मधपेट्या वसाहतीसह सुर्यफूल, करडई व मोहरीच्या पिकात ठेवल्यास त्याचे अनेक पटीने उत्पादन वाढते. पोत्याच्या संख्येत वाढ होते. पोत्यातील सुर्यफूलाचे वजन वाढते आणि तेलाच्या उत्पादनात वाढ होते. त्याचप्रमाणे मधपेट्या फळबागेत ठेवल्यास भरपुर फळधारणा होते आणि फळाचा आकार व वजन वाढते. ज्यावेळेस आपण शेतामध्ये मधपेट्या मधमाशासह ठेवतो, त्यावेळेस सदर वसाहतीपासून आपणास रु. १०००/- चा मध मिळाला तर शेती पिकाच्या उत्पादनात परागीभवन होऊन रु. १५०००/- ची वाढ होते यावरुन मधोत्पादनाच्या १५ पट शेती पिकाच्या उत्पादनात मधमाशाव्दारे परागीभवन होऊन वाढ होते हे दिसून येते.
जगविख्यात नामवंत शास्त्रज्ञ श्री. अल्बर्टआईनस्टाइन यांच्या मते ज्यावेळेस पृथ्वीतलावरील मधमाशा संपतील किंवा नाश पावतील तेव्हापासून चार वर्षाच्या आत पृथ्वीतलावरील संपूर्ण मानव जात नष्ट होईल. वरील सर्व माहितीवरून मधमाशा कोणत्याही जातीच्या जाळून उठवू नये. त्यांचा नाश करु नये आणि इतरांनाही त्यांचा नाश करु देऊ नये. आपण प्रशिक्षण घेतल्यास मधमाशापालनाचे फायदे समजतील: आणि त्यांचा अभ्यास केल्यास मधमाशा मानवासाठी एक आदर्श किटक आहेत, ही बाब आपल्या निदर्शनास येईल. मधमाशापासून मध, मेण, पराग, विष, प्रोपॉलीस, रॉयलजेली है पदार्थ मिळतात हे पदार्थ व मधमाशांच्या वसाहती विक्री करुन आणि वसाहती भाड्याने देऊन पैसे मिळतात. मधमाशाव्दारे परागीभवनाबाबत शेतकऱ्यांनी स्वतः अनुभव घ्यावा.
परागीभवनासाठी मधपेट्याचे व्यवस्थापन
- परागीभवनासाठी ठेवण्याच्या मधपेट्या या मधमाशांनी पुर्ण भरलेल्या व जोमदार असाव्यात.
- एक हेक्टर क्षेत्रातील पीकांच्या परागीभवनासाठी मधमाशांच्या दोन ते तीन वसाहती ठेवणे आवश्यक आहे.
- वसाहत ठेवलेल्या सर्व क्षेत्रातील पीकांचे परागीभवन कमी वेळेत व कमी कार्यशक्तीमध्ये व्हावे यासाठी मधमाशांच्या वसाहती पिकाच्या मध्यभागी ठेवाव्यात.
- वसाहतींना मुंग्या, मुंगळे, लाल डोंगळे, पाली, सरडे व इतर शत्रुचा त्रास होणार नाही याकरीता पेटी लोखंडी किंवा लाकडी स्टँडवर ठेवावी. स्टँडच्या पायांना काळे तेल लावावे. म्हणजे वरील शत्रू पेटीकडे येणार नाहीत.
- वसाहती सावलीत ठेवाव्यात किंवा वसाहतीच्या वर छोटे मचान बांधावे.
- साधारण १० टक्के फुलोऱ्यात आलेल्या पिकांमध्ये मधपेट्या स्थलांतरीत कराव्यात.
अशाप्रकारे मधमाशांच्या वसाहतीचे परागीभवनाच्या दृष्टीने नियोजन व व्यवस्थापन केल्यास पिकांच्या उत्पादनात भरघोस वाढ होऊन एकुणच राष्ट्रीय उत्पन्नात भर पडेल.
शेतपिके व फळबागांमध्ये फुलोऱ्याची अवस्था अत्यंत महत्वाची असते. आपल्याकडे या काळात शेतकरी परागीभवनाच्या फायद्यासाठी पाळीव मधमाश्यांचा अजुनही वापर करीत नाहीत म्हणून शेतकऱ्यांना पिकाचा हंगाम गमवावा लागतो. मधमाशी कृषि संजीवकाची भुमिका पार पाडते हे आधुनिक पध्दतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अजुन ज्ञात नाही, असेच म्हणावे लागेल आणि विशेष म्हणजे आजच्या विज्ञान युगात मित्र किटकांच्या उपयुक्ततेकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेती व्यवसायाचे दरवर्षी कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते याची भानही आपल्याला नाही, म्हणून आगामी हरितक्रांतीसाठी स्वभावाने अत्यंत मवाळ अशा पाळीव सातेरी व इटालियन मधमाशांचा पिकांच्या जलद परागीभवनासाठी वापर करणे शेतकरी बांधवांना तारक ठरणार आहे.
डॉ. चिदानंद पाटील, डॉ. रणजीत कडू आणि डॉ. संदीप लांडगे
किटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी.
०२४२६-२४३२३४