Join us

सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या किडींची ओळख आणि त्यांचे व्यवस्थापन

By बिभिषण बागल | Published: August 30, 2023 9:19 PM

या पिकाखालील वाढलेले मोठे सलग क्षेत्र, नेमक्या जातींचा अंतर्भाव व एकाच शेतात तीच ती पिके घेणे यामुळे सोयाबीन पिकावर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे.

महाराष्ट्रामध्ये सध्या कपाशीबरोबर सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत आहे. या पिकाखालील वाढलेले मोठे सलग क्षेत्र, नेमक्या जातींचा अंतर्भाव व एकाच शेतात तीच ती पिके घेणे यामुळे सोयाबीन पिकावर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या किडींची ओळख आणि त्यांचे व्यवस्थापन पाहूया.

तंबाखूची पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा)या किडीचा पतंग मजबूत बांध्याचा असून पुढचे पंख तपकिरी रंगाचे असतात व त्यावर गडद चट्टे असतात तर मागचे पंख पांढुरके असतात. पुर्ण वाढ झालेली अळी हिरवट तपकिरी रंगाची, गुळगुळीत असून पाठिवर कडेने काळे त्रिकोणी ठिपके असतात.जीवनक्रम:या कीडीची मादी पतंग सोयाबीन पिकावर पानाच्या खालच्या बाजूने पुंजक्यानी अंडी घालते. अंडी अवस्था ३ ते ४ दिवस तर अळी अवस्था २१-२२ दिवस असते. पुर्ण वाढ झालेली अळी जमिनीत कोषावस्थेत जाते. कोषावस्था ९-१० दिवस असते. हवामान व खाद्य यांचे उपलब्धतेनुसार ती वाढू शकते. प्रौढावस्था जवळ जवळ ६-७ दिवसांची असते. मादी प्रौढ कोषातून बाहेर येताच पानाच्या खाली अंडी घालणे सुरु करतात. एक पिढी पुर्ण होण्यास साधारणपणे ३२ ते ६० दिवस लागतात पिकांवर असतांना ही पिढी साधारणपणे ३५ ते ४० दिवसात पुर्ण होते. कोषावस्था जमिनीमध्ये ३-१० से.मी. खोलीवर असते. ४ ते ७ दिवसांच्या उघाडीनंतर चांगला पाऊस झाल्यास या कीडींचे वाढीसाठी पोषक वातावरण तयार होऊन तिची संख्या वाढते.नुकसान:या कीडीने पुंजक्यात घातलेल्या अंडीमधून लहान लहान अळ्या समुहात बाहेर पडतात व प्रथमतः त्याचे पानातील हरीतद्रव्य मागील बाजुने राहून खातात. त्यामुळे पाने जाळीदार व कागदी होऊन पांढरी होतात. त्यावर कीडीच्या विष्टेचे कण सुध्दा दिसतात. अशा प्रकारचे नुकसान इतरत्र आढळते. याच अळ्या नंतर मोठ्या होऊन स्वतंत्रपणे पाने तसेच कोवळे शेंडे, फुले व कोवळ्या शेंगा खातात व पिकाचे नुकसान करतात. ही अत्यंत खादाड कीड असल्यामुळे संख्या वाढताच अतोनात नुकसान करतांना दिसून येते ही बहुभक्षी कीड असल्यामुळे ती सोयाबीन सोबतच कापूस, तंबाखू, डाळावर्गीय पिके सुर्यफुल आणि कोबीवर्गीय पिकावरील सुध्दा महत्वाची कीड आहे. शिवाय ती एरंडी, मका, टोमॅटो, उडीद, मिरची, कांदा इत्यादी पिकांकरीता नुकसानकारक आहे.

उंटअळी (सेमी लूपर)सोयाबीनवर विविध प्रकारच्या उंट अळ्या आढळून येतात. महाराष्ट्रामध्ये उंटअळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. अळ्या हिरव्या व करड्या रंगाच्या असून त्या पाठिवर बाक काढून चालतात. या कीडीचा पतंग तांबड्या रंगाचा असून त्याच्या पुढील पंखावर वैशिष्टयपूर्ण असा सोनेरी पिवळ्या रंगाचा त्रिकोणात्मक भाग असतो. मागील पंखाचे किनाऱ्यावर गर्द ठिपके असतात.नुकसान:या अळ्या सुरुवातीला पानाचा खालचा हिरवा भाग खरवडून काढतात. त्यामुळे त्यावर पांढरे वेडेवाकडे डाग दिसतात. पुर्ण वाढ झालेल्या अळ्या पाने खावून फक्त शिरा ठेवतात. जास्त प्रादुर्भा झाल्यास अळ्या फुले व शेंगा खातात. लहान अळ्या सुरुवातीलाच पानाचा पृष्ठभाग कुरतडतात व जाळीदार करतात. मोठ्या अळ्या पाने खाऊन फक्त शिराच शिल्लक ठेवतात. तीव्र प्रादुर्भाव असल्यास झाडे पर्णहीन होतात. ही बहुभक्षीय कीड असून ती कपाशी, कोबी, फुलकोबी, सुर्यफुल, तुर, उडीद, तीळ इत्यादी पिकाचे नुकसान करते. कमी तापमान आणि जास्त पाऊस या कीडीच्या वाढीस अनुकूल असतो.

