अरुण बारसकर
सोलापूर : एक-दोन दिवस हवेत गारवा तर लगेच दोन-तीन दिवस गरम वातावरण असा दररोज होणारा हवामानातील बदलाचा परिणाम आंबा उत्पादनावरही झाला आहे. यंदा आंब्याचे उत्पादन कमी तर आहेच; शिवाय दोन व तीन टप्प्यांत आंबा काढणीला येणार आहे. कारण यंदा हवामानामुळे तीन-चार टप्प्यांत फुलोरा लागला होता.
देशभरात तसेच परदेशातही आंब्याची गोडी अलीकडे भलतीच वाढली आहे. कोकणातला हापूस सर्वांना हवाहवासा वाटतोच; शिवाय केशरलाही तितकीच मागणी असते. कोणी कच्चा, कोणी पिकलेला, कोणी लोणचे करून तर कोणी रसाच्या माध्यमातून आंबा खातो. काही वर्षांपूर्वी गावरान आंब्याची झाडे सगळीकडे दिसायची.
मात्र, अलीकडे हापूस व केशर जातीची झाडे लागवडीला शेतकऱ्यांचे प्राधान्य असते. सोलापूर जिल्ह्यात तर दरवर्षीच आंब्याची नव्याने लागवड होत आहे. कमी खर्च होत असताना आंब्याच्या विक्रीतून चार पैसे हमखास मिळतात, असा अनुभव असल्याने नव्याने आंबा लागवड होताना दिसत आहे.
यंदा मात्र ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत दोन-तीन दिवसांच्या फरकाने हवामानात बदल झाला होता. दोन-तीन दिवस हवेत गारवा तर लगेच उष्णता तयार होत होती. आंब्याला मोहर लागण्याच्या कालावधीत असे तीन-चार दिवसांनी वातावरण बदलत राहिले. याचा परिणाम आंब्याच्या फलधारणेवर झाला. आंब्याला मोहर तीन-चार टप्प्यांत लागला तसे आंबेही तीन-चार टप्प्यांत लागले आहेत.
आंब्याचे १२ हजार एकर क्षेत्र..
- काही वर्षांपूर्वी घरी खाण्यासाठी आवश्यकतेनुसार आंब्याची झाडे लावली जायची. पुढे घरी खाऊन विक्रीतून चार पैसे मिळावेत अशा पद्धतीने लावलेली आंब्याची झाडे दिसू लागली. पाच-सात वर्षांपूर्वी कुठे तरी एखाद दुसरी आंब्याची बाग दिसायची.
- आता मात्र आंबा लागवड व्यवसाय म्हणून केली जाते. जिल्ह्यात सध्या १२ हजार एकरावर आंबा असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले. दरवर्षी हे आंब्याचे क्षेत्र वाढतच आहे. मागील दोन-चार दिवसांत पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मागील १० वर्षापासून आंब्याची बाग आहे. आठ एकर क्षेत्रात आंबा असला तरी ५ एकर काढणीला आला आहे. यंदा हवामान बदलामुळे काही झाडांना दोन व काही झाडांना तीन टप्प्यांत मोहर लागला. त्यामुळे आंबाही तीन टप्प्यांत उतरणीला येणार आहे. यंदा आंबा कमीच असल्याने उत्पादनही कमीच होणार आहे. - लखन फसके, आंबा उत्पादक, मार्डी
आंबा लागवडीची शेतकऱ्यांनी पद्धत बदलली. एकरात २०० ते ३०० झाडे लावली जातात. आंब्याची उंची वाढणार नाही याची दक्षता शेतकरी घेतात. त्यामुळे काढणी सोपी झाली. हवामान बदलामुळे यंदा तीन-चार टप्प्यांत आंबा लागला आहे. आंब्याचे उत्पादन कमीच होणार आहे. शेतकऱ्यांनी स्वतः मार्केटिंग करावे. - मदन मुकणे अधिकारी, स्मार्ट प्रकल्प