Join us

बैलजोडी नाही तर काय झालं! पितापुत्रांनी रसवंतीच्या चरकाला जोडली दुचाकी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 9:21 AM

सहज सुचलं अन् केला जुगाड! ना लाइटचं टेन्शन, ना बैलाची कटकट; अफलातून जुगाड केल्याने ही रसवंती कुतूहल आणि कौतुकाचा विषय बनली आहे.

उन्हाची चाहूल लागताच ठिकठिकाणी रसवंतीचे घुंगरू वाजू लागले आहेत. विजेवर चालणारे किंवा बैलाच्या माध्यमातून चालणारे रसवंतिगृह आपण पाहिले आहेत; पण ग्रामीण भागातील एका शेतकऱ्याने रसवंतीसाठी अफलातून जुगाड केला आहे. चक्क दुचाकीच्या साह्याने चरक फिरवत रसवंती चालवली जात असून रसाचा स्वाद घेण्यासाठी येणारे ग्राहकही या जुगाडावर चर्चा करीत एकापेक्षा जास्त ग्लास रस पिऊन तृप्त होत आहेत.

आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी येथील माळरानावर ज्ञानदेव तात्याबा शेकडे या शेतकऱ्याने मुलगा कैलासच्या मदतीने रसवंती सुरू केली. कायमस्वरूपी वीज टिकत नाही. बैलजोडी लवली तर चारापाण्याचा खर्च अशा अडचणीत ग्राहक परत जाऊ नये; तसेच बैलजोडी नसल्याने या पितापुत्रांनी चक्क लाकडी चरकाला जुनी वापरती दुचाकी लावली. दुचाकीने चरक फिरवत रसवंती चालवत आहेत. दुचाकीच्या दोन फेऱ्यांत दोन ग्लास रस रसवंतीवर ग्राहक आल्यानंतर दुचाकी सुरू करून दोन फेऱ्यांत दोन ग्लास रस तयार होतो. यासाठी बापलेक दिवसभर येथे मेहनत घेतात.अफलातून जुगाड केल्याने ही रसवंती कुतूहल आणि कौतुकाचा विषय बनली आहे.

एक लिटर पेट्रोलचा वापर, हजार रुपये कमाई

या शेतकऱ्याने दुचाकीचा वापर चरक फिरवण्यासाठी केल्याने साधारण एक लिटर पेट्रोलमधून ते एक हजार ते अकराशे रुपये मिळवतात. त्यामुळे लाइटचा खर्च नाही, बैलाची गरज पडत नाही, चारा- पाण्याचा तर विषयच नाही, असे ज्ञानदेव शेकडे म्हणाले.

सहज सुचलं अन् जुगाड केला

  • खासगी वाहनावर चालक पण किती दिवस बाहेर काम करायचे? सहज सुचलं म्हणून हा जुगाड करून या माध्यमातून गावातच रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला.
  • कुटुंबालादेखील वेळ देता येतो. दररोज हाती पैसा खेळता राहत असल्याचे कैलास शेकडे यांनी सांगितले. 

ग्रामीण भागातील या शेतकरी कुटुंबातील पितापुत्रांनी अफलातून जुगाड केले आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न, कष्टही कमी होत असल्याचा हा जुगाड आपल्या भागात पहिल्यांदाच पाहिल्याचे ग्राहक दीपक साबळे म्हणाले. 

टॅग्स :शेतकरीऊसबाईकशेती क्षेत्र