मित्रकीटक नुकसानकारक किडींपेक्षा आकाराने लहान असतात. ते किडीच्या अंगावर किंवा शरीरामध्ये राहतात. किंवा किडींच्या शरीरामध्ये, शरीरावर अंडी घालून तिला हळूहळू खातात. या परोपजीवी कीटकाची मादी यजमान किडीच्या अंड्यामध्ये अंडी घालते. त्यातून बाहेर आलेली अळी यजमान किडीच्या अंड्यातील गर्भाचा भाग खाते. ३ ते ४ दिवसांत अळी कोषावस्थेत जाते. अशा प्रकारे अंडी, अळी व कोष या तिन्ही अवस्था यजमान किडीच्या अंड्यातच पूर्ण होतात. कोषातून बाहेर पडलेला प्रौढ अंड्याला छिद्र पाडून बाहेर पडतो. या प्रक्रियेमध्ये यजमान किडीची अंडी उबण्याआधीच नष्ट होतात.
- क्रायसोपा: मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे,पिठ्या ठेकुण, किडी व अंड्याचे भक्षण करते. एका दिवसात एक क्रायसोपा ४६ शत्रू किडी व अंडी खाते.
- ट्रायकोग्रामा: ही माशी किडीच्या प्रत्येक अंड्यात आपली अंडी टाकते व किडीच्या अंड्याचा नाश करते. एक मादी २० ते २०० अंडी घालते.
- लेडी बर्ड बिटल: प्रौढ भुंगे व त्याच्या अळ्या मावा व तुडतुडे, फुलकिडे या किडी खातात. एक लेडी बर्ड बिटल प्रति दिवस ४० ते ५० मावा खाते, त्याच्या जीवनक्रमात पाच हजार मावा किडी खाते.
- सिरफीड माशी: या माशीची अळी अवस्था एका दिवसात १०० मावा किडी खाते.
- कातीन: कातीन विविध प्रकारच्या २ ते ३ अळ्या व किडीला एका दिवसात आपल्या जाळ्यात ओढुन खातात.
- गांधील माशी: ही माशी वेगवेगळ्या अळ्या पकडुन आपल्या घरट्यामध्ये घेऊन जातात व त्यानंतर खाद्य म्हणुन वापरतात, एक माशी प्रती दिवस २ ते ५ अळ्या अशा संपूर्ण जीवनात एकुण ८० ते ९० अळ्या घरट्यात नेऊन खातात.
- ड्रॅगन माशी व रॉबर माशी: ह्या माश्या प्रति दिवस ४ ते ५ विविध प्रकारच्या अळ्यांना व किडींना खातात.
- पेंट्याटोमीड ढेकुण: बोंडअळी, उंटअळी व इतर अळ्यांच्या शरीरात सोंड खुपसुन द्रव शोषुन घेतात व अळयांचा नाश करतात. एक ढेकुण एका दिवसात ५ अळ्या खातो.
- ओरीयस ढेकुण: प्रौढ व पिल्ले मावा, तुडतुडे, फुलकिडे व कोळी यांची अंडी व लहान अळ्यामध्ये सोंड खुपसुन द्रव्य शोषण करतात व किडींचा नाश करतात. एक ढेकुण एका दिवसात ५ ते ६ अळ्या खातो.
- प्रार्थना किड: हा कीटक भुंगा, अळ्या, ढेकुण इत्यादी किडींना खातो.
- रेडयूव्हीड ढेकुण: विविध प्रकारच्या अळ्याच्या शरीरात सोंड खुपसुन द्रव शोषतात व त्यामुळे अळ्या मरतात.
- मोठ्या डोळ्याचे ढेकुण: हे ढेकुण मावा, तुडतुडे, व विविध प्रकारच्या लहान अळ्याच्या शरीरात सोंड खुपसुन द्रव शोषतात व त्यामुळे अळ्या मरतात.
- टेकनीड माशी: मावा, तुडतुडे, फुलकिडे खातात, ही माशी भुंगे व नाकतोड्याच्या व इतर पंतगवर्गीय किडीच्या अळीवर स्वताःची अंडी टाकतो व माशीची अळी अंडयामधुन बाहेर पडुन किडीच्या अळीचा नाश करते.
- झायगोग्रामा: ही किड पाने व फुले खाऊन जगते. भारतात अंदाजे १०० प्रजाती आहेत. त्यापैकी १३ प्रजाती भारतात आढळतात ह्या किडीच्या प्रौढ आणि अळ्या विविध वनस्पतींवर आपली उपजीविका करतात. झायगोग्रामा बायकोलॉराटा (मॅक्सीकम बिटल) हे गाजर गवत निमुर्लनाकरीता बायोकंट्रोल एजंट म्हणून भारतात वापर केल्या जाते.
पिकावरील विविध मित्र बुरशी (Beneficial Fungus)
- मेटॅरायझियम: ह्या बुरशीला ग्रीन मस्कार्डीन बुरशी असेही म्हणतात. ही बुरशी मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, बोंडअळी, हुमणी इत्यादी किडीच्या अंगावर वाढते व त्या किडींना नष्ट करते. फवारणीकरीता ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळुन फवारणीकरीता वापर करता येतो.
- बिव्हेरीया: या बुरशीला व्हाईट मस्कार्डीन बुरशी असेही म्हणतात. हा रोग बोंडअळी, पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, खोडकीडा, विविध भुंग इत्यादी किडीच्या अंगावर बुरशी वाढुन पांढऱ्या रंगाची पावडर तयार होते या किडीचा नाश होतो. यालाच व्हाईट मस्कार्डीन असे म्हणतात.
- नोम्युरीया: या बुरशीमुळे पंतगवर्गीय, बोंडअळी, उंटअळी, पाने खाणारी अळी या किडीवर बुरशी वाढून ग्रिन मस्कार्डीन हा रोग होऊन किडीचे नियंत्रण होते.
- व्हर्टिसीलीयम: रस शोषणाऱ्या किडीच्या नियंत्रणाकरीता या बुरशीचा वापर करतात. ही बुरशी मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, पाने खाणारी अळी इत्यादी किडीच्या अंगावर वाढुन किडींना रोगग्रस्त करुन किड नियंत्रण होते.
- ट्रायकोडर्मा: ही बुरशी जमीनीमधुन होणाऱ्या रोगाच्या नियंत्रणाकरीता अतिशय उपयुक्त असुन जमीनीत असणाऱ्या अपायकारक बुरशींना मारण्याचे काम करते. तसेच बिजप्रक्रिया करण्याकरीता ह्या बुरशीचा उपयोग होतो. बायोमॉस कुजविण्याच्या प्रक्रियेत ह्या बुरशीचा उपयोग डिकंपोझर म्हणुनही करता येतो.
श्री. एस. एम. तोटावार
प्रकल्प संचालक, आत्मा तथा
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वाशिम