केंद्र सरकारने मागचे वर्ष म्हणजे २०२३ हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले होते. तर या वर्षामध्ये तृणधान्याची जनजागृती, उत्पादन वाढवणे, त्यावर प्रक्रिया आणि मार्केटिंग संदर्भातील प्रकल्पाला चालना देण्यात आली. त्याचबरोबर जे आदिवासी बांधव तृणधान्य पिकवतात अशा बांधवांना केंद्र आणि राज्य सरकारकडून काही योजनाही राबवण्यात आल्या. दरम्यान, पणन मंडळाकडून आता कोल्हापुरात मिलेट महोत्सव भरवला आहे. त्या माध्यमातून तृणधान्यांपासून बनवलेले विविध पदार्थ कोल्हापुरकांना थेट उत्पादकांकडून विकत घेण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय कोल्हापूर व नाबार्ड महाराष्ट्र क्षेत्रिय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४ ते २७ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत व्ही.टी. पाटील स्मृतीभवन, राजारामपुरी, कोल्हापूर येथे ‘मिलेट महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात राज्याच्या विविध भागातून तृण धान्य उत्पादक, तृण धान्य प्रक्रिये मध्ये काम करणारे बचतगट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्या सहभागी होणार आहेत.
या महोत्सवामध्ये ४५ स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले असून, ग्राहकांना अस्सल ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा, कोद्राही तृणधान्ये व या पासून तयार करण्यात आलेला ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली-मिक्स, रागीचा डोसा मिक्स इत्यादी नाविण्यपूर्ण अशी असंख्य प्रकारची उत्पादने थेट उत्पादकांकडून विक्री साठी उपलब्ध असणार आहेत.
कोल्हापुरातील राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील स्मृती भवन येथे हे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून अजून दोन दिवस म्हणजे २७ फेब्रुवारीपर्यंत कोल्हापुरकरांना हे पदार्थ खरेदी करण्याची संधी आहे. सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ९ वाजेपर्यंत हा महोत्सव सुरू असणार आहे.