बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यात शेतीची पेरणीपूर्व मशागत पूर्णत्वाकडे गेली आहे. आता शेतकऱ्यांना पेरणीलायक पावसाची प्रतीक्षा आहे. शनिवारी अंबाजोगाई तालुक्यात केवळ ४१.५ मिमी पाऊस पडला. परिणामी चांगला पाऊस होईपर्यंत पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. तर तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ६३ हजारांपैकी ६५ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार असून सोयाबीनच्या पेऱ्यात दोन हजार हेक्टर क्षेत्राची वाढ होईल.
तालुक्याच्या हद्दीमध्ये तीन साखर कारखाने असतानाही ते बंद असल्यामुळे यावर्षी उसाच्या लागवडीत तीन हजार हेक्टरने घट झाली आहे. तसेच यावर्षी तुरीला साडेअकरा हजार रूपये क्विंटलचा भाव आल्याने यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत तुरीचा पेरा ७८२ हेक्टरने वाढ होणार आहे. ७ जूनपासून मृग नक्षत्राची सुरुवात झाली. या नक्षत्रात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीसाठी मशागत सुरू केली आहे.
यावर्षी सोयाबीन, खरीप ज्वारी, कापूस, ऊस, तूर व इतर कडधान्य याचा पेरा होणार असून यात तालुक्यामध्ये एकूण १०६ गावे असून तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र ८७ हजार १५१ हेक्टर असून लागवडीलायक ७७ हजार १५२ हेक्टर जमीन आहे.
खरीप ज्वारी (५५६ हेक्टर) गतवर्षी ५७५ यावर्षी, सोयाबीन ६३ हजार ९१ गतवर्षी तर यावर्षी ६५ हजार हेक्टर कापूस २ हजार ५०१ हेक्टर तर यावर्षी २५०० हेक्टर, ऊस ५ हजार ३५७ हेक्टर तर यावर्षी २५५० हेक्टरवर लागवड झाली आहे. तूर २२१८ हेक्टर, तर यावर्षी तीन हजार हेक्टवर लागवड होण्याचा अंदाज आहे. इतर कडधान्य पिकात २ हजार ४७६ हेक्टर तर यावर्षी २५६३ हेक्टरवर लागवड होईल,
तुरीला भाव मिळाल्याने यावर्षी क्षेत्र वाढविणार
यंदा पाच एक्कर जमिनीपैकी एक एकर जमिनीमध्ये पट्टा पद्धतीने तूर लागवड केली होती. या एकरामध्ये ६ क्विंटल तुरीचे उत्पादन झाले. या तुरीला ११५०० रूपये प्रमाणे भाव मिळाल्याने या वर्षी २०२४-२०२५ च्या खरीप हंगामात तुरीचे क्षेत्र वाढविणार आहोत. अशोक मगर, शेतकरी पिंपळा धायगुडा
बियाणे व माती परीक्षण करूनच खरीप पेरणी करावी
गतवर्षी बोगस बियाणांमुळे तालुक्यामध्ये शेतकऱ्यांत नाराजी वाढली होती. कोणतेही पीक पेरताना त्याची उगवण क्षमता पाहूनच पेरणी करावी तसेच कृषी विभागामार्फत जमिनीतील माती परीक्षणाची मोहीम सुरू असून या मोहिमेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. तसेच १०० मिमी. पाऊस झाल्या शिवाय पेरण्या करू नयेत. जमिनीत पूर्ण ओलावा निर्माण होऊ द्या.- विजय पवार, तालुका कृषी अधिकारी, अंबाजोगाई.