवडा आणि त्यानंतर पुन्हा होम पेजवर या.  
  5. होम पेजवर आल्यानंतर पीकाची माहिती भरा, पीकाची अचूक माहिती भरल्यानंतर खाते क्रमांक निवडा, पुढे भूमापन क्रमांक किंवा गट क्रमांक निवडल्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्र निवडा, पुढे हंगाम निवडा, त्यानंतर पीकाचा वर्ग निवडा, एक पीक असेल तर निर्भेळ पीक (एक पीक) निवडा, किंवा एका पेक्षा जास्त पीक असेल तर बहुपिक निवडा,
  6. हे झाल्यानंतर पिकाचे नाव निवडा, सिंचन पद्धत, लागवडीचा दिनांक या सर्व गोष्टी अचूकपणे भरल्या नंतर शेतकऱ्याने स्वत:च्या मोबाईलचे जीपीएस, स्थान (लोकेशन) चालू ठेवून शेतात उभे राहून  मुख्य पिकाचे छायाचित्र काढावे. ही महत्त्वाची प्रक्रिया असल्याने मुख्य पिकाचे छायाचित्र काढताना शेतकऱ्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 
  7. हे सर्व झाल्यानंतर माहिती समाविष्ट करावी. ई पीक पाहणी इतक्या सोप्या पद्धतीने करता येते.

ई-पीक पाहणी अंतर्गत खातेदाराची एकदाच नोंदणी करता येईल. 15 सप्टेंबरपर्यंत हंगाम निहाय पिकाची माहिती अक्षांश-रेखांशासह काढलेल्या पिकाच्या छायाचित्रासह अपलोड करण्यात येईल. 16 ते 30 सप्टेंबर दरम्यान मोबाईल ॲपमधील माहितीची अचूकता पडताळून आणि आवश्यक असल्यास दुरूस्ती करून तलाठ्याद्वारे कायम केली जाईल. खातेनिहाय पिकांची माहिती संबंधित डिजिटल स्वाक्षरीत 7/12 मधील गाव नमुना 12 मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. 

ऑक्टोबरपासून शेतकरी रब्बी हंगामाची पीक पाहणी अपलोड करू शकतात. एका मोबाईलवरून 20 खातेदारांची नोंदणी करता येणार असल्याने एखाद्या शेतकऱ्याकडे स्वत:चा स्मार्टफोन नसल्यास उपलब्ध होणारा दुसरा स्मार्टफोन वापरता येईल. अल्पवयीन खातेदाराच्या बाबतीत त्याचे पालक नोंदणी करू शकतात. सामायिक खातेदार त्यांच्या वहीवाटीत असलेल्या क्षेत्रातील पिकांची स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील.  

टॅग्स :खरीपशेती