Join us

पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांत कळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2023 10:25 AM

शेतकऱ्यांचे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा काढणी पश्चात नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत नुकसानीबाबतची सूचना नोंद करण्यासाठी पीकविमा ॲप अथवा टोल फ्री क्रमाकांवर वापर करावा.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा काढणी पश्चात नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत नुकसानीबाबतची सूचना नोंद करण्यासाठी पीकविमा ॲप अथवा टोल फ्री क्रमाकांवर वापर करावा. टोल फ्री क्रमांक उपलब्ध न झाल्यास सदर आपत्तीची माहिती विमा कंपनीचे प्रतिनिधी, बँक, अथवा कृषी व महसूल विभाग यांना द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

सद्य:स्थितीत मागील ४ ते ५ दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस सुरू आहे. काही भागांमध्ये जास्त पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले असू शकते. या पार्श्वभूमीवर पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंत पावसाच्या पाण्यामुळे विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यास होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते, असे त्यांनी सांगितले.

सद्य:स्थितीत काही पिकांची काढणी सुरू असून, अधिसूचित क्षेत्रातील शेतात पीक कापणी करून सुकवणीसाठी पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांसाठीच कापणीपासून जास्तीत जास्त दोन आठवड्यांपर्यंत (१४ दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस अवकाळी व पावसापासून नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात येते, असेही गावसाने यांनी कळविले आहे.

सव्वापाच लाख शेतकऱ्यांनी भरला विमाप्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ या हंगामाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी खरीप २०२३ मध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पीक विमा योजनेंतर्गत ६ लाख ७६ हजार ३११ शेतकयांनी ५ लाख २३ हजार १७७ हेक्टर क्षेत्रासाठी पीकविमा उतरवला आहे. अशी माहिती गावसाने यांनी दिली.

नुकसानीबाबतची सूचना नोंद करण्यासाठी पीकविमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक खालीलप्रमाणे:ओरिएन्टल इन्शुरन्स कं. लि.मेफेअर टॉवर्स, पहिला मजला, पुणे-मुंबई रोडवाकडेवाडी, पुणे - ४११००५टोल फ्री क्र. : 1800 118485ई-मेल: pmfby.160000@orientalinsurance.co.in

 

टॅग्स :पीक विमापीकपाऊसखरीपसोलापूर