मागील काही वर्षात मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी हुमणी अळीचा प्रादुर्भाव सोयाबीन ,ऊस ,हळद इत्यादी पिकावर आढळून येत आहे. हुमनी अळीचा प्रादुर्भाव वाढण्यास हवामानातील बदल व एप्रिल मध्ये होणारा अवकाळी पाऊस सुद्धा कारणीभूत असतो.
कारण वळवाचा पाऊस पडल्याबरोबर हुमणी अळीचे कोशातून भुंगे बाहेर पडतात व बाभुळ, कडुलिंब ,बोर इत्यादी झाडावर त्यांचे गुण होऊन लगतच्या शेतामध्ये अंडे द्यायला सुरुवात करतात. तरी हुमनी अळीचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी आतापासूनच खालील प्रमाणे सामुदायिक पद्धतीने उपयोजना करणे गरजेचे आहे.
हुमणी बहुभक्षी कीड असून भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये आढळून येते .महाराष्ट्रात बऱ्याचशा भागांमध्ये या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो.
ओळख
या किडीचा प्रौढ भुंगा मजबूत बांध्याचा लालसर तपकिरी रंगाचा असतो. अळी पांढरी असून तिचे डोके गडद तपकिरी रंगाचे असते. तिला तीन पायाच्या जोड्या असतात. शेतात नांगरणी करताना किंवा शेणखताच्या खड्ड्यात हमखास दिसणारी इंग्रजी सी अळी म्हणजे हुमणी होय.
नुकसानीचा प्रकार
हुमणीचा अळी अवस्था पिकांना नुकसान पोचविते तर प्रौढ भुंगा बाभूळ कडूलिंब बोर इत्यादी झाडावर उपजीविका करतात अळी पिकांची मुळे कुरतोडून खातात. त्यामुळे झाड सुरुवातीला पिवळे पडते आणि नंतर वाळून जाते प्रादुर्भावग्रस्त झाडे सहज उपटली जाऊ शकतात.
या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने एका रेषेत असतो उसाची एक बेट एक आळी तीन महिन्यात तर दोन किंवा जास्त अळ्या एका महिन्यात संपूर्ण मुळ्या कुरतडून बेट कोरडे करतात. उसाच्या उगवणीत ४०% नुकसान होते एकरी दहा हजार ते वीस हजार प्रती आ ळ्या असल्यास उसाचे १५ ते २० टक्के नुकसान होते.
खाद्य वनस्पती
प्रामुख्याने खरीप हंगामात सोयाबीन ,कापूस, जवारी ,भात, ऊस, भुईमूग, भाजीपाला पिके, हळद, टोमॅटो, गहू, हरभरा या पिकांवर आढळून येते.
जीवनक्रम
सर्वसाधारणपणे पहिल्या पावसानंतर मे किंवा जून मध्ये प्रौढ भुंगे सुता अवस्थेत बाहेर निघतात. संध्याकाळच्या वेळी प्रौढ भुंग्यांचे मिलन बाबूळ किंवा कडुलिंबाच्या झाडावर होते. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी सकाळी मादी जमिनीमध्ये सात ते दहा सेंटीमीटर खोलीवर अंडी घालते.
एक मादी ५० ते ७० अंडी घालते. अंडी ९ ते २४ दिवसांमध्ये उबतात व त्यातून आळी बाहेर पडते. प्रामुख्याने नोव्हेंबर डिसेंबर मध्ये प्रौढ निघतात. हे प्रौढ जमिनीमध्ये सुप्त अवस्थेत राहून मे जून मधील पावसानंतर बाहेर निघतात. या किडीची एका वर्षामध्ये एकच पिढी होते. खरीप हंगामामध्ये या किडीचा मुख्यत्व करून प्रादुर्भाव होतो.
आर्थिक नुकसानीची पातळी
एक अळी प्रति चौरस मीटर. झाडावर सरासरी २० अगर त्यापेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास , हुमणीग्रस्त शेतात पावसाळ्यात कडूनिंब अथवा बाभळीची पाने अर्धचंद्रकृती खाल्लेली आढळल्यास व्यवस्थापनाची उपाय करावेत.
एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचे उपाय
१) उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी.२) मे जून महिन्यात पहिला पाऊस पडतात भुंगेरे सूर्यास्तानंतर जमिनीतून बाहेर येऊन बाभूळ कडूनिंब इत्यादी झाडांवर पाने खाण्यासाठी व मिलनासाठी जमा होतात.३) झाडावरचे भुंगेरे रात्री आठ ते नऊ वाजता बांबूच्या काठीच्या साह्याने झाडांच्या फांद्या घालून खाली पाडावेत आणि ते गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्याचा नाश करावा.४) प्रादुर्भावग्रस्त भागात प्रक्षेत्रावरील शेतकऱ्यांनी सामुदायिकरीत्या प्रयत्न करणे गरजेचे आहे.५) तसेच जोपर्यंत जमिनीतून भुंगरे निघतात तोपर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवणे गरजेचे आहे.६) भुंगे गोळा करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. सापळ्यातील भुंगे गोळा करून मारावेत.७) झाडांवर सरासरी २० किंवा त्यापेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास मे जून क्लोरोपायरीफॉस २०% प्रवाही २५ ते ३० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी. फवारणीनंतर दहा दिवस जनावरांना या झाडांची पाने खाऊ घालू नये. खुरपणी आणि कोळपणी वेळी शेतातील अळ्या नष्ट करावेत.८) जमिनीतून फोरेट दहा टक्के दाणेदार २५ किलो प्रती हेक्टरी याप्रमाणे द्यावे. अशाप्रकारे हुमणीचे सामूहिक रित्या शेतकऱ्यांनी एकात्मिक व्यवस्थापन केल्यास हुमणीचे यशस्वी व्यवस्थापन होईल..
प्रा. संजय बाबासाहेब बडे सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभागदादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव ता.वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर मो.नं. ७८८८२९७८५९
हेही वाचा - Animal Care नका भिजू देऊ गुरांना पावसात; आजारपणाची साथ घेऊन येईल आर्थिक हानी दारात