अवकाळी पाऊस, गारपीट आणि तापमानात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे नाशिक जिल्ह्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीला मोठा फटका बसला आहे. मात्र, यातूनही गेल्या दहा दिवसात द्राक्षनिर्यातीत काहीशी सुधारणा दिसून येत आहे. युरोपात आणि रशियात २५० ते ३०० मेट्रिक टन निर्यात होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला होता. गेल्या दहा दिवसात म्हणजेच १ डिसेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीपर्यंत नाशिकमधून ९०.०६२ मॅट्रीक टन द्राक्षाची युरोपात निर्यात झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसते.
अवकाळी पावसानंतर आणि गारपीटीमुळे राज्यातील प्रमुख द्राक्षउत्पादक नाशिक जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. द्राक्षबागांमध्ये पाणी शिरल्याने फळबागा संकटात आल्या. मात्र, या परिस्थितीतून सावरत आता नाशिकमधून पुन्हा एकदा द्राक्षनिर्यातील सुरुवात झाली आहे. मागील दहा दिवसात युरोप वगळता झालेली निर्यात ही सुमारे १ हजार ७०० मेट्रीक टन एवढी झाली आहे. एकूण निर्यात १८०० मे.टन पर्यंत गेली आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यातून १.२२ लाख टन द्राक्षांची निर्यात झाली होती. यंदा युरोपीय देशांची मागणी लक्षात घेता १.२५ लाख टन ते १.५० लाख टन द्राक्ष निर्यात होण्याची अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली होती. अवकाळी पावसाने महिनाभर द्राक्षनिर्यात थांबली होती. मात्र, आता ती पुन्हा सुरु झाली आहे.
निर्यातीत १५ ते २० टक्क्यांनी घट होण्याची भीती
गेल्या हंगामात डिसेंबर २०२२ ते एप्रिल २०२३ या कालावधीत नाशिक जिल्ह्यातून १.३ लाख टन द्राक्षे विविध युरोपीय आणि बिगर युरोपीय देशांना निर्यात करण्यात आले होते. मात्र, अतिवृष्टी आणि गारपीटीमुळे यंदा १५ ते २० टक्क्यांची निर्यात घटण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.
नाशिक जिल्ह्यातील निफाड हा प्रमुख द्राक्ष उत्पादक पट्टा आहे. निफाडसह चांदवडच्या बहुतांश भागात पडलेल्या पावसाने आणि गारपीटीमुळे द्राक्षबांगांना मोठा तडाखा बसला आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र अंदाजे ५८,३६७ हेक्टर असून, त्यात निफाड तालुक्यात २२,००० हेक्टर, दिंडोरी तालुक्यात १५,७५८ हेक्टर, नाशिक तालुक्यात ११,६७१ हेक्टर आणि चांदवड तालुक्यात ५,१४८ हेक्टर क्षेत्र आहे. उर्वरित द्राक्ष बागा जिल्ह्यातील बागलाण आणि कळवण तालुक्यात आहेत.