ढगफुटी, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत पीक विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.
पंतप्रधान पीक विमा योजना भारतीय कृषी विमा कंपनी यांच्यावतीने बीड जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. पिकांच्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास ढगफुटी, अतिवृष्टी,दीर्घकाळ पाणी साचून झालेल्या नुकसानीची माहिती वेळेवर पीक विमा कंपनीला कळविणे बंधनकारक आहे. निर्धारित वेळेत तक्रार केल्यासच दखल घेतली जाते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांनी ७२ तासांत पीक विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार करावी, असे आवाहन जेजुरकर यांनी केले.
कोठे करणार तक्रार ?
• पीक विमा कंपनीला तक्रार देण्यासाठी कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत विकसित पीएमएफबीवाय क्रॉप इन्शुन्स अॅप हे गुगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड करून घ्यावे.
- या अप्लिकेशनचा वापर करून त्याद्वारे माहिती द्यावी. तसेच कंपनीचा टोल फ्री क्रमांक १८००४१९५००४ व ई-मेल - pikvima@aicofindia.com या ठिकाणी तक्रार दिली जाऊ शकते, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी सांगितले.