कपाशीवर जवळपास २१ प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो परंतु त्यापैकी १० ते १२ किडीच पिकाचे जास्त नुकसान करतात. पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत कपाशीचे रस शोषक किडींच्या प्रादुर्भावामुळे भरपूर नुकसान होत असल्याचे निदर्शनास येते. रस शोषक किडींच्या व्यवस्थापनाकरीता होणारा रासायनिक किटकनाशकांचा खर्च कमी करुन पर्यावरणास पुरक अशा एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास किडींचे व्यवस्थापन कमी खर्चाचे आणि परिणामकारक होण्यास मदत होईल. त्याकरीता कापूस पिकावरील रस शोषक किडींची ओळख असणे महत्वाचे आहे.
कपाशीवरील रस शोषक किडी:
१) मावा:
- कपाशीवर सुरुवातीच्या अवस्थेत आणि शेवटी/फरदडीवर डिसेंबर जानेवारी महिन्यात माव्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.
- मावा आकाराने लहान लांबट, मऊ असून रंग पिवळसर हिरवा असतो.
- पूर्ण वाढ झालेला मावा आणि पिले पानाच्या खालच्या बाजूस तसेच कोवळया शेंडयावर समूहाने राहून पानांतील रस शोषण करतात. त्यामुळे पाने खालच्या बाजूस वळतात, वेडीवाकडी होतात. ग्रामीण भाषेत कपाशीवर कोकडा आला असे म्हटले जाते.
- खूप जास्त प्रादुर्भाव असल्यास मावा आपल्या शरीरातून चिकट स्त्राव बाहेर टाकतो तो पानांवर पसरतो आणि त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे वनस्पतीच्या अन्न तयार करण्याच्या क्रियेत बाधा येते आणि झाड अशक्त राहून वाढ खुंटते.
- पिकाच्या शेवटच्या अवस्थेत माव्याचा प्रादुर्भाव झाल्यास बोंडे नीट उमलत नाहीत आणि कापसाची प्रत खराब होते.
- माव्याच्या एका वर्षात १२ ते १४ पिढ्या पूर्ण होतात. रिमझिम पाऊस, थंड आणि आद्र हवामानात प्रादुर्भाव जास्त वाढतो. मात्र जोराच्या पावसाने प्रादुर्भाव कमी होतो.
२) तुडतुडे:
- किडीचा प्रादुर्भाव जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु होतो. मात्र पूर्व हंगामी कपाशीवर तुडतुड्यांचा जास्त प्रादुर्भाव निदर्शनास येतो.
- तुडतुडे पाचरीच्या आकाराचे असून रंग फिक्कट हिरवा असतो. तुडतुडे तिरकस चालतात.
- प्रौढ तुडतुडे आणि पिल्ले पानाच्या खालच्या बाजूस राहून रस शोषतात त्यामुळे सुरुवातीस पानांच्या कडा पिवळसर पडतात. पाने आतल्या बाजूने वळतात. कालांतराने पानांच्या कडा लालसर होतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास पूर्ण झाडाची पाने लाल होतात आणि जळल्यासारखी दिसतात. याला ‘हॉपर बर्न’ असे म्हणतात.
- रिमझिम पाऊस, अधूनमधून तापणारे उन, ढगाळ वातावरण तुडतुडयांच्या वाढीस पोषक असते. एकाच गटातील किटकनाशकांच्या (निओनिकोटीनॉईड) अविवेकी आणि अवास्तव वापरामुळे तुडतुड्यांमध्ये प्रतिकारकता निर्माण झाली आहे.
- कपाशीची उशीरा लागवड आणि नत्रयुक्त खतांच्या अवास्तव वापरामुळे किडीच्या प्रादुर्भावाचे प्रमाण वाढते.
३) फुलकिडे:
- पीक वाढीच्या सुरुवातीस पावसात खंड पडल्यास फुलकिड्यांच्या वाढीस अनुकूल वातावरण तयार होऊन मोठया प्रमाणात प्रादुर्भाव होतो. रोपावस्थेत (पेरणीपासून ४५ दिवस) प्रादुर्भाव झाल्यास पिकाची वाढ खुंटते. पात्या आणि फुले उशिरा लागतात. अविकसित पात्यांची गळ होते आणि उत्पादन घटते.
- फुलकिडे लांबट आकाराचे फिक्कट पिवळसर रंगाचे असून लक्षपूर्वक पाहिल्या पानांच्या मागील बाजूस शिरांजवळ चपळाईने फिरतांना दिसतात. प्रौढ आणि पिल्ले पानांच्या मागील बाजूस शिरेजवळ राहून पान खरवडून त्यातून निघणारा रस शोषण करतात.
