मुंबई : शेतीतील उत्पन्न वाढीसाठी गेल्या काही वर्षांपासून भरमसाठ प्रमाणात वापरलेल्या कीटकनाशकांमुळे जमिनीचा कस दूषित झाला आहे. जमिनीचा पोत सुधारून उत्पन्न वाढीसाठी आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी मूलभूत संशोधन केले आहे.
त्यांनी जमिनीतील विषारी रसायने आणि प्रदूषकांचे भक्षण करणाऱ्या जीवाणूंचा शोध लावला असून, या जीवाणूंचे मिश्रण वापरून मातीतील प्रदूषके नष्ट करणे सहज शक्य झाले आहे.
आयआयटी मुंबईच्यासंशोधनात जीवाणूंचे मिश्रण वापरल्याने मातीतील प्रदूषके नष्ट होत असून, वनस्पती वाढीसाठी आवश्यक संप्रेरके वाढीला लागतात.
हानीकारक बुरशीची वाढ रोखली जाते, तसेच वनस्पतींना आवश्यक पोषकद्रव्ये सहज उपलब्ध करून देण्यास मदत होते, असे या संशोधनात आढळले आहे.
त्यातून कीटकनाशकांवरील शेतकऱ्यांचे अवलंबित्व कमी होणार असून, मातीचा कस वाढणार आहे. पिकांवरील रोग टाळण्यासाठी वापरली जाणारी कीटकनाशके आणि खते यामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे.
या समस्येवर उपाय म्हणून आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी प्रदूषित वातावरणातील जीवाणू शोधले. या संशोधनादरम्यान काही जीवाणूंच्या प्रजाती, विशेषतः स्यूडोमोनास आणि एसिटोबॅक्टर हे विषाक्त संयुगांचे विघटन चांगल्या पद्धतीने करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
हे जीवाणू दूषित माती आणि शेतजमिनीपासून वेगळे केले गेले. ते प्रदूषकांचे भक्षण करून त्यांचे साध्या, निरुपद्रवी आणि बिन-विषारी संयुगात विघटन करतात.
अशारीतीने हे जीवाणू प्रदूषित पर्यावरण नैसर्गिकरीत्या स्वच्छ करतात. असे आयआयटी मुंबईच्या जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी विभागाचे प्रा. प्रशांत फळे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन संदेश पापडे यांनी त्यांच्या पीएच. डी. साठी केले.