Join us

मृग नक्षत्रात पाऊस झाला, तर उडीद, मुगाचा पर्याय !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 10:58 AM

सोयाबीनला भाव मिळाला नसल्याने बळीराजाची चिंता वाढली

गतवर्षी पाऊस कमी झाल्यामुळे उसाचे क्षेत्र घटले असून, खरिपाचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, सर्वाधिक पेरा होणाऱ्या सोयाबीनला गेल्या वर्षभरात चांगला भाव मिळाला नसल्यामुळे यंदाच्या खरिपात कुठला पेरा करावा या चिंतेत बळीराजा आहे. वेळेत आणि मृग नक्षत्रात पाऊस झाला, तर उडीद, मुगाचा, तसेच तूर या पिकाचा शेतकऱ्यांपुढे पर्याय असला, तरी सर्व काही पावसावर अवलंबून राहणार आहे.

लातूर जिल्ह्यामध्ये खरिपाचे क्षेत्र सहा लाख ५९ हजार हेक्टर असणार आहे. ४० ते ५० हजार हेक्टर यंदा खरिपाचे क्षेत्र वाढले आहे. पाणी नसल्यामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे. त्यामुळे खरिपाच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे. या क्षेत्रावर पर्यायी पीक कोणते घ्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

सालाबादप्रमाणे खरिपात सोयाबीनचा पेरा होतो, परंतु गत वर्षभरामध्ये सोयाबीनला पाच हजार रुपयांवर भाव मिळालेला नाही. त्यामुळे उत्पादन खर्चही निघालेला नाही. परिणामी, अनेकांनी अद्याप सोयाबीन विक्री केलेले नाही. आता पेरणीचा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. जर पाऊस मृग नक्षत्रात पेरणी योग्य झाला,तर उडीद, मूग हे पीक सोयाबीनला पर्याय आहेत.

या पिकांना गत वर्षभरात चांगला दरही मिळालेला आहे. तुरीचा दर १२ ते १३ हजारांवर होता. उडीद आठ हजार, मूग ९ हजार रुपये प्रतिक्विंटल मिळाला होता. जो की हमीभावापेक्षा चांगला दर होता, परंतु वेळेत पाऊस होत नसल्यामुळे हे पीक घेता येत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. कधी मृग नक्षत्र निघतो आणि वेळेत पाऊस पडतो, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

जिल्ह्यात असे आहे, खरिपाचे क्षेत्र...

जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र सहा लाख ५९ हजार आहे. त्यात पाच लाख चार हजार सोयाबीनचा पेरा होतो.

तूर ७५ हजार हेक्टरवर पेरली जाते. उडीद साडेचार हजार हेक्टरवर तर मूग साडेसहा हजार हेक्टर पेरले जाऊ शकतो. जर पाऊस मृग नक्षत्रात झाला, तर सोयाबीनचे क्षेत्र घटून उडीद, मूग आणि तुरीचे वाढू शकते.

जिल्ह्यात वार्षिक सरासरी पाऊस ७०६ मिमी होतो. सरासरीच्या ७३ टक्के पाऊस गतवर्षी झाला होता. मृग नक्षत्रात झाला, परंतु पेरणी योग्य झाला नव्हता. त्यामुळे उडीद, मूग हे पीक घेता आले नाही. क्षेत्र घटले होते.

सोयाबीनचाच पेरा मोठ्या प्रमाणात झाला होता, परंतु अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना चिता भेडसावत आहे. उत्पादन खर्च न निघणाऱ्या पिकाचा पेरा घ्यावा का, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

वेळेत पाऊस पडल्यास फायदा

सोयाबीन, हरभरा ही पिके घेऊन जमीन नापीक होत आहे. सोयाबीनला उतारा पण चांगला येत नाही. भाव पण चांगला नाही. त्यामुळे यावर्षी लवकर पाऊस पडल्यास तूर, मूग, उडीद या पिकांची पेरणी करण्याचा विचार आहे. शेत पण तयार करून ठेवले आहे. पावसाची प्रतीक्षा आहे.-तुकाराम हेलाले, कव्हा, ता. लातूर

निसर्गाची साथ हवी

पेरणी खर्च व काढणी खर्च जास्त असल्यामुळे सध्याचा सोयाबीनचा दर परवडत नाही. पाऊस लवकर पडल्यास मूग, उडीद पेरता येईल. मूग, उडदाला भाव चांगला आहे. तुरीलाही चांगला दर मिळालेला आहे. सोयाबीनला उडीद, मूग पर्याय आहे. पण निसर्गाची साथ हवी. खुर्शीद पटेल, तुंगी

टॅग्स :शेतीपाऊसलातूर