- फुलकिड्यांनी खरवडलेल्या भागावर पांढुरके चट्टे पडतात. उन्हात तो भाग चमकतो. प्रादुर्भावग्रस्त भागातील पानांच्या पेशी शुष्क होतात. पाने वरच्या बाजूस वळतात आणि लांबट दिसतात. खूप जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने कडक होतात आणि फाटतात.
- पात्या आणि बोंडावरही फुलकिडयांचा प्रादुर्भाव निदर्शनास येतो. झाड निस्तेज दिसते आणि वाढ मंदावते.
४) पांढरी माशी:
- पांढरी माशी आकाराने १ ते २ मिमि असून पंख पांढरे किंवा करड्या रंगाचे असतात. शरीरावर पिवळसर झाक असते.
- प्रादुर्भाव सप्टेंबर महिन्यापासून सुरु होऊन कमी पाऊस आणि अधिक तापमानात (३०० सें पेक्षा जास्त) म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जास्त वाढतो.
- प्रौढ माशी आणि पिल्ले पानाच्या मागच्या बाजूस राहून रस शोषण करतात त्यामुळे पाने कोमेजतात. पिल्ले शरीरातून गोड चिकट स्त्राव बाहेर टाकतात त्यावर काळया बुरशीची वाढ होते आणि झाडाच्या अन्न तयार करण्याच्या क्रियेत बाधा येते. परिणामी झाडाची वाढ खुंटते.
- पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव तीव्र स्वरुपाचा असल्यास पाने लालसर ठिसूळ होऊन वाळतात. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनावर आणि प्रतिवरही अनिष्ट परिणाम होतो.
- पांढऱ्या माशीमुळे कपाशीवरील लिफ कर्ल या विषाणू रोगाचा प्रसार होतो.
५) पिठ्या ढेकूण:
- पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव प्रथम बांधाकडील ओळींवर सुरु होऊन त्यांचा प्रसार पूर्ण शेतात वारा, पाऊस, पक्षी, मुंगळे तसेच शेतात काम करणाऱ्या मजूरांच्या कपडयांना तसेच शेती अवजारांना चिकटून होतो.
- प्रादुर्भाव कपाशीचे कोवळे शेंडे, पाने, पात्या, हिरवी बोंडे आणि जास्त प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास खोडावर आणि मुळांवरदेखील आढळतो.
- प्रौढ आणि पिल्लांनी रस शोषण केल्यामुळे झाड अशक्त होते आणि झाडाची वाढ खुंटते. पिठया ढेकूणग्रस्त झाडांवरील बोंडे आकाराने लहान व वेडीवाकडी होतात.
६) लाल कोळी:
- कोळी आकाराने फारच लहान असल्याने पानांच्या खालच्या बाजूस शिरांजवळ फिरतांना लक्षपूर्वक पाहिल्यास सरावानेच दिसून येतात.
- पिल्ले आणि प्रौढ कोळी पानांतील रस शोषतात त्यामुळे प्रथम पानांवर फिक्कट पांढरे चट्टे पडतात.
- प्रादुर्भाव जास्त असल्यास पाने लालसर तपकिरी होतात, मुरगळतात आणि कडक होतात आणि वाळतात.
७) तांबडे ढेकूण:
- कीड लालसर रंगाची असून आकाराने लांबट असते. समोरच्या पंखावर काळा ठिपका असतो.
- प्रौढ ढेकूण आणि पिल्ले बोंडातील रस शोषून उपजिविका करतात त्यामुळे बोंडे नीट उमलत नाहीत आणि सरकीतील तेलाचे प्रमाणही कमी होते.
- पक्व आणि उमललेल्या बोंडावर मोठया प्रमाणात तांबडे ढेकूण दिसून येतात. किडीच्या विष्ठेमुळे रुईवर पिवळसर डाग पडून कापसाची प्रत कमी होते.
- तांबडे ढेकूण प्रादुर्भावग्रस्त सरकी पेरणीच्या दृष्टिने निरुपयोगी असते.
एकात्मिक व्यवस्थापन पद्धती
१) मशागतीय पद्धती:
- पिकांची योग्य फेरपालट करावी. ज्या शेतात कपाशीचे पीक घ्यावयाचे आहे तेथे उन्हाळयात भेंडी, टोमॅटो, अंबाडी अशी पिके घेण्याचे टाळावे.
- नत्रयुक्त खतांचा शिफारशीनुसारच वापर करावा.
- पेरणी योग्य अंतरावर करावी. कपाशीचे पीक दाटणार नाही याची काळजी घ्यावी. दाटलेले पीक किडींना आमंत्रण देते.
- स्वच्छ मशागत करावी. बांधावरील गाजरगवत, पांढरी फुली, कोळशी, तरोटा, कपाळफोडी, इत्यादि तणांचा बंदोबस्त करावा.
