पावसाच्या दीर्घ खंडामुळे विविध जिल्ह्यांतील परिस्थिती बिकट होत चालली आहे. एकीकडे पिकांना पावसाचा ताण सोसवेनासा झाल्याने लाखो रुपये खर्चून जोपासलेली पिके माना टाकत आहेत. तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. अनेक भागात सोयाबीनची पिके पिवळी पडत आहेत. पिकांवर नांगर फिरविला जात आहे. मराठवाड्यातील अनेक भागात पिकांना फटका बसला आहे.
जनावरे, फळबागा जगवा
दुष्काळी परिस्थिती पाहता राज्य सरकारने जनावरे जगविण्यासाठी राज्यभर ठिकठिकाणी चारा डेपोचे नियोजन हाती घ्यावे, अशी मागणी पद्मश्री पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांना पत्र पाठवून केली आहे.
टंचाईचा फटका, मांजरात २४% पाणी
लातूर जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरिपातील पिकांनी माना टाकल्या आहेत. परिणामी, उत्पादनात ६० टक्क्यांनी घट झाली आहे. लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या बीड जिल्ह्यातील मांजरा प्रकल्पात २४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. तसेच मध्यम प्रकल्पात फक्त २०.८५ टक्के जलसाठा आहे.
धाराशिव : महिनाभर पाऊस नाही, पिकांनी टाकल्या माना "
खरीप हंगामातील पिकाची पावसाअभावी वाईट अवस्था झाली आहे. ५७ पैकी तब्बल ३३ मंडळांत जवळपास आता महिनाभरापासून पावसाने खंड दिला आहे, यामुळे पिकांनी माना टाकणे सुरु केले आहे. धाराशिव जिल्ह्यात तब्बल ५ लाख ५९ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची लागवड केली. मात्र, यानंतर पावसाने चक्क पाठ फिरविली आहे. एकूण सरासरीच्या ५०% इतकाही हा पाऊस नाही. त्यामुळे चितेत भर पडली आहे.
जळगाव : दुष्काळाचं भय
जळगाव जिल्ह्यातील एकूण ८६ महसूल मंडळांपैकी २३ मंडळामध्ये २० टक्केही पावसाची नोंद नाही. आता सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाने जर पाठ दाखवली तर जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पावसाअभावी धरणगाव, अमळनेर, चोपडा, चाळीसगाव या तालुक्यामधील अनेक महसूल मंडळातील पिकांना फटका बसत आहे. चाळीसगाव तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा होत असून जनावारांच्या चाचासाठी भटकती वाढली आहे.
पाच जिल्ह्यांत पावसाचा अंदाज
पुढील तीन दिवसात मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या हवामान विभागाने वर्तविला आहे. नांदेड, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे