छत्रपती संभाजीनगर जिल्हा आपत्ती निवारण विभागाच्या पथकाने रविवारी सोयगाव तालुक्यातील बारा गावांना वीजरोधक यंत्र बसविले आहे. त्यामुळे ही गावे आता गारपीट व विजेच्या तडाख्यासह नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित राहणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी सांगितले.
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर, वेताळवाडी, जंगला तांडा, सावरखेडा, हनुमंत खेडा, पळसखेडा, जरंडी, उप्पलखेडा, किन्ही, पळाशी, वाडी (नायगाव), दस्तापूर या गावांना यापूर्वीच वीज प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यामुळे या गावात वीजरोधक यंत्र बसविले आहे. या यंत्राद्वारे गाव आणि परिसरात कोसळणारी वीज खेचून घेतली जाणार आहे. त्यामुळे गाव परिसर सुरक्षित राहणार आहे. सध्या तालुक्यात अवकाळीसह विजांचा कडकडाट सुरू आहे. या यंत्रामुळे या गावांचा धोका कायमचा टळला आहे. जिल्हा आपत्ती निवारण पथकाने शनिवारी व रविवारी सिल्लोड २३ तर सोयगाव तालुक्यात १२ गावांत हे यंत्र बसविले आहे, असे विधाते यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीकडे देखभाल दुरुस्ती
• ज्या गावात वीजरोधक यंत्र बसविण्यात आले आहे. त्या गावातील ग्रामपंचायतीकडे या यंत्राची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी देण्यात आलेली असून शासकीय इमारत असलेल्या ठिकाणी अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालयावर हे यंत्र बसविले आहे.
• या यंत्राद्वारे कोसळलेली वीज खेचून घेतली जाणार असून कितीवेळा वीज खेचली गेली, याचे मोजमाप या यंत्रात दिसणार आहे. विजेच्या क्षमतेचेही मूल्यमापन या यंत्राद्वारे होणार आहे.