गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करून पुढील हंगामातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापूस पिकाच्या फरदडीचे निर्मूलन करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
चालू वर्षी खरीप हंगामात पेरणी उशिरा झाल्याने सध्या कापूस पीक हंगाम अंतिम टप्यात आहे. जादा उत्पादनासाठी काही ठिकाणी कापसाची फरदड घेण्याची शक्यता आहे. फरदडीमुळे गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र वर्षभर सुरू राहते. त्याचबरोबर, जिनिंग व प्रेसिंग मिल, गोदामे, मार्केटयार्ड या ठिकाणी कच्च्या कापसाची दीर्घ काळासाठी साठवणूक केली जात असल्याने अशा कापसामध्ये राहिलेल्या गुलाबी बोंडअळीच्या अवस्था नंतर घेतल्या जाणाऱ्या कापसाच्या पिकासाठी स्रोतस्थान म्हणून काम करतात.
फरदड निर्मूलन करणे गरजेचे..
किडीस निरंतर खाद्य मिळत राहिल्याने पुढील हंगामात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे उपाययोजना म्हणून फरदड निर्मूलन करणे हा कपाशी पिकामध्ये महत्त्वाचा भाग आहे. फरदडपासून मिळणारे उत्पन्न हे साधारणतः डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत घेतले जाते. हा कालावधी गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक असून प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यासाठी फरदड निर्मूलन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन केले आहे.
कापसात फरदड पीक घेतल्यास..कापूस पिकात खोडवा किवा फरदड पीक घेतल्यास शेंदरी अळीचा जीवनचक्र कायम राहून प्रादुर्भाव पुढील वर्षाच्या हंगामात वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कापसाची तिसरी वेचणी झाल्यानंतर म्हणजेच डिसेंबर ते जानेवारी महिन्यानंतर शेतातून कापूस पीक काढून घ्यावे. - शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोलाहे करा...◆ कापसाची शेवटची वेचणी झाल्यानंतर चरण्यासाठी बकऱ्या, गाई, इतर ढोरे सोडावीत.◆ पऱ्हाट्यांचा शेतात ढीग रचून ठेवू नये.◆ काढलेल्या पऱ्हाट्यांचे कंपोस्ट खत बनविण्यावर भर द्यावा.◆ गुराढोरांनी चरल्यानंतर कापूस श्रेडर मशिनने उभे कापसाचे पीक जमिनीत तुकडे करून दाबून टाकावे. ◆ गाडलेल्या ठिकाणे स्प्रिंकलरने ट्रायकोडर्मा द्रावणाची फवारणी करावी.