Lokmat Agro >शेतशिवार > भात पिकातील प्रमुख किडींची ओळख आणि त्यांचे व्यवस्थापन

भात पिकातील प्रमुख किडींची ओळख आणि त्यांचे व्यवस्थापन

Identification and management of major pests in paddy crop | भात पिकातील प्रमुख किडींची ओळख आणि त्यांचे व्यवस्थापन

भात पिकातील प्रमुख किडींची ओळख आणि त्यांचे व्यवस्थापन

भात पिक उत्पादनामध्ये किड नियंत्रण महत्वाचे आहे. किडीचे नियंत्रण न केल्यास उत्पादन ३० ते ३५ टक्के कमी होत असल्याचे ...

भात पिक उत्पादनामध्ये किड नियंत्रण महत्वाचे आहे. किडीचे नियंत्रण न केल्यास उत्पादन ३० ते ३५ टक्के कमी होत असल्याचे ...

शेअर :

Join us
Join usNext

भात पिक उत्पादनामध्ये किड नियंत्रण महत्वाचे आहे. किडीचे नियंत्रण न केल्यास उत्पादन ३० ते ३५ टक्के कमी होत असल्याचे दिसून आले आहे. दिवसेंदिवस किटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने किडींमध्ये प्रतिकार क्षमता वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात इगतपूरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणाव दिंडोरी या तालुक्यामध्ये खरीप हंगामामध्ये भात हे प्रमुख पिक घेतले जाते. सध्या भात पीक वाढीच्या अवस्थेत असून अधिक उत्पादनासाठी किडीच्या प्रादुर्भावापासून वाचविण्यासाठी किडीचे व्यवस्थापनाविषयी माहिती असणे गरजेचे आहे.

भातावरील प्रमुख किडी: भात पिकात खोडकिडा, तपकिरी तुडतुडे, हिरवे तुडतुडे पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी, लष्कर अळी, उंदीर व खेकड़ा या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो.

१) खोडकिडा:
या किडीची अळी मळकट पांढऱ्या रंगाची असते. या किडीची अळी अवस्था खोडातील आतील गाभा खाते. त्यामुळे झाड वाळते यालाच डेडहार्ट म्हणतात.
नुकसानीचा प्रकार
अळीने खोड पोखरल्यामुळे प्रादुर्भाव दिसून येतो. पीक निसवण्याअगोदर प्रादुर्भाव झाल्यास फुटव्याचा पोंगा सुकून वाळतो. वाळलेला पोंगा सहजासहजी निघुन येतो. पानावर खोडकिडीची अंडी दिसून येणे ही खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यास लोंब्यांत दाणे भरत नाहीत त्याला पळीज असे म्हणतात.
नियंत्रण:
१. खोड किडीची अळी धसकटामध्ये सुप्तावस्थेमध्ये जात असल्यास पीक काढणी झाल्यानंतर धसकटे काढून ती जाळून टाकावीत. पिकाची कापणी जमिनीलगत करावी.
२. खोडकिडीच्या नियंत्रणासाठी रोपवाटीकेमध्ये पेरणीनंतर १५ दिवसांनी फोरेट १०% दाणेदार १० किलो किंवा क्विनॉलफॉस १.५% भुकटी १५ किलो प्रति हेक्टरी वापरावे. ३. प्रादुर्भाव दिसताच फॉस्फोमिडॉन ८५% २९५ मिली ५०० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२) तपकिरी तुडतुडे
नविन अधिक उत्पादन देणान्या जातीवर तपकिरी तुडतुड्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आढळतो. तुडतुड्यांचा आकार पाचरीसारखा असतो. तुडतुडे संडिच्या सहाय्याने खोडतून पानांतून रस शोषून घेतात. त्यामुळे पानांच्या कडा पिवळ्या पडतात व शेवटी वाळतात. शेतात ठिकठिकाणी किडग्रस्त भाताचे क्षेत्र गोलाकार करपलेले दिसते याला 'हॉपरबर्न' असे म्हणतात. तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झालेल्या रोपामध्यून ओव्या बाहेर पडत नाहीत पडल्या तरी दाणे पोचट असतात.
नियंत्रण:
या किडीचा प्रादुर्भाव आढळून येताच मॅलेथिऑन ५०% प्रवाही १००० मिली किवा मिथील डिमेटॉन २५% प्रवाही ४०० मिली ५०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी किंवा निमअर्क १०,००० पीपीएम १ मिली प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी किंवा ट्रायझोफॉस १ मिली प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.

३) पाने गुंडाळणारी अळी व सुरळ्यातील अळी:
या किडीच्या पतंगाची मादी पानाच्या पृष्ठभागाजवळ मुख्य शिरेजवळ अंडी घालते. अंडी उबविल्यानंतर बाहेर पडलेली अळी पानाची सुरळी करुन त्यामध्ये राहून पानातील हिरवा भाग खाते. अळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात सुरवातीस पांढरट पाने दिसून येतात. किड लागलेली पाने कालांतराने वाळतात.
नियंत्रण:
शेतामध्ये किडीचा प्रादुर्भाव आढळल्यानंतर मोनोक्रोटोफॉस ३६ डब्ल्यू.एस. सी. किंवा सुमिथीऑन ५०% किंवा मॅलेथिऑन ५०% किंवा कार्बारील ५० डब्ल्यु.एस.सी. अनुक्रमे ७०० मिली, ५०० मिली. १५०० मिली ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी किंवा कार्बारील १०% भुकटी २० किलो प्रति हेक्टरी धुराळणी करावी.

४) लष्करी अळी:
लष्करी अळी गर्द हिरव्या रंगाची असून तिच्या दोन्ही बाजुस दोन पांढरट पट्टे असतात. अळ्या रात्रीच्या वेळी भाताची पाने तसेच कोवळ्या लोंब्या कुरतडतात.
नियंत्रण:
१. भाताची कापणी झाल्याबरोबर नांगरट करावी.
२. अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच मोनोक्रोटोफॉस ३६ डब्ल्यु. एस. सी. किंवा सुमिधी ऑन ५०% किंवा मॅलेथिऑन ५०% अनुक्रमे ७०० मिली, ५०० मिली, १५०० मिली प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.
३. सायपरमेथ्रीन २५% १० लिटर पाण्यात २.५ मिली किंवा मिथिल पॅराथिऑन २% भुकटी हेक्टरी २० किलो या प्रमाणे धुरळणी करावी.

५) खेकडा:
खेकडा ही पश्चिम घाट विभागातील महत्वाची किड आहे. रोपवाटीकतील तसेच मुख्य शेतातील भाताची कोवळी रोपे रात्री जमिनीलगत कापून विळामध्ये खाण्यासाठी घेवून जातात. खेकडे खाचरात आणि बांधावर छिद्रे पाडतात. त्यामुळे पाणी भात खाचरात साचून राहात नाही.
नियंत्रण:
एक किलो शिजवलेला भात त्यात ४० ते ५० मिली मोनोक्रोटोफॉस मिसळून एकत्र करावे व थोडा भात संध्याकाळी ४ वाजेनंतर जिवंत बिळाजवळ ठेवावा.
वरीलप्रमाणे किडींचा बंदोबस्त केल्यास हमखास भात पिकाचे उत्पादन भरपूर प्रमाणात मिळेल.

प्रा. एस. आर. परदेशी
डॉ. डी. व्ही. कुसाळकर
प्रा. के. डी. भोईटे

प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र, इगतपुरी (नाशिक)
९४२३५४४२०७
 

Web Title: Identification and management of major pests in paddy crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.