अतिवृष्टी आणि दुष्काळग्रस्तांना मदत देण्यासाठी पूर्वीची २ हेक्टरची अट आता ३ हेक्टरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे मिळालेली मदत वितरित कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला असून, एक महिन्यांपासून ४२० कोटी बँकेत पडून आहेत.
जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीत ५ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने दुष्काळी मदतही जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मदतीसाठी लागणारे ४२० कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. मात्र या रकमेतून अद्याप एक पैसाही दुष्काळग्रस्तांच्या खात्यावर जमा करण्यात आला नाही. दिवाळी तोंडावर आली असून मदत अनुदान केव्हा मिळते? याची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. त्यातच मागील आठवड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पूर्वी २ हेक्टरच्या मर्यादेत मदत वितरित केली जात होती. आता ही मदत ३ हेक्टरच्या मर्यादेत वितरित केली जाणार आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांची संख्या वाढणार असून, मदतीची रक्कमही वाढण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीमध्ये पूर्वी जमा झालेली ४२० कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी नव्याने दुष्काळग्रस्तांच्या याद्या अपलोड कराव्या लागणार आहेत.
नुसताच मंत्रिमंडळ निर्णय
शेतकऱ्यांना जिरायती शेती असेल, तर ८ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर, याप्रमाणे २ हेक्टरच्या मर्यादित अतिवृष्टी मदत दिली जात होती. यामध्ये वाढ करण्यात आली असून, ३ हेक्टरच्या मर्यादित मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र, याबाबत शासन निर्णय केव्हा होतो. याची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे अतिवृष्टीने बाधित शेतकयांची थट्टाच सुरु असल्याचे दिसून येते.