बटाटा लागवडीचे सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादनात भरीव वाढ होते. महाराष्ट्राचा विचार केल्यास पारंपरिक पिक पद्धतीमध्ये बदल करून बरेचसे शेतकरी बटाटा लागवडीकडे वळले आहेत. याला कारण म्हणजे बटाटा पिकात असणारी जास्त कालावधीची साठवण क्षमता. त्यामुळे योग्य बाजारभाव मिळेपर्यंत वाट पाहता येते. बटाट्यापासून चिप्स सारखे प्रक्रियायुक्त पदार्थ करता येतात. याकरिता प्रक्रियेस योग्य वाणाची निवड करायला हवी. तसेच यामध्ये चिप्स बनविणाऱ्या कंपनी सोबत करार करून लागवड करता येईल.
बटाटा लागवड महाराष्ट्रातरब्बी हंगामात सर्वच जिल्ह्यांत कमी-जास्त प्रमाणात आढळून येते. खासकरून पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर सह इतर जिल्ह्यात केली जाते. यामध्ये जे शेतकरी प्रथमच लागवड करत असतील त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. खासकरून लागवडीसाठी लागणारे उच्च दर्जाचे बेणे कुठे मिळेल? लागवडीकरता कशी नाती निवडावी? बटाटा व येणे प्रक्रिया, त्याचे खत, पाणी व्यवस्थापन, बटाटा काढणी आणि एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन कसे करायचे याबाबतची माहिती या लेखामध्ये दिली आहे.
लागवड योग्य वातावरणबटाटा लागवडीसाठी थंड हवामान पोषक असते. बटाटा हे थंड हवामानातील पिक आहे. या पिकास सरासरी १६ ते २५ सेल्सिअस तापमान लागत पिकाच्या सुरवातीच्या काळात २४ अंश सेल्सिअस पोषक असून बटाटे पोसण्याच्या काळात २० अंश सेल्सिअस तापमान अनुकूल असते. बटाट्याची लागवड करताना उष्ण हवामान गरजेचे आहे व बटाटा पोसण्याच्या वेळी थंड हवामान असणे आवश्यक आहे. ६५ ते ८० ट सापेक्ष आर्द्रता आणि १० तास स्वच्छ सूर्यप्रकाश पिकास आवश्यक असतो. या काळात जास्त तापमानात वाढ झाली तर उत्पादनामध्ये घट येते.
जमिनीची निवडजमिनीची निवड करताना पुढील बाबी विचारात चाव्या. बटाटा मातीमध्ये पोसत असल्याने पाण्याचा उत्तम निचरा होणारी भुसभुशीत माती निवडावी. गाळाच्या मातीमध्येही बटाट्याची लागवड चांगल्या रीतीने करता येते. जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण भरपूर असावे काळ्या व भारी मातीमध्ये पाण्याचा योग्य निचरा होत नाही पाण्याची कमतरता असताना मातीला भेगा पडतात. यामुळे बटाटा नीट वाढत नाही. अन्नद्रव्याची उपलब्धता चांगली होण्यासाठी जमिनीचा सामू ६ ते ८ च्या दरम्यान असावा.
पूर्वमशागतजमीन नांगरानी २० ते २५ सेंमी खोल नांगरावी. १ महिनाभर जमिनीस उन्हाची ताप द्यावी. पुन्हा १ आडवी नांगरणी करावी. ढेकळे फोडण्यासाठी व जमीन समपातळीत आणण्यासाठी कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी, जमिनीत हेक्टरी ५० गाड्या चांगले कुजलेले शेणखत पसरावे
लागवडीचा कालावधीहवामानाच्या सर्व बाबींचा विचार केल्यास महाराष्ट्रात रब्बी हंगामात १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान लागवड करावी.
सुधारित वाण- कुफरी चंद्रमुखी: हा वाण ९० ते १०० दिवसात तयार होतो. या जातीचे बटाटे लांबट गोल व फिकट पांढरे असतात. साठवणुकीस हा वाण उत्तम आहे. हेक्टरी उत्पादन २५० किंटल पर्यंत मिळले.- कुफरी लवकर: हा वाण ६५ ते ८० दिवसात तयार होणारा वाण - असून खरीप व रब्बी हंगामात घेतली जाते. या जातीचे बटाटे पांढरे शुभ्र आकर्षक व मोठे असतात. या जातीचा बटाटा साठवणुकीत चांगला टिकतो. हेक्टरी उत्पादन २०० ते २५० किंटल असते.- कुफरी सिंदुरी: खास रब्बी हंगामासाठी शिफारस केलेला वाण - १२० ते १३५ दिवसात तयार होतो. या जातीचा रंग फिकट तांबडा असून बटाटे मध्यम व गोल आकारचे असतात. ही जात साठवणुकीस उत्तम आहे. हेक्टरी उत्पादन ३०० किंटल पर्यंत मिळते. महाराष्ट्रातील मैदानी विभागाकरीता रब्बी बटाटा पिकाच्या अधिक उत्पादनाकरिता कुफरी सुर्या या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. या शिवाय कुफरी पुखराज, कुफरी बादशाह, कुफरी कुबेर कुफरी ज्योती अलंकार, कुफरी चमत्कार या जाती लागवडीस योग्य आहेत.- कुफरी चिपसौना १ व कुफ्री चिपसीना २ हे वाण प्रक्रिया करण्यासाठी उपयुक्त आहेत.
