बारामती : भा.कृ.अनु.प – राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्थान, बारामती ने 21 फेब्रुवारी 2024 रोजी आपला 16 वा स्थापना दिन साजरा केला. महाराष्ट्रातील कृषी विज्ञान केंद्रे (के. व्ही. के.) आणि राज्य कृषी विभागांशी सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने भा.कृ.अनु.प.- रा.अ.स्ट्रै.प्र.सं आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्यात संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या संवाद बैठकीचा प्रमुख उद्देश संस्थेच्या अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख करून देत शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आणि शेतीच्या प्रगत पद्धतींसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे होता.
उद्घाटन कार्यक्रमात भा.कृ.अनु.प-डीएफआर, पुणेचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांच्यासह प्रमुख पाहुणे, डॉ.सी. एस. पाटील,विस्तार शिक्षण संचालक, एम.पी.के.व्ही. राहुरी आणि श्रीमती. रश्मी जोशी, उपविभागीय कृषी अधिकारी या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या. भा.कृ.अनु.प.- रा.अ.स्ट्रै.प्र.सं. चे संचालक डॉ. के. सामी रेड्डी यांनी कृषी शिक्षणाला चालना देण्यासाठी आय.ए.आर.आय. अंतर्गत नुकत्याच सुरू झालेल्या बी.एस.सी. कृषी कार्यक्रमावर प्रकाश टाकताना संस्थेच्या कामगिरीचा आणि भविष्यातील उपक्रमांचा सर्वसमावेशक आढावा मांडला.
संवाद बैठकीदरम्यान, केव्हीके आणि राज्य कृषी विभागांच्या प्रतिनिधींना महत्त्वपूर्ण अजैविक ताण व्यवस्थापन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. श्रीमती. रश्मी जोशी यांनी हितधारकांसाठी आवश्यक तंत्रज्ञान प्रदर्शित करण्याच्या भा.कृ.अनु.प.- रा.अ.स्ट्रै.प्र.सं.च्या उपक्रमाचे कौतुक केले आणि संस्थेत चालू असणार्या संशोधन प्रयत्नांना मनापासून पाठिंबा दर्शविला. डॉ. सी.एस.पाटील यांनी हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत पोहोचवण्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला, ज्यात केव्हीके अंमलबजावणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
या कार्यक्रमात भा.कृ.अनु.प.- रा.अ.स्ट्रै.प्र.सं. चे “शेतीतील अजैविक ताण कमी करणेः आशादायक तंत्रज्ञान" या विषयावरील बुलेटिचे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमधील प्रकाशनांचे प्रकाशन करण्यात आले. तंत्रज्ञान बुलेटिनमध्ये शेतकरी समुदायाला भेडसावणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अजैविक ताण कमी करण्यासाठी प्रभावी धोरणे आखण्यात आली आहेत. पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट शास्त्रज्ञ, तांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांना संस्थेच्या विकासातील अपवादात्मक योगदानाबद्दल गौरविण्यात आले. मुख्य अतिथी डॉ. के.व्ही. प्रसाद यांनी भा.कृ.अनु.प.- रा.अ.स्ट्रै.प्र.सं.च्या प्रगतीवर भाष्य केले, संस्थेच्या भविष्यातील कामगिरीबद्दल आशावाद व्यक्त केला आणि गेल्या 15 वर्षांत संस्थेने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी मैलाचा दगड ठरेल अशी आशा व्यक्त केली.
भा.कृ.अनु.प.- रा.अ.स्ट्रै.प्र.सं. - कृषी विज्ञान केंद्रे यांच्या संवाद बैठकीच्या उद्घाटनानंतरच्या तांत्रिक सत्रांमध्ये महाराष्ट्रातील के.व्ही.के. आणि राज्य कृषी विभागांतील सुमारे 73 निमंत्रित सहभागी झाले होते. या सत्रात नापीक जमीन परिवर्तन, जल-बचत पद्धती, हवामान-बदलाला सामोरे जाणारी शेती, खरीप चण्याची लागवड आणि चिया आधारित आंतरपीक यासारख्या नवीन पद्धतींचा समावेश असलेल्या 15 नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते . हे तंत्रज्ञान विशेषतः महाराष्ट्राच्या अर्ध-शुष्क प्रदेशात शाश्वत आणि हवामान बदलाला सामोर्या जाणार्या शेतीसाठी व्यावहारिक उपाय प्रदान करतात.
हा उपक्रम शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी हवामान बदलात तग धरून राहणार्या कृषी पद्धती वाढविण्याच्या भा.कृ.अनु.प.-रा.अ.स्ट्रै.प्र.सं.च्या वचनबद्धतेवर भर देतो. समारोप सत्रादरम्यान, प्रमुख पाहुण्यांनी पुनरुच्चार केला की या कार्यक्रमाने ज्ञानाची देवाणघेवाण आणि सहयोगी प्रयत्नांसाठी एक मौल्यवान व्यासपीठ म्हणून काम केले आहे. अर्ध-शुष्क प्रदेशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी तयार केलेल्या प्रदर्शित तंत्रज्ञानाचे नाविन्य आणि व्यावहारिकता मान्य करत सहभागींनी सकारात्मक अभिप्राय व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजक डॉ. एन. पी. कुराडे यांनी कार्यक्रमाचा समारोप करत आभार मानले.