नाशिक जिल्ह्यात इगतपूरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणाव दिडोरी या तालुक्यामध्ये खरीप हंगामामध्ये भात हे प्रमुख पिक घेतले जाते. भात पिकावर वेगवेगळ्या प्रकारच्या रोग व किडीच्या प्रादुर्भावामुळे भाताच्या उत्पादनात घट होत असते. या वर्षी पाऊस लांबल्यामुळे भात पिकात रोग उद्भवण्याची समस्या निर्माण होईल. परंतु सध्याच्या परिस्थितीत भातावर प्रामुख्याने कडा करपा, शेंडा करपा व पानावरील ठिपके सारखे रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भात पिकाचे रोग व किडींच्या प्रादुर्भावापासून वाचविण्यासाठी रोग व किडीच्या व्यवस्थापनाविषयी माहिती असणे गरजेचे आहे.
भातावरील रोगांची ओळख व नियंत्रण:
१) करपा
हा एक बुरशीजन्य रोग आहे. हा रोग पायरीक्युलॅरीया ओरायझो या बुरशीमुळे होतो. सुरुवातीला पानाचे टोकावर लक्षणे दिसतात. परंतु कधी-कधी पानांच्या कडेवर किंवा मध्यभागी पृष्ठभागावर पण दिसतात. या रोगाची सुरुवातीची लक्षणे म्हणजे पानाच्या रोगग्रस्त भागावर गोल लंबाकार अर्धपारदर्शक ठिपके दिसून येतात. जसे-जसे रोगाची तिव्रता वाढत जाईल ठिपक्याचे प्रमाण वाढून पानांवर फिक्कट तपकिरी रंगाचे अनेक ठिपके दिसतात. ठिपक्याची कडा गर्द तपकिरी असून हे ठिपके एकमेकात मिसळून पान पुर्णपणे करपतात. पाने करपल्याने पिकाची वाढ थांबते पाने करपल्याने अन्नद्रव्य तयार करण्याचे कामही मंदावते व त्यामुळे उत्पादनात घट होते. या रोगाची प्राथमिक सुरुवात रोगग्रस्त बियाणापासून होते. दुय्यम स्वरुपाचा प्रसार हवेमार्फत व रिमझिम पडणान्या पाऊसामुळे होतो.
नियंत्रण
१. या रोगाच्या नियंत्रणासाठी बिजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. भाताच्या बिजप्रक्रियेसाठी ३०० ग्रॅम मीठ + १ लिटर पाण्यात मिसळून (३०% मिठाचे द्रावण ) त्यात भात बियाणे टाकून तरंगणारे बियाणे काढून टाकावे व तळाला राहिलेले बियाणे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे व सावलीत सुकवावे. नंतर बियाण्यास ३ ग्रॅम थायरम ७५% किंवा कार्बोन्डिझम ५०% पाण्यात मिसळणारे २ ग्रॅम प्रती किलो बियाण्यास चोळून पेरणी करावी..
२. अतिरिक्त खतांचा वापर टाळावा शिफारशीनुसारच खताचे नियोजन करावे.
३. रोगप्रतिकारक जातीचा वापर करावा. उदा- जया, फुले मावळ, इंद्रायणी व फुले राधा
४. या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच कॉपर ऑक्झीक्लोराईड १२५० ग्रॅम किंवा डायथेन एम-४५ १२५० ग्रॅम किंवा कार्बेन्डेनझिम ५०० ग्रॅम ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
५. या रोगाचे जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हीरीडी १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) आभासमय काजळी
हा एक बुरशीजन्य रोग आहे. या रोगाची लागण युस्थेलॅजीनाईडी व्हायरेनस या बुरशीमुळे होतो.
लक्षणे:
भात फुलोऱ्यात आल्यानंतर ह्या रोगाची लक्षणे दिसतात. लोंबीतील काही फुलामध्ये दाणे भरण्याऐवजी शेंदरी रंगाच्या गाठी दिसतात. पुढे या गाठीचा रंग गर्द हिरवट मखमली होतो. या रोगाचा प्रसार रोगग्रस्त बियाण्यापासून होतो.
उपाय:
१. रोग प्रतिबंधक जातीचा वापर करावा व निरोगी बियाणे वापरावे.
२. पेरणीपूर्वी बियाणास थायरम किंवा व्हिटाव्हॅक्स या बुरशीनाशकाची २.५ ग्रॅम प्रति किलो बियाण्याला चोळावे.
३. रोगग्रस्त झाडे किंवा रोगट लोंब्या काढुन नष्ट कराव्या. ४. या रोगाच्या नियंत्रणसाठी ०.१ टक्के क्लोरोथॅलोनील किंवा प्रोपिकोनॅझोल या बुरशीनाशकाची फवारणी करावी.
३) उदबत्ता
हा एक बुरशीजन्य रोग आहे. हा रोग इफिलीस ओरायझी नावाच्या बुरशीमुळे होतो.
लक्षणे:
भात निसवल्यानंतर या रोगाची लक्षणे दिसतात. भात निसवल्यानंतर लांबी न येता त्या ठिकाणी उदबत्ती सारखे कठीण राखी रंगाची दांडी दिसते त्यामध्ये दाणे भरत नाही. या रोगाचा प्रसार रोगग्रस्त बियाण्यापासून होतो.