पाने पोखरणारी व गुंडाळणारी अळी (लीफ मायनर)पतंग लहान व करड्या रंगाचे असतात. त्यांचे पुढील पंखावर टोकाकडील मागच्या किनाऱ्यावर पांढरा ठिपका असतो. मागील पंख दातेरी असतात. अळी पाने गुंडाळते व आत राहून पाने पोखरते. कीडग्रस्त पाने कपासारखी अथवा चोचेसारखी दिसतात. ती गळून पडतात.

केसाळ अळी (डेअरी कॅटरपिलर)लहान अळ्या सामूहिकपणे पानातील हरितद्रव्य खातात. मोठ्या अळ्या शेतभर पसरतात व पाने खातात. कीडीच्या प्रादुर्भावाने दाण्याचा आकार लहान होतो.

घाटेअळीघाटेअळी ही कपाशीवरील अमेरीकन बोंडअळी म्हणून सुध्दा ओळखली जाते. ही कीड वातावरण पोषक असल्यास सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. महाराष्ट्रामध्ये ही कीड सध्या सोयाबीनच्या पिकाला हानी पोहोचवित आहे. बहुजातीय पिकांना नुकसान करणारी ही कीड असून जवळपास सर्व राज्यांमध्ये विविध पिकांचे नुकसान करते. ही कील प्रामुख्याने सोयाबीन व्यतिरीक्त कापूस, हरभरा, तूर, मका, ज्वारी, सूर्यफुल, करडई, तंबाखू, भेंडी, कोबी इत्यादी पिकांवर तसेच विविध तणांवर उपजिविका करते. कळ्या, फुले व शेंगा लागल्यानंतर ही अळी त्यांना नुकसान पोहोचविते. अळीने प्रादुर्भावग्रस्त कळ्या, फुले व कोवळ्या शेंगा जमिनीवर पडतात. या अळीची विष्ठा पानांवर, शेंगांवर, जमिनीवर पडलेली आढळते.

सोयाबीन वरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन- सोयाबीनची लागवड करण्यापूर्वी शेतात उन्हाळी नांगरट करावी.- मुख्य पिकाभोवती एरंडी आणि सुर्यफुल या सापळा पिकाची एक ओळ लावावी आणि तंबाखूवरील पाने खाणारी अळी आणि केसाळ अळी यांची प्रादुर्भावग्रस्त पाने अळ्यासहीत नष्ट करावीत.- पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपवावी. सरी वरंबा किंवा पट्टा पध्दतीने लागवड केल्यास किटकनाशकाची फवारणी करणे सोयीचे होईल.- पिकाच्या सुरुवातीचे अवस्थेत पीक तणमुक्त ठेवावे. बांधावर असणाऱ्या किडीच्या पुरक वनस्पतीचा नाश करावा.- शेतात अगदी सुरुवातीला किड रोग ग्रस्त झाडे दिसताच नष्ट करावीत.- केसाळ अळी तसेच तंबाखुची पाने खाणारी अळी, एकाच पानावर पुंजक्याने अंडी घालतात व त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरुवातीला एकाच पानावर बहुसंख्य असतात, अशी अंडी व अळीग्रस्त पाने अलगद तोडून किडीसह नष्ट करावीत- पिकांची फेरपालट करावी. सोयाबीन पिकांनतर भुईमुगाचे पीक घेऊ नये.- हिरवी घाटेअळी व स्पोडोप्टेरा या किडीची प्रादुर्भावाची पातळी समजण्याकरीता सर्वेक्षणाकरीता प्रत्येक किडीसाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे शेतात लावावेत. सापळ्यामध्ये प्रतिदिन ८ ते १० पतंग सतत ३ दिवस आढळल्यास किडीच्या नियंत्रणाची उपाययोजना करावी आणि जमा झालेले पतंग रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत.- किडींनी आर्थिक नुकसान संकेत पातळी ओलांडल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा. 

रासायनिक व्यवस्थापनउंट अळीसाठी१) प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही २० मि.ली. / १० लि पाणी किंवा२) क्लोरँटॅनिलीप्रोल १८.५ टक्के ३.० मि.ली. / १० लि. पाणी किंवा३) इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के ५.५ ते ७.५ मि.ली. / १० लि. पाणी किंवा४) लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ६ मि.ली. / १० लि. पाणीसर्व प्रकारच्या पाने खाणाऱ्या अळ्यांसाठीइंडोक्झाकार्ब १५.८ टक्के ५.५ ते ७.५ मि.ली. / १० लि. पाणी

प्रा. डॉ. उपेंद्र कुलकर्णीसहयोगी प्राध्यापक, किटकशास्त्र विभाग, डॉ.पं.दे.कृ.वि., अकोला.प्रा. डॉ. राजीव घावडेसहायक प्राध्यापक (वनस्पती रोगशास्त्र) प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणखरीपपीकशेतकरी