हुमनी अळीमुळे शेतातील उभ्या पिकांचे व फळबागांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच हुमनी अळीचा बंदोबस्त करून नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी शेतात प्रकाश सापळ्यांचा वापर करण्याचे आवाहन कृषी सहायक कमलाकर राऊत यांनी केले.
हुमणी अळीमुळे शेतातील उभ्या पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. या हुमनी अळीच्या नियंत्रणासाठी अळीचे प्राथमिक अवस्थेतील पतंगांचे निर्मूलन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी केज तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक येवले आणि कृषी अधिकारी कमलाकर राऊत यांनी शेतकऱ्यांची नुकतीच कार्यशाळा घेतली. यावेळी मार्गदर्शन करून त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले.
शेतातील प्रकाश सापळ्यामुळे शेतातील किडींचा चांगला बंदोबस्त होत असून त्याचे नियंत्रण करणे अगदी कमी पैशात सहज व सुलभ होत आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात अशा प्रकारचे प्रकाश सापळे लावण्याचे आवाहन यावेळ राऊत यांनी केले.
खोड, मुळ्या फस्त करते हुमनी
हुमनी अळीपूर्वीची पतंग ही त्याची प्राथमिक अवस्था असते. खरीप हंगामात ज्यावेळी पाऊस पडत नाही आणि अवर्षणजन्य स्थिती निर्माण होते.
■ त्यावेळी हुमनी अळीचे पतंग जमिनीत अंडी घालतात आणि त्या अंड्यातून निघालेली हुमणी अळी ही खोड व मुळे फस्त करते.
■ त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
असे करा नियंत्रण
शेतकऱ्यांनी लिंबाच्या किंवा बाभळीच्या झाडाखाली संध्याकाळी शेतात प्रकाशासाठी बल्ब लावून त्याखाली पसरट भांड्यात पाणी ठेवून त्यावर ऑइल किंवा रॉकेलसारखे खनिज द्रव्याचा थर पसरावा. त्या प्रकाशामुळे पतंग बल्बकडे आकर्षित होऊन भांड्यातील पाण्यात पडून खनिज द्रव्यामुळे मरतात. या पद्धतीने हुमनी अळीचे नियंत्रण करता येते.