उपाय:
१. बियाण्यास पेरणीपुर्वी उष्णजल प्रक्रिया करावी त्यासाठी बियाणे ५० डिग्री सेंटीग्रेड तापमानाच्या पाण्यात १० मिनीटे बुडवावे. २. निरोगी बियाणे वापरावे किंवा रोगप्रतिबंधक जातीचा वापर करावा.
३. रोगग्रस्त झाडे उपटुन जाळून नष्ट करावीत..
४. बियाणे पेरणीपुर्वी थायरम किंवा व्हिटावॅक्स या बुरशीनाशकाची २.५ ग्रॅम प्रति किलो बियाण्याला चोळावे.
४) जिवाणूजन्य करपा
१. हा एक अणूजीवोद्भवी रोग आहे. रोगाच्या सुरुवातीला पानावर पिवळसर पांढरे अर्थ पारदर्शक ठिपके पडतात. ठिपक्यांची सुरुवात पानाच्या टोकाकडून देठाकडे आणि एक किंवा दोन्ही कडांकडून आत अशी होते.
२. रोगाची पूर्ण वाढ झाल्यावर संपूर्ण पान करपते आणि त्याचा रंग राखाडी किंवा तांबुस तपकिरी होतो. हवामान अनुकूल असल्यास रोगाचे जिवाणू पानाच्या शिरात शिरतात. त्यामुळे चुडांची संपूर्ण पाने करपतात. भात पिक जागच्या जागी बसते. अशा अवस्थेस क्रेसेक असे म्हणतात.
३. रोगाचा प्रसार रोगग्रस्त पेंढा, शेतातील धसकटे किंवा खोडवा, रोगग्रस्त बियाणे आणि बांधावरील इतर तण यामुळे होतो. पानावरील दव, शेतातील वाहते पाणी पाऊस आणि वारा इत्यादीमुळे रोगाचा दुय्यम प्रसार होतो. रोगग्रस्त पानांवरील अणू जिवाणू पानाच्या पृष्ठभागावर सकाळच्या वेळी भुकटीच्या स्वरुपात साचतात.
४. पानावरील पाण्यात ते विरघळून मग इतर पानावर पसरतात. नत्र खताच्या वाजवीपेक्षा जास्त मात्रा दिल्यास आणि रोगास अतिवळी पडणाऱ्या भात जातीची लागवड केल्यास रोगाची वाढ झपाट्याने होते.
नियंत्रण:
१. निरोगी बियाणे वापरावे किंवा रोगप्रतिबंधक जातीचा वापर करावा.
२. या रोगाच्या नियंत्रणासाठी बिजप्रक्रिया करणे आवश्यक आहे.
३. बियाण्यास पेरणीपूर्वी उष्णजल प्रक्रिया करावी त्यासाठी बियाणे ५२ ते ५४ डिग्री सेंटीग्रेड तापमानाच्या पाण्यात १० मिनीटे बुडवावे.
४. अँग्रीमायसीनच्या द्रावणात बियाणे ८ तास भिजत ठेवणे आणि शेत हे तणमुक्त ठेवावे.
५. खतांचा संतुलित वापर करावा अतिरिक्त खतांचा वापर टाळावा शिफारशीनुसारच खताचे नियोजन करावे.
६. रोगबाधीत झाडे जाळून किंवा खोल नांगरट करुन नष्ट करावे..
७. नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन ३ ग्रॅम व कॉपर ऑक्झीक्लोराईड ३० ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या द्रावणाची फवारणी करावी.
५) टुंग्रो
हा एक विषाणूजन्य रोग आहे. या रोगाची लागण एका विशिष्ट घातक लसीमुळे होतो. रोगग्रस्त झाडे किंचीत फुटवे राहून फुटव्यांची संख्या कमी असते. तसेच रोगग्रस्त पाने आणि पर्णकोष यांचीही वाढ खुंटते. नंतर रोगग्रस्त पाने मध्य शिरेला समांतर अशी दोन्हीकडून आत वळतात. पानांचा रंग सुरुवातीस पिवळसर दिसतो व नंतर पिवळसर तपकिरी होतो. पानांवरील शिरांचा रंगसुध्दा पिवळसर होतो. रोगग्रस्त चुडे उशीरा फुलोन्यावर येतात आणि लोंब्या अर्धवट बाहेर पडतात. लांबीतील पळिजांचे प्रमाण जास्त असते आणि रोगग्रस्त लॉवीतोल दाणे वजनाने हलके असतात. त्यामुळे उत्पादनात बरीच घट होते. या रोगाचा दुय्यम प्रसार एका विशिष्ट जातींच्या तुडतुड्यांमुळे होतो. रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास थोड्या अवधीमध्ये मोठ्या क्षेत्रातील पिकाचे नुकसान होते.
नियंत्रण:
१. रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी.
२. लागवड वेळेवर करावी शक्यतो उशिरा करुन नये.
३. रोगबाधीत झाडे आढळल्यास उपटून नष्ट करावी
४. रस शोषणाच्या किडींच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही किटकनाशकांची फवारणी करावी.
५. भाताची कापणी झाल्यानंतर रोगवाधीत धसकटे वेचून नष्ट करावी व खोल नांगरट करावी.
प्रा. एस. आर. परदेशी
डॉ. डी. व्ही. कुसाळकर
प्रा. के. डी. भोईटे
प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र, इगतपुरी (नाशिक)
९४२३५४४२०७