खरिपाच्या पेरणीला आता सुरुवात होत आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील बाजार समित्यांत बिजवाई दर्जाच्या (सीड क्वालिटी) सोयाबीनचे दर चांगलेच वाढत आहेत. गुरुवारी वाशिमच्या बाजार समितीत बिजवाई दर्जाच्या सोयाबीनला कमाल ४ हजार ८०० रुपये प्रती क्विंटलपर्यंतचे दर मिळाले. याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
सोयाबीनच्या संपूर्ण हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षित असे दर मिळालेच नाही. आता हंगामाची अखेर असतानाही मील क्वॉलिटीच्या सोयाबीनचे किमान दर ४ हजार २०० रुपये प्रती क्विंटल, तर कमाल दर ४ हजार ५०० रुपये प्रती क्विंटलपेक्षा कमीच आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांत प्रचंड निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही दरवाढीच्या अपेक्षेने सोयाबीन साठवून ठेवले आहे.
आता बाजार समित्यांत मात्र बिजवाई दर्जाच्या सोयाबीनचे दर चांगलेच वाढले आहेत. वाशिमच्या बाजार समितीत बिजवाई दर्जाच्या सोयाबीनला किमान ४ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल ते कमाल ४ हजार ८०० रुपये प्रती क्विंटलपर्यंतचे दर मिळाले. त्यामुळे बियाण्यासाठी सोयाबीन राखून ठेवलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असल्याचे दिसत आहे.
बियाणे कंपन्यांसाठी खरेदी
खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकरीता बाजार समित्यांत बिजवाई दर्जाच्या सोयाबीनची खरेदी केली जात आहे. बिजवाई दर्जाच्या सोयाबीनला आता मागणी वाढल्याने चांगले दर मिळू लागले आहेत. अनेक शेतकरी त्यांच्याकडे असलेले बिजवाई दर्जाचे सोयाबीन विकत आहेत.
जिल्ह्यात २.९२ लाख क्विंटल घरगुती बियाणे
जिल्ह्यातील शेतकरीखरीप हंगामात दरवर्षी मोठ्या प्रमाणात घरगुती बियाण्यांचा वापर करतात. यंदाही शेतकऱ्यांनी उगवण क्षमता तपासणी करून ७० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक उगवण क्षमता असलेले २ लाख ९२ हजार ८५८ क्विंटल बियाणे राखून ठेवले आहे. हे बियाणे तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना बाजारातील दराचा फायदा होणार आहे.
बाजार समित्यांत १५ हाजर क्विंटलवर आवक
शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीची तयारी पूर्ण केली असून, दमदार पावसाची प्रतिक्षा शेतकरी करू लागले आहेत. अशात गतवर्षी साठवून ठेवलेले सोयाबीन विकून बियाणे, खतांच्या खरेदीसाठी शेतकरी पैशांची जुळवाजुळव करीत आहेत. त्यामुळेच बाजार समित्यांत सोयाबीनची आवक वाढत असून, सोमवारी जिल्ह्यात १५ हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली होती.
मील क्वॉलिटी सोयाबीनला कोठे किती दर
वाशिम - ४४६५
कारंजा - ४४८०
मानोरा - ४४७५
मंगरुळपीर - ४५६०
रिसोड - ४४३०
हेही वाचा - शेतकऱ्यांनो, सोयाबीनचे एकरी उत्पादन वाढवायचे ना? मग करा या अष्टसूत्रीचा वापर!