जितेंद्र डेरे
दुष्काळी परिस्थितीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडसावंगी परिसरात खरिपापाठोपाठ रब्बीचे उत्पन्न घटले आहे. परिणामी, एक एकर क्षेत्रातील ज्वारीचे उत्पन्न केवळ वीस ते तीस किलो होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रब्बीचा पीकविमा मंजूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत पेरलेल्या ज्वारीसह इतर रब्बी पिकांची सध्या सोंगणी सुरू होऊन त्याचे खळे करण्यात येत आहे. सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने व विहिरीत पाणी नसल्याने पिकाला पाणी देता आले नाही, यामुळे रब्बीच्या पिकांतून बियाणे व पेरणीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
एक एकर क्षेत्रात पेरलेल्या ज्वारीचा बियाणे खर्च दीड हजार रुपये, रासायनिक खतांच्या दोन बॅगांची किंमत दोन हजार रुपये, सोंगणीचा खर्च दोन ते तीन हजार रुपये, चारा बांधणी एक हजार रुपये, आंतरमशागत मजुरी दोन हजार रुपये दहा ते बारा हजार रुपये इतका झाला आहे.
पिकाची उंची तीन ते चार फुटांपर्यंतच झाली. त्यामुळे उत्पन्न कमी आले. चाऱ्याची रक्कमही एकरी पाच हजार रुपये मिळत असल्याने यंदा शेतातील दोन्ही हंगाम वाया गेल्यात जमा आहे. शासनाने रब्बीचा पीकविमा मंजूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
पतीच्या व्यवसायाला पत्नीचे पाठबळ; कष्टाने दिली यशाची उंच झेप
माझ्याकडे तीन एकर शेती आहे. एक एकर क्षेत्रात दहा किलो ज्वारी पेरली होती. दहा ते बारा हजार रुपये खर्च झाला, मात्र केवळ तीस किलो ज्वारी झाली आहे. मागील वर्षी मला आठ क्चिटल ज्वारी झाली. चाऱ्याचे बारा हजार रुपये मिळाले. यंदा मात्र खर्च केलेल्या पैशातून अर्धे उत्पन्नही मिळाले नाही. - विष्णू चाळगे, शेतकरी
मी दरवर्षी रब्बी हंगामात एक ते दोन एकर उन्हाळी सोयाबीन पेरणी करतो. परंतु यंदा सोयाबीन पेरणीनंतर पाणी नसल्याने संपूर्ण सोयाबीनला शेंगा लागल्या नाहीत. यंदा संपूर्ण पीक वाया गेले. आहे -अजिनाथ शिंदे, शेतकरी