Lokmat Agro >शेतशिवार > गाळप झाले कमी तर कुठून होणार उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती

गाळप झाले कमी तर कुठून होणार उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती

If less is crushing, where will ethanol production from sugarcane juice come from? | गाळप झाले कमी तर कुठून होणार उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती

गाळप झाले कमी तर कुठून होणार उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती

ऊस टंचाई निर्माण झाल्याने एफआरपी व त्यापेक्षा अधिक दर साखर कारखान्यांनी जाहीर केले असताना केंद्राने अचानक रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालणारा आदेश काढला, साखर कारखाने तर अडचणीत आलेच शिवाय शेतकरीही लटकला आहे.

ऊस टंचाई निर्माण झाल्याने एफआरपी व त्यापेक्षा अधिक दर साखर कारखान्यांनी जाहीर केले असताना केंद्राने अचानक रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालणारा आदेश काढला, साखर कारखाने तर अडचणीत आलेच शिवाय शेतकरीही लटकला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्रातील, पश्चिम महाराष्ट्रातील व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उपजीविका संपूर्णपणे शेती व शेतीपूरक दूध व्यवसायावर अवलंबून आहे. मागील दहा महिन्यांपासून दूध दर उत्पादन खर्चापेक्षा फारच कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.

त्यातच खरीप हाती न लागल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांना कांद्यातून चार पैसे मिळत असताना कांदा निर्यातबंदी केल्याने दर एवढे कोसळले की शेतकरी पुरता घायाळ झाला. हेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत झाले आहे, यंदा पाऊस कमी पडल्याने उसाची अपेक्षित वाढ झाली नाही, पर्यायाने वजनात घट झाल्याने एकरी उतारा कमी मिळत आहे.

ऊस टंचाई निर्माण झाल्याने एफआरपी व त्यापेक्षा अधिक दर साखर कारखान्यांनी जाहीर केले असताना केंद्राने अचानक रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालणारा आदेश काढला, साखर कारखाने तर अडचणीत आलेच शिवाय शेतकरीही लटकला आहे. याचे सर्वाधिक परिणाम सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर झाले आहेत. दूध, कांदा व इथेनॉलवर सोलापूर जिल्हा अवलंबून आहे अन् यावरच केंद्राने घाला घातला आहे.

राज्यातील ६५ साखर कारखाने ज्यूस ( रस) पासून इथेनॉल तयार करतात त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील लोकमंगल बीबीदारफळ, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर, श्री पांडुरंग श्रीपूर, जकराया वटवटे, विठ्ठल कॉर्पोरशन म्हैसगाव, यूरोपियन, जयहिंद आचेगाव, लोकनेते अनगर, आवताडे शुगर या साखर कारखान्यांचा समावेश आहे.

साधारण महिन्याच्या फरकाने निघते टेंडर
■ इथेनॉल पुरवण्यासाठी केंद्र सरकार साधारण महिन्याच्या फरकाने व वर्षात किमान ९ ते १० वेळा टेंडर प्रसिद्ध करते. मागील टेंडरमध्ये देशभरातून ८२५ कोटी व महाराष्ट्रातून ९९ कोटी ४१ लाख लिटर अपेक्षित लिटर पुरवठा होता, प्रत्यक्षात ३१ कोटी ६० लाख लिटर रसापासून इथेनॉल पुरवठ्याची निविदा महाराष्ट्रातील कारखान्यांनी भरली होती. आता रसापासून इथेनॉल पुरवठ्याला मर्यादा आल्याने संपूर्ण राज्यातील साखर कारखाने व ऊस उत्पादक अडचणीत आला आहे.
■ रसापासून इथेनॉल तयार करणे बंद केल्याने ऊस गाळपावर परिणाम झाला असून दररोज क्षमतेपेक्षा ऊस गाळप कमी होत आहे, याचाही फटका कारखान्यांना व शेतकऱ्यांना बसत आहे.

१७५० कोटींचे नुकसान
राज्यातील जवळपास ६५ साखर कारखाने रसापासून इथेनॉल तयार करतात. या साखर कारखान्यांनी ३१ कोटी ५९ लाख १३ हजार लिटर इथेनॉल केवळ उसाच्या रसापासून पुरवठा करण्यासाठी निविदा भरली होती. यातील काही लिटर पुरवठा सुरू असताना अचानक केंद्राने रसापासून इथेनॉल उत्पादनावर बंदी घातली, नव्या आदेशानुसार एकूण उत्पादनाच्या २० टक्के इतकेच रसापासूनचे इथेनॉल पुरवठा करायचे आहे. रसापासून इथेनॉलचा दर ६९ रुपये प्रति लिटर इतका आहे.

टेंडर भरलेल्या ३२ कोटी लिटरचे २२०० कोटी रुपये होतात. २० टक्के पुरवठा होणाऱ्या इथेनॉलचे वजा केले तर महाराष्ट्रातील १७५० कोटी रुपयांचे साखर कारखान्यांचे नुकसान झाले असल्याचे इस्माचे ( इंडियन शुगर मिल असोसिएशन) संचालक महेश देशमुख यांनी सांगितले.

अरुण बारसकर
तालुका प्रतिनिधी, लोकमत, उत्तर सोलापूर

Web Title: If less is crushing, where will ethanol production from sugarcane juice come from?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.