कृषी पणनच्या आंबा महोत्सवाला पुणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून शेतकऱ्यांकडून थेट ग्राहक आंबा विक्री झाली.१ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. महोत्सवात सुमारे २.४० लाख डझन आंब्याची विक्री झाली असून १५.५० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे कृषी पणन मंडळाने सांगितले.
दरवर्षी पुण्यात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यात विक्री व्यवस्थेतील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य भाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा आंबा मिळावा हा या महोत्सवाचा उद्देश आहे.
यंदा महोत्सवाच्या सुरुवातीस म्हणजे एप्रिलपासूनच आंब्याची आवक चांगली राहिली. मागील वर्षी अवकाळी पाऊस, दिवसा तापमानवाढ व रात्री थंडी असे हवामान होते. परंतू यंदा चांगले हवामान राहिल्याने आंब्याला मोहोर येणे, आंबा तयार होणे या प्रक्रीया चांगल्या झाल्या.
यंदा आंबा महोत्सवात एकुण ७० स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. यामधील १० स्टॉल जिल्हापरिषदेच्या महिला बचत गटांना ६० स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते.
महोत्सवाच्या पहिल्या आठवड्यात देवगड हापूसची चांगली आवक झाली. १५ मे पर्यंत या आंब्यांची चांगली आवक राहिली. त्यानंतर रत्नागिरी भागातील आंब्याची आवकही नंतर वाढली. रत्नागिरी आणि देवगड भागातील आंब्यांचे दर साधारणपणे वजन व दर्जानुसार ७०० ते ११०० रुपये तर ५०० ते १००० रुपये प्रति डझन असा या दोन आंब्यांना भाव मिळाला.