पुणे : शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावानुसार शेतमालाची खरेदी करण्याच्या सूचना कराड बाजार समितीने व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. कराड शेती उत्पन्न बाजार समितीने काढलेले सूचनापत्रक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर जे व्यापारी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभावापेक्षा कमी दर देतील अशा व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, केंद्र शासन दरवर्षी शेतमालाचे हमीभाव म्हणजेच एफआरपी जाहीर करत असते. या ठरवलेल्या दरापेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळणार नाही असा त्यामागील अर्थ असतो. पण बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना हमीभावापेक्षाही कमी दर मिळताना दिसतो. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. पण कराड बाजार समित्यांनी अशा व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याची सूचना काढली आहे.
कराड बाजार समितीच्या व्यापाऱ्यांना कोणत्या सूचना?महाराष्ट्र शासनाने सुचित केल्यानुसार आपल्या दुकानासमोर येणाऱ्या कोणताही शेतमाल शासनाने ठरवून दिलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी करू नये. सध्या सोयाबीन या शेतमालाचा हंगाम सुरू आहे. सोयाबीन या शेतमालाची किमान आधारभूत किंमत ४ हजार ८९२ रूपये प्रतिक्विंटल एवढी ठरवून दिलेली आहे. शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. आपण कमी दराने सोयाबीन खरेदी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास आपल्या विरुद्ध पणन कायदा कलम ३४ आणि ९४ ड नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशी सूचना कराड बाजार समितीने २३ सप्टेंबर रोजी सूचनापत्रकातून केली आहे.
इतर व्यापाऱ्यांचे काय?अनेक बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळतो पण या व्यापाऱ्यांवर कोणत्याच प्रकारची कारवाई केल्याचं दिसत नाही. तर पणन मंडळाने राज्यभरातील कमी दर देणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.