गोकुळ पवार
अलीकडे शेतात उभारलेल्या शेततळ्यात पडून अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. सातत्याने घडणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी नाशिकमधील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी भन्नाट प्रकल्प तयार केला आहे. या प्रोजेक्टद्वारे शेततळ्याच्या आजूबाजूला कुणीही आल्यास आपोआप अलर्ट मॅसेज संबंधित मालकाच्या मोबाईलवर जाणार , अशा प्रकारचा प्रोजेक्ट तयार करण्यात आला आहे. ही सिस्टीम प्रत्येक शेततळ्याच्या काठावर बसविल्यास अनुचित प्रकाराला आळा बसण्यास मदत होणार आहे.
आज महाराष्ट्रातील अनेक शेतकरी शेतीसाठी शेततळे बांधण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे शेतीला पूरक पाणी पुरवठा करणे सोपे जाते. मात्र दुसरीकडे गेल्या काही वर्षांत शेततळ्यात बुडून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या गोष्टीला आळा बसावा यासाठी नाशिक येथील के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी यावर उपाय म्हणून लेझर अलर्ट सिस्टीम तयार केली आहे. ज्याद्वारे लेझर परिक्षेत्रात कुणी आल्यास तात्काळ संबंधित शेततळे असलेल्या शेतकऱ्यास काही सेकंदात इमर्जन्सीचा अलर्ट मॅसेज शेतकऱ्याच्या मोबाईलवर जाईल, अशी यंत्रणा उभी करण्यात आली आहे.
नेमकी संकल्पना कशी सुचली?
पहिल्या वर्षाला शिकत असताना काही नवोपक्रम करण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्यानुसार ग्रामीण भागात असलेल्या शेततळ्यात बुडून अनेकजण जीव गमावतात, असं विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं. त्यानुसार त्यांनी सुरवातीला शेततळ्यात दावे सोडून काही उपाय करता येऊ शकतो, म्हणून तसा प्रयोग करण्यात आला. मात्र हा प्रयोग फारसा काही काम करत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर जसा पिकांना पाणी भरण्यासाठी अलर्ट सिस्टीम कार्यान्वित आहे, तशीच अलर्ट सिस्टीम यासाठी सुरू करावी, अस सुचलं.
ही यंत्रणा काम कशी करते?
दरम्यान शेततळ्याला चारही बाजुंनी कंपाउंड असल्यास अपघात होण्याची शक्यता कमी असते. मात्र बहुतांश शेततळी ही खुल्या स्वरूपात असतात. त्यामुळे लेझरच्या माध्यमातून ही यंत्रणा राबविण्यात आली. या शेततळ्याच्या एका बाजूला आरडीनो स्वरूपाचे यंत्र लावून चारही बाजूला आरसे लावून लेझर इंडिक्ट करण्यात आले. त्यामुळे या लेझरच्या कार्यक्षेत्रात जो कोणी माणूस येईल, त्यावेळी लागलीच काही सेकंदात बझर वाजायला सुरवात होईल, याचा अलर्ट मॅसेज सुद्धा शेतकऱ्याच्या मोबाईलवर जाईल, त्यानुसार कुणी बुडत असल्यास त्याला तात्काळ मदत मिळेल. विशेष म्हणजे यासाठी माणसाच्या उंची व हालचालीचा देखील विचार करण्यात आला आहे.
पाच विद्यार्थ्यांचा भन्नाट प्रकल्प?दरम्यान अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेल्या सिद्धार्थ शेटे, देवेंद्र सोनवणे, शिवम पवार, प्रवीण पाटील या पाच विद्यार्थ्यांनी अवघ्या पंधरा दिवसांत हा प्रकल्प साकारला आहे. साधारण तीन हजार रुपयांचा खर्च या यंत्रणेला तयार करण्यासाठी लागल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आगामी काळात अँपच्या माध्यमातून हे शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणार असल्याचे सांगितले.