Join us

युरिया पाहिजे तर ही खते घ्यावी लागतील; खतांचे लिंकिंग काही केल्या थांबेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 11:46 IST

fertilizer linking युरिया हवा असेल, तर अन्य लिंकिंगची खते शेतकऱ्यांच्या गळ्यात मारण्याचा प्रकार काही केल्या थांबेना झाला आहे. त्यातच डीएपीचा तुटवडा असल्याचे सांगून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.

आयुब मुल्लाखोची : युरिया हवा असेल, तर अन्य लिंकिंगची खते शेतकऱ्यांच्या गळ्यात मारण्याचा प्रकार काही केल्या थांबेना झाला आहे. त्यातच डीएपीचा तुटवडा असल्याचे सांगून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.

कृषी विभाग मात्र खतांचा साठा असल्याचे कागदोपत्री दाखवित असल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार शेतकरी सहन करत आहे.

उसाचा गळीत हंगाम संपल्यानंतर खोडवा पिके जोमाने आणण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. सुरू लागणीसुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

खोडवा, सुरू लागणीच्या भरणीचे काम सुरू आहे. उन्हाच्या झळा झेलत शेतकरी ही कामे करीत आहे, परंतु भरणीसाठी युरिया व डीएपी खतांचा वापर करताना आर्थिक फटका बसत आहे.

युरिया पाहिजे असेल तर लिंकिंगची खते गरज नसताना घेण्याची सक्तीची केली जात आहे. २६६ रुपयांच्या युरिया पोत्या समवेत नॅनो युरिया, नॅनो डीएपी अशा प्रकारची खते घ्या तरच युरिया मिळेल, असे सांगितले जात आहे.

त्यामुळे २६६ रुपयांच्या पोत्यासोबत २२५ ते ५५० रुपयांची खते घ्यावी लागत आहेत. खत पुरवठा करणाऱ्या कंपन्याच्या अट्टासाहामुळे हा प्रकार घडत आहे. खत विक्री करणाऱ्या दुकानदारांना याचा नाहक त्रास होत आहे. विक्रेत्यांनी मागणी केलेला डीएपी येतच नाही. 

कृषी विभाग ग्राऊंडवर कधी येणार- येणाऱ्या खरीप हंगामासाठी लागणाऱ्या पोटॅशच्या किमतीत दोनशे रुपयांची वाढ होईल असे सांगितले जात आहे. याची माहिती कृषी विभागाने घेतली पाहिजे. त्याबरोबर लिंकिंगवर कडक कारवाई केली पाहिजे.मोहीम अधिकारी यांनी प्रत्यक्षात ग्रामीण भागात जाऊन खत विक्रीचा आढावा घेतला पाहिजेत. निव्वळ ऑफिसमध्ये आकडेवारी मांडून वस्तुस्थिती समजणार नाही.

अधिक वाचा: आता पिक विमा योजनेत नुकसान भरपाई मिळणार या निकषांवर; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :खतेशेतकरीशेतीपीकसरकारराज्य सरकारऊस