अरुण बारसकरसोलापूर : राज्यात दरवर्षी निर्यातक्षम व गुणवत्ताधारक द्राक्ष उत्पादन वाढत असल्याने महाराष्ट्रीयन द्राक्ष निर्यातही वाढत आहे. रंगीत द्राक्षाची आयातही दरवर्षी कमी-कमी होताना दिसत आहे. यंदा तर भारतातून महाराष्ट्रातील ४३,८६७ कर्नाटकातील ११ अशा दोनच राज्यातून द्राक्ष निर्यातीसाठी नोंद झाली आहे.
देशातील काही राज्यातून द्राक्ष निर्यात होत होती; मात्र यंदा नोंदच केली नाही. विविध देशांतील ग्राहकांना कशाप्रकारची द्राक्षं हवीत तशी द्राक्ष तयार करण्यावर तसेच त्यासाठी आवश्यक पॅकिंग करण्याकडे राज्याचा फलोत्पादन विभाग लक्ष देत आहे. यासाठी तशी औषधे व इतर बाबी उपलब्ध करून दिल्याने महाराष्ट्रातील द्राक्षाच्या गुणवत्तेत दरवर्षी हवे तसे बदल होत आहेत.
त्यामळे शेतकऱ्यांनाही आपली द्राक्ष निर्यात होऊ शकतात याचा आत्मविश्वास वाढत आहे त्यामुळेच द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केली जात आहे. यावर्षी भारतातून केवळ महाराष्ट्र व कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंद केली आहे. कर्नाटकच्या ११ व महाराष्ट्रातील ४३,८६७ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. द्राक्ष निर्यातीसाठी शेतकऱ्यांकडून झालेली यंदाची नोंदणी आजवरची उच्चांकी असल्याचे सांगण्यात आले.
आतापर्यंत १,६२४ कंटेनर निर्यातमहाराष्ट्रातून मागील महिनाभरात १,६२४ कंटेनरमधून २१,७१० मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. कर्नाटकातून मात्र द्राक्ष निर्यात झालेली नाही. महाराष्ट्रातून मागील वर्षीपेक्षा द्राक्ष निर्यात कमी असली तरी सुरुवात चांगली झाली असल्याचे सांगण्यात आले.
निर्यातीसाठी महाराष्ट्रातील द्राक्ष नोंद
नाशिक | २४,२५८ |
सांगली | ९,६०३ |
सोलापूर | २,५७० |
अहमदनगर | १,०६३ |
पुणे | १,०३५ |
धाराशिव | ७१९ |
सातारा | ४०६ |
लातूर | १५० |
बुलढाणा | ६१ |
एकूण | ४३,८७० |
राज्यात कलर व्हरायटी वेगाने वाढायला हवी. प्लेमची चव चांगली असल्याने मोठ्या प्रमाणात मागणी आहे; मात्र ती मॉलमध्ये तजेलदार राहते, याला दरही चांगला मिळतो. संघ रेड व आरा ३५ म्हणावे तसे डेव्हलप झाले नाही. इतरही रेड कलरचे वाण विकसित झाले आहेत. - शिवाजी पवार, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ
आरोग्यावर काही परिणाम होणार नाही अशा गुणवत्तेच्या द्राक्षाचे उत्पादन राज्यात वाढले आहे. फलोत्पादन विभागाने लागवड ते विक्रीचे नियोजन टीमवर्कने केले आहे. राज्यात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन वाढल्याने निर्यात झाली नाही तरी स्थानिक बाजारपेठेत गुणवत्तेची द्राक्ष खायला मिळत आहेत. कलर व्हरायटीचे उत्पादन वाढल्याने आयात कमी झाली. - गोविंद हांडे, राज्य निर्यात सल्लागार