सोलापूर : साखर कारखान्याकडून आलेल्या चुकीच्या नोंदींमुळे सरलेल्या गाळप हंगामात राज्यातील कारखान्यांचे गाळप नियोजन कोलमडले, तसेच पहिल्या व दुसऱ्या गाळपाचा अंदाजाचा आकडा खोटा ठरल्याने साखर आयुक्त कार्यालयाची प्रशासनात विश्वासार्हता कमी झाली.
ही बाब साखर आयुक्त कार्यालयाने गंभीरतेने घेत येत्या गाळपासाठी 'महा ऊस नोंदणी' Maha us Nondani मोहीम कडक राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जे साखर कारखाने दुर्लक्ष करतील त्यांना गाळपाचा परवाना दिला जाणार नसल्याचे स्पष्टपणे साखर आयुक्त कार्यालयाकडून म्हटले आहे.
राज्यातील साखर कारखान्यांकडून गाळपाला येणाऱ्या उसाची नोंद घेतली जाते. या नोंदीवरून राज्याचा गाळप हंगाम सुरू होण्याअगोदर गाळप हंगाम कधीपर्यंत चालेल? किती गाळप होईल? साखर किती तयार होईल, तसेच साखर उतारा किती पडेल? याचा अंदाज व्यक्त केला जातो.
मागील साखर हंगाम सुरू होण्याअगोदर साखर गाळप हंगाम अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसानंतर सुधारित गाळप हंगाम अंदाज व्यक्त केला होता.
दोन्ही अंदाज चुकवीत राज्याचे गाळप एक कोटी मेट्रिक टनाने वाढले होते. ऊस क्षेत्र कमी असल्याने गाळप हंगाम लवकर संपेल, असा अंदाज करीत ऊसतोडणी यंत्रणा भरली नसल्याने हंगामावर परिणाम झाला होता.
याशिवाय साखर आयुक्त कार्यालयाचा गाळपाचा अंदाजही चुकीचा ठरला. त्यामुळे साखर आयुक्त कार्यालयाने 'महा ऊस नोंदणी' हे पोर्टल ऊसनोंदणीसाठी उपलब्ध करून दिले आहे. उसाची अचूक नोंद झाल्याने साखर कारखाने व आयुक्त कार्यालयाचे गाळप नियोजन कोलमडणार नाही.
तर साखर कारखान्यांवर कारवाई■ कार्यक्षेत्रातील गावनिहाय सभासदांची, गावनिहाय बिगर सभासदांची, कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचे करार ऊसनोंदणी एकत्रित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अचूक माहिती भरणे कारखान्यांना बंधनकारक केले आहे. पोर्टलवर अपलोड केलेली माहिती ही अंतिम राहणार असल्याने व त्यात बदल करता येणार नसल्याने चुकीची माहिती भरू नये.■ कारखान्यांनी भरलेल्या माहितीची साखर आयुक्त कार्यालयाकडून शहानिशा करण्यात येणार आहे. भरलेल्या माहितीत विसंगती; अथवा खोटेपणा आढळलेल्या कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल, तसेच पुढील हंगामाचा गाळप परवाना मिळणार नसल्याचे आयुक्त कार्यालयाच्या पत्रात म्हटले आहे.
अधिक वाचा: Sugarcane Harvester Scheme: अनुदानावर ऊस तोडणी यंत्र खरेदी करा बिनधास्त, योजनेची मुदत वाढवली