वाढत्या उकाड्यात कुठल्याही पदार्थात पुदिना थंडावा आणि ताजेतवाने करणारा असतो. विकत आणलेली पुदिन्याची पेंडी संपली की पुन्हा विकत आणायला जावं लागतं. पण आता अगदी घरच्या घरी तुम्हाला कुंडीतही साेप्या पद्धतीनं पुदिना लावता येईल. या काही साेप्या टिप्सने पुदिना तुम्हाला तुमच्या गार्डनमध्येच नाही तर कुंडीतही लावता येईल.
कोणत्या कुंडीत लावाल?
पुदिन्याची भरपूर पानं येण्यासाठी पुदिना कशात लावताय हे सर्वात महत्वाचं. कारण पुदिन्याच्या रोपाला भरपूर पानं येण्यासाठी व्यास अधिक असलेल्या कुंडीचा वापर करावा. यामुळे रोप उभं कमी आणि आडवं जास्त वाढतं. त्यामुळं पानं अधिक येतात. साधारण ६ ते ९ इंची कुंडीमध्ये पुदिना लावावा.
मातीचं प्रमाण
पुदिना लावण्यासाठी कुंडी जेवढी महत्वाची तेवढीच मातीही. कुंडीमध्ये चार भागात माती, एक भाग वाळू, दोन भाग खत, आणि दोन भाग कोकाेपीट असे प्रमाण घ्यावे. तुमच्या कुंडीच्या आकारानुसार तुम्ही हे भाग ठरवू शकता.
पाणी किती द्यावे?
रोप लावल्यानंतर पुदिन्याला पाणी द्यावे. पुदिना चांगला उगवायचा असेल तर पुदिना लावलेली माती सुकु न देणे सर्वात महत्वाचे. भरपूर पाणी आणि सुर्यप्रकाशात ठेवणे गरजेचे आहे. प्रखर सुर्यप्रकाश नसला तरी हलक्या उन्हात हे रोप चांगले येते. शक्य असल्यास कुंडीत ठिबकने पाणी दिल्यासही फायदा होतो. यासाठी कुंडीत काठी खोऊन त्याला प्लास्टीकची बाटली उलटी लटकवता येईल. अनेक घरांमध्ये माती कोरडी पडू नये म्हणून हा उपाय केला जातो.
रोप मोठं होताना..
पुदिन्याचं रोप मोठं होताना त्याला वरच्या बाजून कापत रहावे. यामुळे पुदिना दाट होतो. भरपूर पानं येतात. वाढ योग्य होते. दर पंधरा दिवसांनी खताचं पाणी द्यावे.