Join us

राज्यात वाढत्या तापमानाच्या पाश्वभूमीवर पिकांची काळजी कशी घ्याल?

By मुक्ता सरदेशमुख | Published: October 06, 2023 7:00 PM

 राज्यात येत्या काळात परतीचा पाऊस येण्याची शक्यता नसल्याने काढणीला आलेल्या पीकांचे व्यवस्थापन व रब्बीसाठी आहे त्या ओलाव्यात पुढील पंधरा ...

 राज्यात येत्या काळात परतीचा पाऊस येण्याची शक्यता नसल्याने काढणीला आलेल्या पीकांचे व्यवस्थापन व रब्बीसाठी आहे त्या ओलाव्यात पुढील पंधरा दिवसात पेरणी करण्याचा सल्ला कृषी विज्ञान केंद्राने दिला आहे. दरम्यान, राज्यात पावसाने निरोप घेतला असून तापमानात येत्या ४८ तासांत वाढ होणार आहे. येत्या आठवड्यात हवामान कोरडे राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी शेतकऱ्यांनी पीकांचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्राने खालील कृषी शिफारशी केल्या आहेत.

सोयाबीनची घ्या अशी काळजी उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकात पानावरील ठिपके, रायझेक्टोनिया एरियल ब्लाईट, शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 500 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 25.9% 250 मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 150 ते 200 ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3% + इपिक्साकोनाझोल 5% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 300 मिली प्रति एकर फवारावे. उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकावर चक्री भुंगा, शेंगा पोखरणारी अळी, तंबाखू वरील पाने खाणारी अळी आणि केसाळ अळी या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. 

याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5 % - 60 मिली किंवा थायमिथोक्झाम 12.6% + लँम्बडा सायहँलोथ्रिन 9.5% (पूर्वमिश्रित कीटकनाशक) - 50 मिली किंवा इमामेक्टिन बेंझोएट 1.90 % - 170 मिली किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल 9.3 % + लँम्बडा सायहँलोथ्रिन 4.6 %- 80 मिली (पूर्वमिश्रित कीटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% - 100 ते 120 मिली यापैकी कुठलेही एक कीटकनाशक प्रती एकर याप्रमाणात फवारावे. शक्य असल्यास उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकातील उपटतण करून घ्यावे, जेणेकरून रब्बी हंगामात होणाऱ्या तणांचा प्रादूर्भाव कमी होईल.पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता, वेळेवर पेरणी केलेल्या व लवकर पकव होणाऱ्या सोयाबीनच्या जाती काढणीस तयार असल्यास स्वच्छ हवामानात पिकाची वेळेवर काढणी करावी. काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी किंवा ढिग करून झाकून ठेवावे. उशीरा पेरणी केलेल्या खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. 

बाजरीवर व उसावर करा फवारणी 

 उशीरा पेरणी केलेल्या बाजरी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून  फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. 

 ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

हळद पिकावर कंदमाशीचा प्रादुर्भाव 

हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). हळदीच्या पानावरील ‍ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 200 मिली किंवा प्रोपिकोनॅझोल 25% 200 मिली  किंवा क्लोरथॅलोनील 75% 500 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे पाण्यात मिसळून फवारणी करावी.  जेथे शक्य आहे तेथे हरभरा पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी. कोरडवाहू हरभरा पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाडयात करावी. जेथे शक्य आहे तेथे करडई पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी. हमखास पावसाच्या भागात करडई पिकाची पेरणी 15 ऑक्टोबर पर्यंत करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. संत्रा/मोसंबी बागेत फळकुज होऊ नये म्हणून फळ काढणीपूर्वी एक आठवडा 0.1 % बावीस्टीनची फवारणी करावी. काढणीपश्चात फळे 1% बावीस्टीनच्या द्रावणात बूडवून घ्यावीत. फळ काढणीनंतर बागेत 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. नविन लागवड केलेल्या डाळींब बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. रब्बी हंगामाकरिता लागणाऱ्या भाजीपाला पिकांच्या बियाण्याची गादी वाफ्यावर पेरणी केली नसल्यास पेरणी लवकरात लवकर करावी. भेंडी व काकडी वर्गीय पिकावरील भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्युटॅनील 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मागील काही दिवसात झालेला पाऊस, ढगाळ व दमट वातावरणामूळे, काकडीवर्गीय पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास क्लोरोथॅलोनिल 75% डब्ल्यूपी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

चारा पिके

चाऱ्यासाठी लागवड केलेल्या संकरीत नेपियर पिकाची  पहिली कापणी 65 ते 70 दिवसानी तर नंतरच्या कापण्या 40 ते 45 दिवसानी (7 ते 8 कापण्या) कराव्यात.

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटक (बॉम्बॅक्स मोरी) परिपक्व वाढ झाल्यावर या 15 व्या वाढीच्या अवस्थेत जातात. याच अवस्थतेत उझीमाशी प्रादुर्भाव करते. रेशीम किटकावर ग्रासरी, फ्लॅचरी व मस्करडीन रोगाच्या प्रादूर्भावामूळे 30 टक्के पर्यंत कोष पिकाचे नुकसान होते व उझी माशीच्या प्रादुर्भावामूळे 20 टक्के पर्यंत नुकसान होते. हे टाळण्यासाठी केलेले उपाय म्हणजेच नियंत्रण होय. कच्च्या शेडनेटचे हळू हळू पक्क्या संगोपन गृहात रूपांतर करणे. सरळ तुती फांद्या संगोपन शेडमध्ये आनून खाद्य न देणे. उझी नाश, उझी साईड व जैविक नियंत्रण करण्यासाठी उझी ट्रॅप आणि निसोलायनेक्स थायमस 2 पाऊच प्रति 100 अंडीपुज या प्रमाणे रॅकला लावणे. शेडमधिल उझी माशीचा प्रवेश थांबवणे. सर्व किटक विष्ठेसोबत उझी माशीचे कोष गोळा करून सील बंद करणे. विष्ठा खताच्या पोत्यात बांधून 25 दिवस ठेवणे तरच उझी माशीचे नियंत्रण मिळवता येईल.

पशुधन व्यवस्थापन

पशुसाठी चारा व्यवस्थापन : मराठवाडयाच्या अनेक भागामध्ये कमी पाऊस झाल्यामूळे भविष्यामध्ये पशुधनासाठी चारा टंचाई भासू शकते. यासाठी असलेल्या पडकातील गवत, द्विदल व तत्सम पशुची चारा पीके याचे सायलेज (मूरघास) स्वरूपामध्ये जतन, तसेच रब्बी हंगामामध्ये ज्वारीसारखे पीक घेऊन कडबा उत्पादन करणे, ईतर पीकांचे काड घेऊन त्यावर युरीया-मोलॅसेस यांची ट्रीटमेंट करून वापरणे. ईत्यादी उपाय अमलात आणण्याची गरज आहे व त्यासाठी सर्वांनी तयारी केली पाहिजे.

टॅग्स :शेतकरीपीक विमापीककृषी विज्ञान केंद्र