- कपाशीच्या पिकात मुग, उडिद, चवळी, मका, इ. पिकांचे आंतरपीक घ्यावे. त्यामुळे किडींच्या नैसर्गिक शत्रूंची वाढ व पोषण होण्यास मदत होते.
२) यांत्रिक पद्धती:
- पांढऱ्या माशीच्या सर्वेक्षाणाकरिता प्रती एकर ८ ते १० पिवळे चिकट सापळे तर व्यवस्थापनाकरीता प्रती एकर ४० सापळे शेतात लावावेत. असे चिकट सापळे घरीदेखील तयार करता येतात. त्याकरीता लोखंडी पत्र्याच्या तुकड्याला पिवळा रंग देऊन त्यावर एरंडीचे तेल किंवा ग्रीस लावून पिकाच्या उंचीच्या वर असे सापळे लावावेत. एरंडीच्या तेलास पंढरी माशी चिकटून मरते.
३) जैविक पद्धती:
- मावा किडीचे नैसर्गिक शत्रू उदा. लेडीबर्ड बीटल (ढालकिडा/डाबला) या कीटकाचे प्रौढ आणि अळया मावा किडीचे नैसर्गिकरित्या व्यवस्थापन करतात. त्याचप्रमाणे सिरफिड माशी या परभक्षी कीटकाच्या अळया देखील मावा किडीचे व्यवस्थापन करतात. क्रायसोपाची अळी तर मावा, तुडतुडे, बोंडअळयांची अंडी आणि लहान अळयांचा देखील नाश करते.
४) वनस्पतीजन्य कीडनाशके:
- पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत नीम तेल युक्त निंबोळी अर्क (३०० किंवा १५०० पीपीएम) ५ मिली किंवा नीम तेल ५ मिली अधिक १ ग्राम साबण चुरा प्रती लिटर पाण्यात मिसळून एक ते दोन फवारण्या कराव्यात.
५) रासायनिक पद्धती:
सर्वेक्षणाअंती किडींच्या संख्येने आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्याचे दिसून आल्यासच रासायनिक किटकनाशकांच्या फवारणीचे उपाय योजावेत.
कपाशीवरील किडींची आर्थिक नुकसानीची पातळी
किडीचे नांव | आर्थिक नुकसानीची पातळी |
मावा | १० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे किंवा १० मावा प्रति पान |
तुडतुडे | २ तुडतुडे प्रति पान |
फुलकिडे | १० फुलकिडे प्रति पान किंवा २५ टक्के पानांच्या मागील शिरांजवळ पांढरे चट्टे |
पांढरी माशी | ६ प्रौढ माशा किंवा १० पिल्ले प्रति पान |
पिठ्या ढेकूण | ५ ते १० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे |
कपाशीवरील रस शोषक किडींच्या व्यवस्थापनाकरीता खालीलपैकी कोणत्याही एका कीडनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
किडीचे नांव | किटकनाशकाचे प्रमाण प्रति १० लिटर पाण्यात |
मावा व तुडतुडे | फ्लॉनिकअमाईड ५०% डब्ल्यु जी ३ ग्राम (६० ग्राम), डायनोटेफ्युरोन २० एस जी ३ ग्राम (६० ग्राम), थायमेथोक्झाम २५% दाणेदार २ ग्राम (४० ग्राम) |
फुलकिडे | स्पिनटोराम ११.७% प्रवाही ८.४ मिली (१६८ मिली), फ्लॉनिकअमाईड ५०% डब्ल्यु जी ३ ग्राम (६० ग्राम), थायमेथोक्झाम २५% दाणेदार २ ग्राम (४० ग्राम) |
पांढरी माशी | डायफेंथियुरॉन ५० डब्ल्यु पी १२ ग्रॅम (२४० ग्राम), अफिडोपायरोपेन ५०g/lit DC २० मिली (४०० मिली), डायनोटेफ्युरोन २० एस जी ३ ग्राम (६० ग्राम), फ्लॉनिकअमाईड ५०% डब्ल्यु जी ३ ग्राम (६० ग्राम), क्लोथियानिडीन ५०% WDG १ ग्राम (२० ग्राम) |
शिफारस केलेले कीडनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी (एकरी २०० लिटर पाणी) असून चायना स्प्रेयर करीता पाण्याचे प्रमाण तेच ठेवून कीटकनाशकाचे प्रमाण दुप्पट करावे तर पॉवर स्प्रेयरचा वापर करावयाचा झाल्यास पाण्याचे प्रमाण तेच ठेवून कीटकनाशकाचे प्रमाण तीनपट करावे.
- डॉ. चारुदत्त द. ठिपसे
विषय विषेषज्ञ (पीक संरक्षण), कृषि विज्ञान केंद्र, अकोला
संपर्क: ८२७५४१२०६२