महाराष्ट्रात राज्यात रब्बी हंगामामध्ये लागवड करण्यात येणाऱ्या विविध पिकामध्ये हरभरा हे सर्वात महत्त्वाचे पीक असून राज्याच्या एकूण कडधान्य उत्पादनात याचा ६३ टक्के वाटा आहे. राज्यात हरभरा पिकाचे क्षेत्र व उत्पादकता वाढत असून २०२१-२२ या हंगामात या पिकाखाली २८.३३ लाख हेक्टर क्षेत्र होते व त्यापासून ३२.७६ लाख टन उत्पादन मिळाले आणि राज्याची उत्पादकता ११५६ किलो/हेक्टर एवढी आहे. देशाचा विचार केला तर, हरभरा पिकामध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान व गुजरात ही राज्ये महत्त्वाची असून आपल्या राज्याचा क्षेत्रात प्रथम तर उत्पादनामध्ये देशात दुसरा क्रमांक आहे.
हरभरा हे महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाचे रब्बीपीक आहे. कडधान्यवर्गीय पिकांचा मोठा फायदा म्हणजे त्यांच्यात असलेली नत्र स्थिरीकरण करण्याची क्षमता. मुळावरील ग्रंथीतील रायझोबीयम जीवाणुमार्फत हवेतील १३५ किलो नत्र/हेक्टर शोषुन त्याचे स्थिरीकरण केले जाते. त्यामुळे पुढील पिकास नत्र खताची उपलब्धता होते व जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते. पर्यायाने उत्तम बेवड तयार होते. महाराष्ट्रात हे पीक मुख्यतः कोरडवाहू क्षेत्रात घेण्यात येते. पारंपारिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करून पीक उत्पादन तंत्रज्ञानाची जोड देवून सुधारित वाणांचा वापर केल्यास कोरडवाहू क्षेत्रासुद्धा चांगले उत्पादन मिळते. प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतावरील नव्या वाणांचे बागायत उत्पादन हेक्टरी ३५ ते ४० किं. पर्यंत जाऊ शकते असा अनुभव आहे. सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास कमी पाण्यात देखील चांगले उत्पादन देण्याची क्षमता हरभरा पिकात आहे.
जमीन व हवामानमध्यम ते भारी (४५ ते ६० सें.मी. खोल) पाण्याचा निचरा होणारी, सामू ५.५ ते ८.६ असणारी, कसदार, भुसभुशीत जमीन आवश्यक असते. तसेच सेंद्रीय कर्ब ०.५% पेक्षा जास्त पाहीजे. वार्षिक ७०० ते १००० मि.मि. पर्जन्यमान, हरभन्यास थंड व कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो व असे वातावरण पिकास चांगले मानवते.
पूर्व मशागत- हरभऱ्याची मुळे खोल जात असल्याने जमीन भुसभुशीत असणे आवश्यक असते.- खरीप पीक निघाल्याबरोबर जमिनीची खोल (२५ सें.मी.) नांगरट करावी आणि त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात.- खरीपातील सोयाबीन पीक निघुन गेल्यानंतर पीकांचे अवशेष शेतात राहतात. त्यामुळे हरभरा पीकामध्ये मानकुज आणि मुळकुज या रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. याकरिता प्रति एकर २.५ किलो ट्रायकोडर्मा पावडर शेणखतात मिसळुन द्यावे. ५ टन कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट नांगणरणीपुर्वी जमिनीवर पसरावे.- कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी व सप्टेंबर महिन्याचे अखेरीस हरभरा पेरणीसाठी शेत तयार ठेवावे.
पेरणीची वेळ- जिरायत हरभऱ्याची पेर जमिनीत पुरेसा ओलावा असतांना म्हणजेच २० सप्टेंबर ते १० ऑक्टोंबर पर्यंत करावी. हरभरा पेरणीनंती सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरूवातीस पडणाऱ्या पावसाचा जिरायत हरभन्याच्या उगवण आणि वाढीसाठी चांगला उपयोग होतो. जिरायत क्षेत्रात बियाणे खोलवर (१० सॅमी) पेरणी करावी.- बागायत क्षेत्रात मात्र पाणी देण्याची सोय असल्यामुळे हरभऱ्याची पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरच्या दरम्यान करावी. तसेच बागायत क्षेत्रात कमी खोलीवर (५ से.मी.) हरभरा पेरणी केली तरी चालते. पेरणीस जास्त उशीर झाल्यास किमान तपमान खूपच कमी होऊन उगवण उशीरा आणि कमी होते. पिकाची वाढ कमी होऊन फांद्या, फुले, घाटे कमी लागतात. १० नोव्हेंबर नंतर पेरणी १५ दिवसांनी व ३० दिवसांनी उशीरा केल्यास उत्पादनात अनुक्रमे २७ ते ४० % नुकसान होते.
बीजप्रकिया आणि जीवाणूसंवर्धन- बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची बिजप्रक्रीया करावी.- यांनतर १० किलो बियाण्यास रायझोबियम जीवाणू संवर्धनाचे २५० ग्रॅम वजनाचे एका पाकीटातील संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे हरभऱ्याच्या मुळावरील ग्रंथीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेवून पिकास उपलब्ध केला जातो.
पेरणीचे अंतर आणि बियाणे प्रमाण हरभऱ्याच्या विविध वाणांच्या दाण्यांच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण वापरावे लागते. म्हणजे हेक्टरी रोपाची अपेक्षित संख्या मिळते.
देशी वाण | काबुली वाण |
पेरणीचे अंतर जिरायत ३० x १० सें.मी. | पेरणीचे अंतर ४५ x १० सें.मी. |
बियाणे प्रमाण विजय, जाकी ९२१८, फुले विक्रांत आणि फुले विक्रम (७५ किलो/हे.)दिग्विजय ९० किलो/हे., विशाल (१०० किलो/हे.)बागायत पेरणी अंतर सरी वरंबा/रुंद सरी वरंबा (बीबीएफ)-४५x१० सें.मी | बियाणे प्रमाण विराट, काक-२, बीडीएनजी-७९८ (१२५ किलो/हे.) पीकेव्ही ४-५ कृपा (१५० किलो/हे.) |
कडधान्य सुधार प्रकल्पमहात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी०२४२६ २३३४४७