बियाण्याचे (बेण्याचे) प्रमाण व लागवड अंतरबियाणे (देणे) उत्तम दर्जाचे असावे. लागवडीसाठी मध्यम आकाराचे बटाटे वापरतात. लहान बटाटे देखील वापरता येतात परंतु उत्पादन कमी येते. आकाराने मोठे बटाटे (१०० ग्रॅम) काप करून वापरतात काप घेताना प्रत्येक कापाला पुरेसे डोळे (२ ते ३) असावेत. मध्य आकाराचे बटाटे (५० ग्रॅम) वापरल्यास उत्पादन चांगले मिळते. लागवडीचे दोन ओळी मधील अंतर ४५ ते ६० सेमी तर दोन घेण्यातील अंतर १५ ते २० सेमी ठेवावे. बेण्याच्या आकारानुसार प्रति हेक्टरी २५ ते ३० किंटल बेणे लागते ट्रॅक्टरच्या सहाय्याने सरी वरंबा पद्धतीने लागवड करावी.
बेणे निवड आणि प्रक्रियाबेणे उत्तम दर्जाचे निरोगी व खात्रीलायक असावे. बांगडी करपा इत्यादि रोगांपासून बेणे मुक्त असावे. बेणे परिपक्व असावे. शीतगृहात साठवलेले बेणे किमान एक आठवडा सावलीत पसरवून ठेवावे किंवा कोंब येईपर्यंत ठेवावे. लागवडीपूर्वी बियाणे कॅप्टन ३० ग्रॅम आणि बावीस्टिन १० ग्रॅम १० लिटर पाण्यात ५ मिनिटे बुडवून व नंतर लागवडीसाठी वापरावे.
आंतरमशागतबटाट्याच्या आंतरमशागतीत तण काढणे व खुरपणी या बरोबर भर देणे हे महत्वाचे काम आहे. तीन चार वेळा खुरपणी करून जमीन भुसभूशीत ठेवावी. खताचा दुसरा हप्ता देताना झाडांना मातीची भर द्यावी यानंतर २ ते ३ वेळा भर द्यावी म्हणजे बटाटे चांगले पोसतात आणि बटाटे हिरवे पडत नाहीत.
खते व पाणी व्यवस्थापनबटाटा पिकास २५ ते ३० टन कुजलेले शेणखत, १०० ते १२० कि. नत्र ८० ते १०० कि. स्फुरद आणि ८० ते १०० कि. पालाश प्रति हेक्टरी द्यावे लागवडीपूर्वी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावे. लागवडीनंतर १ महिन्याने अर्धे नत्र खताची दुसरी मात्रा द्यावी. स्फुरद आणि पालाश यांच्या मात्रा अनुक्रमे डाय अमोनिअम फॉस्फेट आणि सल्फेट ऑफ पोटॅशच्या माध्यमातून दिल्यास पीक चांगले येते. नत्र खताची मात्रा दोनपेक्षा अधिक भागात दिल्यास जास्त फायदेशीर ठरते. लागवडीनंतर पहिले पाणी हलके द्यावे. जमिनी लगतच्या फांद्या वाढून त्यांची टोके फुगीर होऊ लागल्यावर व बटाटा पोसण्याच्या वेळेस ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पिकाची वाढ पूर्ण झाल्यावर पाण्याच्या पाळ्या कमी कराव्यात.
काढणी व उत्पादनबटाट्याची काढणी वेळेवर आणि योग्य रीतीने करणे महत्वाचे ठरते. काढणी फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत होते. बटाट्याची पाने पिवळी पडून सुकेपर्यंत ते जमिनीमध्ये पोसत असतात. पाने पिवळी पडल्यानंतर २ ते ३ आठवडे पाणी देणे बंद करावे. काढलेले बटाटे उन्हात न ठेवता सावलीत सुकू द्यावेत. यानंतर बटाट्याची वर्गवारी करावी. वर नमूद केलेल्या सर्व सुधारित तंत्राचा उपयोग करून बटाट्याचे पिक घेतल्यास लवकर तयार होणाऱ्या जातीचे उत्पादन हेक्टरी २०० क्विंटल व उशिरा तयार होणाऱ्या जातीचे उत्पादन हेक्टरी २५० ते ३०० क्विंटल पर्यंत होऊ शकते.
डॉ. अभय वाघप्राध्यापक, भाजीपाला शास्त्र विभागडॉ. प्रकाश नागरेप्राध्यापक, उद्यानविद्या शाखापंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला