Join us

संत्रा उत्पादक शेतकरी संकटात; शासन मदत करणार तरी कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 1:47 PM

संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

अजहर अली  फेब्रुवारी महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने संग्रामपूर तालुक्यातील १ हजार ९३७.१५ हेक्टरवरील विविध फळ पिकाचे नुकसान झाले आहे.  यामध्ये सर्वात जास्त नुकसान संत्रा पिकाचे १ हजार ९०५.८० हेक्टर क्षेत्रावर झाले आहे. शासनाकडून फळ पिकांना हेक्टरी ३६ हजार रुपये मदतीची घोषणा करण्यात आली. 

मात्र, अद्याप एकाही गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली नाही. तसेच संत्र्याच्या आंबिया बहारला फळगळती लागल्याने संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

यंदा संत्र्याच्या मृग बहारची फूट नगण्य प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांची सर्व दारोमदार आंबिया बहारवर होती. मात्र, त्या बहारला प्रचंड फळगळती होत असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जाणार की काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. हिरावला संग्रामपूर तालुक्यात २ हजार ५५० हेक्टरवर संत्र्याच्या बागा बहरलेल्या आहेत. यातून ९५ टक्के क्षेत्रफळ उत्पादनक्षम आहे. येथील शेतकऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत करून संत्रा बागा जिवंत ठेवल्या. निसर्गाच्या लहरीपणामुळे संत्र्यावर संक्रांत येऊन ठेपली आहे.

यावर्षी आंबिया बहारला प्रचंड फळगळती लागली असून, मृग बहार नगण्य प्रमाणात आल्याने संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. गेल्या पाच वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे संत्रा बागांचे प्रचंड नुकसान होत असल्याने संत्रा उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. 

यावर्षी उत्पादन चांगले होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी संत्र्याची मशागत केली. मात्र, निसर्गापुढे संत्रा उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. संत्र्याच्या बागा फुलविण्यासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा खर्च आला.  यातून कोट्यवधीचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, फळगळतीने बागांना लागलेला खर्च तर सोडा मजुरीचा खर्च निघणे कठीण झाले आहे. 

संग्रामपूर तालुक्यातसुद्धा संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, निसर्गाच्या प्रकोपाने दरवर्षी संत्रा पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे येथील संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक डबघाईस आला आहे. शासनाकडून भरीव मदतीची मागणी संत्रा उत्पादक शेतकरी करत आहेत.

गारपीटग्रस्त नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने संग्रामपूर तालुक्यातील १ हजार ९३७.१५ हेक्टरवरील विविध फळ पिकाचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वात जास्त नुकसान संत्रा पिकाचे १ हजार ९०५.८० हेक्टर क्षेत्रावर झाले आहे. शासनाकडून फळ पिकांना हेक्टरी ३६ हजार रुपये मदतीची घोषणा करण्यात आली. मात्र, अद्याप एकाही गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली नाही.

अत्यल्प प्रमाणात फुटलेल्या आंबिया बहारला प्रचंड फळगळती लागली आहे. यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी. - कैलास शर्मा, संत्रा उत्पादक शेतकरी, सोनाळा, ता. संग्रामपुर 

टॅग्स :शेती क्षेत्रशेती